विद्यार्थी बांधवांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

राष्ट्र आणि धर्म यांपासून दूर जात असलेल्या
विद्यार्थी बांधवांनी आता भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

१. शाळेत शिकवल्या जाणार्‍या सारे भारतीय माझे बांधव आहेत…,
या प्रतिज्ञेतल्या एकातरी वाक्याप्रमाणे आपले वागणे असते का ?

आज सैनिकांच्या हत्येची देशभरात चर्चा चालू आहे आणि त्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटत आहेत. विद्यार्थी बांधवांनो, या घटनांवर आपण विचार करत आहोत का ? भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत…, अशी प्रतिज्ञा आपण शाळेत करतो; पण या प्रतिज्ञेतल्या एकातरी वाक्याप्रमाणे आपण वागतो का ? आपल्याला त्याची जाणीव आहे का ? जर खरोखरच सर्व जण आपले बांधव आहेत, तर सीमेवर आपल्या रक्षणासाठी प्राण देणार्‍या सैनिकांच्या मृत्यूची वेदना जरातरी आपल्या हृदयात पोहोचते का ? त्यांच्या कुटुंबियांना जे सहन करावे लागते, त्याचा थोडासातरी अंश आपल्याला जाणवतो का ? जर सर्वच जण आपले बांधव आहेत, असे आपण म्हणतो, तर आपल्याच वयाच्या विद्यार्थीनी बलात्काराच्या घटनांमध्ये कशा सापडत आहेत ? आज आपण अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. देश संकटात असतांना आपण केवळ फुकाचे बोल बोलत आहोत.

२. चित्रपट आणि क्रिकेट अशा अवांतर
विषयांवर बोलून वेळ घालवणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये
देश अन् धर्म यांविषयीच्या कर्तव्याची जराही जाणीव नसणे

आपण शाळेत शिक्षण घेतो; पण ते केवळ उत्तीर्ण होणे आणि त्यानंतर पैसे मिळवणे यांसाठी. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी कोणत्या विषयांवर बोलतो ? दूरचित्रवाहिनी, चित्रपट आणि क्रिकेट, नाहीतर शिक्षकांची टिंगलटवाळी यांविषयीच ना ? देश आणि धर्म यांविषयी बोलणारा एक तरी विद्यार्थी कुणी पाहिला आहे का ? हीच खरी आपली दुर्दशा आहे. आपल्यामधले काही जण भलेही चांगले असतीलही; पण आपण बहुतेक सर्व जण आपल्या कर्तव्याची जाणीवच विसरलो आहोत.

३. पाठ्यपुस्तकाद्वारे दिल्या जाणार्‍या
धादांत असत्य माहितीच्या विरोधात आपण मूग गिळून गप्प का रहातो ?

एन्.सी.इ.आर.टी. सारखी देशद्रोही पाठ्यपुस्तके भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना आतंकवादी ठरवतात. शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचा चार ओळींचा इतिहासही या पाठ्यपुस्तकांत नसतो. आपल्या देशातल्या काही संघटना या विरोधात आंदोलन करून तो अभ्यासक्रम वगळण्यास सांगतात; पण हे सर्व शिकत असतांना आपल्याला त्या विरोधात काहीच बोलावेसे का वाटत नाही ? निखिल वागळेंसारख्या निधर्मीवादाचे वेड पांघरणार्‍यांना आपण याविषयी प्रश्‍न का विचारत नाही ? तेवढासुद्धा देशाभिमान आपल्यात का नाही ? या सगळ्याच गोष्टींवर आज विचार करण्याची वेळ आली आहे. यासाठीच आपल्यात देशाभिमान बाणवायला हवा.

