सुसंस्कारांचे महत्त्व !

१. सुसंस्कारित मन जिवाला भरकटू देत नाही !

‘सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्‍या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. देवाने दिलेली ही समष्टी सेवा आहे; पण हे समाजाला कळत नाही आणि तो भरकटलेल्या तरुण युवकांप्रमाणे दूरदर्शनाच्या, त्यातील अनावश्यक मालिका यांच्यात वहावत गेला आहे.

२. कुसंस्कार होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वत्र फोफावलेला चंगळवाद

‘आम्हाला कोठे हे लहानपणी मिळाले ? आम्ही पूर्ण बालपण मोठ्यांच्या कह्यात राहून मन मारले. आता मिळतेय ते आधाशासारखे खाऊया. मनाप्रमाणेच करूया’, हे विचार लोकांच्या मनात प्रबळ असतात. असे कुसंस्कारित मन पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार ? त्यामुळेच पुढची, म्हणजेच आताची पिढी पूर्ण भरकटली गेली आहे. त्यातच प्रसारमाध्यमे, रस्त्यावरही सहजपणे दिसणारी अयोग्य विज्ञापने, भ्रमणभाष, ई-मेल, फेसबूक अशी अनंत आधुनिक साधने सहजपणे उपलब्ध झाल्याने त्यात भरच पडली आहे. त्यातून योग्य ते शिकण्यापेक्षा नको त्या मार्गाला नवीन पिढी वहावत चालली आहे. प्रत्येक सुसंस्कार आपणास देवाकडे नेतो; पण कुसंस्कार असुरांच्या राज्यातच नेऊन सोडतो आणि अराजकही माजवतो. तेच आज आपणाला सर्वत्र दिसत आहे.

३. समाजाला आज सुराज्याची आवश्यकता आहे !

समाजाला आज पाहिजे आहे एक सुराज्य. त्यात असेल धर्माचरण. राष्ट्र, धर्म, देव यांना मानणारा आदरणीय समाज. तोच या युवा पिढीला सन्मार्ग दाखवील. यासाठीच सनातन संस्था आणि काही हिंदुत्ववादी संघटना सतत कार्यरत आहेत. त्याच समवेत पाहिजे देवाचे अधिष्ठान. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥ तेच सात्त्विक काम सनातन संस्थेचे संस्थापक परात्परगुरु प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले करत आहेत. त्याला अनेक संत आणि साधक हातभार लावत आहेत.

४. पुढची पिढी सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी सत्सेवा !

नागरिकांनो, आदर्श राज्य येणारच आहे; पण त्यासाठी पुढची पिढी सुसंस्कारित व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जसे श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचललाच होता; पण त्यात स्थुलातून प्रत्येक गोप-गोपी काठी लावून सहभागी झाले होते, तशीच स्थिती आजही आहे. आपल्यालाही तेच कार्य करून केवळ हातभार लावण्यास सज्ज व्हायचे आहे. ‘चला सिद्ध होऊ या पुढची पिढी सुसंस्कारित करायला ! तीच आपली सत्सेवा आहे. हे लक्षात घेऊया.’

– श्रीमती रजनी नगरकर, रामनाथी, गोवा.