शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी चिवटपणे झुंज देणारे महाराणा प्रताप !अकबराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणारे महाराणा प्रताप !

ख्रिस्ताब्द १५६८ मध्ये अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. चितोड जिंकून तो दिल्लीला परत गेला. त्या वेळी चितोडने प्रचंड अग्नीदिव्य केले. चितोडमधील सर्व राजपूत स्त्रियांनी जोहार करून आत्मबलीदान केले. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला. त्याने अकबराविरुद्ध मेवाडमध्ये धर्मयुद्ध पुकारले. ख्रिस्ताब्द १५७२ मध्ये मेवाड राज्याचा अधिपती म्हणून त्याने स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला.

महाराणा प्रतापचा निःपात करण्याचा अकबराचा बेत !

या कालावधीत अकबराने भारतातील मोठमोठ्या राजसत्ता जिंकून दिल्लीतील एकछत्री मोगल सत्ता बलवान केली. महाराणा प्रताप हा एकमेव बलवान शूर राजा होता. त्याच्यापासून मोगल सत्तेला असलेला धोका लक्षात घेऊन त्याचा निःपात करून मोगली सत्ता निष्कंटक करण्याचे अकबराने ठरवले. महाराणा प्रतापवर स्वारी करण्यासाठी अकबराने आपल्या दरबारातील प्रमुख सेनापती राजा मानसिंग याला एक लक्ष घोडेस्वार, नवीन बंदुका, बाण अशी शस्त्रास्त्रे आणि अगणित हत्ती, घोडे, रथ, पायदळ असे सैन्य देऊन पाठवले. या वेळी महाराणा प्रतापजवळ केवळ तीन सहस्र घोडदळाचे कडवे योद्धे होते. विचार करून महाराणा प्रतापने अरवली पर्वतातील ‘हळदी घाट’ या दुर्गम जागेवर मोर्चेबांधणी केली. मानसिंगाजवळ प्रचंड सैन्य असल्यामुळे त्याने एकाच वेळी चहुबाजूंनी महाराणा प्रतापवर आक्रमण केले. या आक्रमणात महाराणा प्रताप आणि त्याचे सैन्य यांनी लढण्याची शर्थ केली. प्रचंड मोगल सैन्याला त्यांनी नामोहरम करून सोडले.

शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी चिवटपणे झुंज देणे

या युद्धात महाराणा प्रतापने मोगल सैन्याला इतके जेरीस आणले होते की, मोगलांनी महाराणा प्रतापचा थोडासुद्धा प्रतिकार केला नाही. महाराणा प्रतापला पकडणे मानसिंगला शक्य झाले नाही. तो दिल्लीस परत गेला.

या युद्धानंतर महाराणा प्रतापने पुन्हा सैन्य जमवून युद्धाची सिद्धता केली. नंतर त्याने अकबराशी तीन वेळा युद्ध केले. या तीनही युद्धांत अकबराला महाराणा प्रतापचा पराभव करता आला नाही किंवा त्याला पकडताही आले नाही. महाराणा असून जंगलात रहाण्याची परिस्थिती येऊनही धैर्याने शत्रूशी शेवटपर्यंत झुंज देणार्‍या या शूर महापुरुषाचा ख्रिस्ताब्द १५९७ मध्ये मोठ्या आजारात अंत झाला.

– प्रा. सु.ग. शेवडे (भारतीय संस्कृती)