४. पाप्यांना धडा शिकवण्याची आणि
पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढा देण्याची वेळ आली असणे

शिरीषकुमारांचा स्वातंत्र्यलढा आपण शिकलो आहोत. पुन्हा एकदा तो स्वातंत्र्यलढा देण्याची वेळ आता आली आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आपले रक्षण करून या भारतमातेवरील आक्रमणे रोखण्याची वेळ आली आहे, हे आता लक्षात घेऊया. मध्ये एकदा एका कार्यक्रमात शालेय वयाच्या २ मुलांनी एका मुलाची गोळ्या घालून हत्या केली. १५-१६ वर्षांची मुलेही बलात्कारांच्या घटनांमध्ये सापडत आहेत. अशा परिस्थितीमुळे काही गावातील पालकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवणे बंद केले. यावर शाळा बंद करणे हा पर्याय नसून अशा पाप्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे. जोपर्यत आपण त्यांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत हे सर्व घडतच रहाणार आहे. यासाठी स्वतःचे आणि आपल्या बांधवांचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्याविना पर्याय नाही.

५. सद्यस्थिती पालटण्यासाठी काय करायला हवे ?

अ. अयोग्य कृती आढळल्यास त्याविषयी शिक्षकांना प्रश्‍न विचारणे : एका पाठ्यपुस्तकात झाशीच्या राणीचे हुक्का ओढतांनाचे चित्र दाखवले होते. याविषयी एका विद्यार्थ्याने शिक्षकांना प्रश्‍न विचारल्यावर ते निरुत्तर झाले आणि त्यांना त्याविषयी पुढे कळवावे लागले. ती पुस्तके रद्द करण्यासाठी विविध आंदोलने झाली. बांधवांनो, आपली एक सतर्कता, एक प्रश्‍नसुद्धा अशी आक्रमणे रोखू शकतात. अकबर, बाबर यांच्या पिलावळीचा इतिहास सोडून आता आपण शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा आपल्यात आणूया.

आ. खर्‍या इतिहासाचा आग्रह धरणे : पूर्वी आपल्या देशात परदेशांतून सहस्रो विद्यार्थी शिकण्यास येत. नालंदा, तक्षशिला यांसारखी मोठी विद्यापीठे याच भारतात होती; पण भ्रष्ट राज्यकर्त्यांना त्यांचे मोल कळले नाही. आपल्याला हेतूतः चुकीचा इतिहास शिकवला जातो; कारण आपल्याला देशाभिमान वाटूच नये. यासाठी आता आपण खर्‍या इतिहासाचा आग्रह धरूया.

इ. भाषणांद्वारे विद्यार्थ्यांना जागरूक करणे : भ्रष्टाचार, दहशतवाद यांसारख्या मोठ्या समस्यांसह शिक्षणक्षेत्राला ग्रासलेले ग्रहण, उदा. परीक्षेत नक्कल (कॉपी) करणे यासाठी चांगल्या वक्त्यांची भाषणे ठेवण्याची विनंती करूया. शाळेतील भाषणांच्या स्पर्धेच्या वेळी अन्य विषयांसह देशाची सद्यस्थिती आणि राज्यकर्त्यांची निष्क्रियता, यांसारखे विषय घेण्यासाठीही प्रयत्न करूया.

ई. संस्कृतीची ओळख घडवणारे बालसंस्कार डॉट कॉम पहाणे : देशभरात घडणार्‍या घटना मोकळ्या तासांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात सांगूया आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना जागृत करून आपलाही खारीचा वाटा उचलूया. इंटरनेटवर फेसबूक पहाण्यापेक्षा मुलांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करणा-या आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून देणा-या  बालसंस्कार डॉट कॉम  या संकेतस्थळाचा लाभ घेऊया !

शेवटी एकच सांगावेसे वाटते, हा देश जगातील सर्वांत सुंदर देश आहे. संत-महंत, धर्मवीर आणि राष्ट्रवीर यांची ही भूमी आहे. सर्व देवतांनीसुद्धा याच भूमीत जन्म घेत आहे. या भूमीला विकू पाहणार्‍या भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. एवढे एकच लक्षात ठेवूया.

आपण होऊया आता भारतमातेचे खरे मूल ।
चालेल जरी झाली आपल्या आयुष्याची चूल ॥
– कु. वैष्णवी जाधव (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment