छ. शिवरायांचे महत्त्व जाणणारे आणि लोकमान्य टिळकांना साहाय्य करणारे रवींद्रनाथ टागोर !

१. बंगाली जनतेला प्रेरणा देण्यासाठी छ. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्त्व बंगालीतून मांडणे

‘त्या काळात मुंबईमध्ये दिवसा ढवळ्या स्त्रियांना मुक्तपणे, कोणत्याही बंधनाविना वावरतांनाचे दृश्य या पूर्व भारतातल्या कवीसाठी अपूर्व समाधान देणारे होते. रवींद्रनाथांनी मुंबईवर ‘बोम्बई शहर’, असा एक निबंधच लिहिला आहे. या निबंधात त्यांनी लिहिले, ‘मुंबईत दानाविषयी मात्र एक मुक्तहस्तता आहे. बंगालमध्ये सर्वात अल्प दान मिळते.’ रवींद्रनाथांनी बंगाली जनांना प्रेरणा मिळावी, यासाठी छ. शिवाजी महाराजांचे असामान्य व्यक्तीमत्त्व बंगालीतून त्यांच्यासमोर मांडले. शिवरायांनी ज्या स्वराज्य धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्य वेचले, त्याच स्वराज्य धर्माचा उद्घोष रवींद्रनाथांनी आपल्या काव्यातून केलेला आहे.

२. लोकमान्य टिळक यांचे स्वराष्ट्रप्रेम आणि रवींद्रनाथ टागोर यांची विद्वत्ता अन् कार्य यांविषयीपरस्परांच्या मनात नितांत आदर असणे

ख्रिस्ताब्द १८९८ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती.इंग्रज अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वकियांच्या परावलंबित्वामुळे प्लेगच्या साथीत अनेक नागरिकांचा बळी गेला. यामुळे व्यथित होऊन इंग्रज अधिकार्‍यांच्या वृत्तीची, विशेषतः कार्यपद्धतीची निर्भत्सना करणारा लेख रवींद्रनाथांनी बंगाली भाषेतील आपल्या ‘भारती’ मासिकात लिहिला होता. नेमकी त्याच वर्षी लोकमान्य टिळकांना दीड वर्षाची शिक्षा झाली होती. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी टिळकांच्या खटल्यासाठी बंगालमधील जनतेकडून साहाय्य म्हणून पैसा गोळा करून तो पुण्याला पाठवला होता.

टिळकांच्या स्वराष्ट्रप्रेमाविषयी रवींद्रनाथांच्या मनात नितांत आदर होता. टिळकांनाही रवींद्रनाथांच्या विद्वतेविषयी आणि कार्याविषयी कोणतीही शंका नव्हती.

संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, २.५.२०११

Leave a Comment