देश अन् धर्म यांचेसाठी प्राण देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई !

दारूगोळा बनवणारी पहिली भारतीय सत्ताधारी झाशीची राणी लक्ष्मीबाई !

दारूगोळ्याची निर्मिती चीनमध्ये १२ व्या शतकात झाली. पुढील २०० वर्षांत हे तंत्रज्ञान अरेबियन देशांत आणि युरोपियन देशांत पोहोचले; पण भारतीय सत्ताधारी याविषयी पूर्ण अनभिज्ञ होते. १५२६ साली बाबरने भारतावर बंदुकीच्या जोरावर आक्रमण करून तो पादाक्रांत केला. युद्धातील हे दारूगोळ्याचे महत्त्व जाणणारी झाशीची राणी ही पहिली भारतीय सत्ताधारी होती. तिने दारूगोळा बनवण्यासाठी पहिल्यांदा भारतीय प्रयत्न केला; पण तिचा कालखंड फारच लहान असल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

‘बाणापूरचा राजा मर्दनसिंह जूदेव याला पाठवलेल्या पत्रात राणी लक्ष्मीबाई म्हणते, ‘विदेशीयों की गुलामी में रहिबो अच्छो नही है, उनसे लडवो अच्छो है’, (परकीयांच्या गुलामीत रहाण्यापेक्षा त्यांच्याशी लढणे चांगले !) यावरून तिची मनःस्थिती कळते.

राणी असूनही ब्राह्मणाचा आदर राखणारी राणी लक्ष्मीबाई

कुंचच्या पराभवानंतर काल्पीकडे जातांना वाटेत एका विहिरीजवळ अकस्मातपणे गोडसे भटजी अन् राणी लक्ष्मीबाई यांची भेट झाली. त्यांनी विहिरीतून पाणी काढून देऊ करताच ते नाकारून राणी म्हणाली, ‘‘तुम्ही विद्वान, तुम्ही काढून दिलेले पाणी मी पिणार नाही. मीच काढते. मी अदशेर आट्याची धनीण आहे. मजला रांडेमुंडेस काहीयेक आवश्यकता नव्हती; परंतु सर्व हिंदूंविषयीचा धर्मसंबंधी अभिमान धरून कर्मास प्रवृत्त जाहले; परंतु ईश्वराने यश दिले नाही.’

बालपणी शस्त्रे अन् घोडाफेक यांचे शिक्षण घेणे

‘मोरोपंत तांबे यांची कन्या छबेली किंवा मनू या नावाने ओळखली जात होती. लिहण्या-वाचण्यासह तिने शस्त्रे अन् घोडाफेक यांचेही शिक्षण घेतले. झाशीचे राजे श्री. गंगाधरराव नेवाळकरांसह तिचा विवाह झाला. दामोदर हा दत्तकपुत्र होता. दत्तक विधान झाल्यावर गंगाधरराव निवर्तले.

राणीने ह्यू रोजशी लढायला सिद्ध होणे

डलहौसीने संस्थान खालसा केले. त्या काळातील राणीचे पत्रव्यवहारातील चातुर्य पाहिले की, तिच्या बुद्धीची साक्ष पटते. उत्तर हिंदुस्थानच्या धुमसत्या संघर्षातआणखी एका ठिणगीची भर पडली. राणीचे नानासाहेब अन् तात्या टोपे यांच्यासह संधान होते. ह्यू रोज झांशीवर चालून येताच ‘मेरी झांशी नही दूंगी’, असे म्हणत राणी सर्वसामान्य नागरिकांसह लढायला सिद्धझाली. भयंकर युद्ध झाले.

काल्पीकडे निसटलेल्या राणीशी पुन्हा ग्वाल्हेर येथे चढाई होणे

झाशी पडताच ती दत्तकपुत्रासह शिताफीने निसटून १०७ मैलांवरच्या काल्पीकडे गेली. तेथे तात्या भेटले. तीन दिवसांच्या लढाईनंतरकाल्पी पडले. अवघा बुंदेलखंड इंग्रजांनी व्यापला. तात्या अन् राणी ग्वाल्हेरकडे गेले. ग्वाल्हेरवर ह्यू रोजअन् ब्रिगेडियर स्मिथ चाल करून आले. कोटा की सराई येथे राणीसह त्यांची लढाई जुंपली. तत्पूर्वी राणीने शरण यावे, म्हणून तिच्या वडिलांना अटक करण्यात आली. पुढे त्यांना फाशी देण्यात आली.

अतुलनीय पराक्रम करणार्‍या राणीने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, असे म्हणत प्राण सोडणे

लढाई करतांना राणी घेरली गेली. एका शिपायाचे बायोनेट तिच्या कुशीत शिरले, रक्त उसळून वाहू लागले. तिने घाव घालणार्‍याला मारून टाकले. तिच्या दासीला गोळी लागताच तिने गोळी झाडणार्‍याचे दोन तुकडे केले. इतक्यात तिच्या डाव्या मांडीत गोळी शिरली. ती झाडणार्‍यालाही तिने यमसदनास पाठवले. याच वेळी मागून तिच्या डोक्यावर घाव बसला. उजवा डोळा लोंबू लागला. त्या अवस्थेतही वार करणार्‍याचा खांदा तिने कापला. यानंतर उरलेले सैनिक पळाले. रक्तबंबाळ राणीला बाबा गंगादासच्या झोपडीत नेले. तिथे तिच्या मुखात गंगोदक घातले. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, असे म्हणत तिने प्राण सोडला.

या पराक्रमाची आठवण म्हणून सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेत स्त्रियांचे ‘राणी लक्ष्मीबाई’ या नावाचे पथक उभे केले.

कवींनी गौरवलेली राणी लक्ष्मीबाई

झाशीची राणी लक्ष्मीबाई : ‘केवळ अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या राणीच्या मृत्यूस्थानी उभ्या असलेल्या चौथर्‍यावर कवी भा. रा. तांबे यांच्या कवितेतील ओळी कोरल्या आहेत,

‘हे हिंदबांधवा, थांब या स्थळी । अश्रू दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली ।।’

राणीचा गौरव – खूब लडी मर्दानी, वह तो झांसीवाली रानी थी ।

अशा प्रकारे हिंदीमध्ये सुभद्राकुमारी चौहान यांनी गौरवशाली झांशी ही कविता लिहिली. यात अखेरीस त्या लिहितात,

दिखा गई पथ, सिखा गयी हमको,
जो सीख सिखानी थी ।
बुंदेल हरबोलों के मुख,
हमने सुनी कहानी थी ।
खूब लडी मर्दानी,
वह तो झांसीवाली रानी थी ।।

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (श्रीगजानन आशिष, जानेवारी २०११)