लालबहादुर शास्त्री यांची तत्त्वनिष्ठता

श्री. लालबहादुर शास्त्री कारागृहात होते. कारागृहात कडक पहारा होता. कोणालाही भेटण्याची अनुमती दिली जात नव्हती. महत् प्रयत्नाने आई रामदुलारी किंवा पत्नी ललितागौरी यांपैकी एकीला भेटण्याची अनुमती मिळाली. लालबहादुर शास्त्री यांच्या पत्नी त्यांना भेटण्यासाठी कारागृहात आल्या, त्या वेळी नाव सांगताच पडताळणी (तपासणी) न करता त्यांना आत सोडण्यात आले. शास्त्रींसोबत गप्पा मारून झाल्यानंतर जातांना त्यांनी लपवून आणलेले दोन आंबे पतीला देऊ केले. त्या शास्त्रींना म्हणाल्या, तुम्हाला आवडतात; म्हणून लपवून आंबे आणले आहेत.

शास्त्रीजी म्हणाले, मला अतिशय वाईट वाटले. तू असे करायला नको होतेस. त्यांनी तुझ्यावर विश्‍वास ठेवून न पडताळता (तपासता) तुला आत सोडले; पण तू त्यांचा विश्‍वासघात केलास. मला काय आवडते ? याचा विचार करण्यापूर्वी मला काय आवडत नाही, याचा विचार तू करायला हवा होतास. कारागृहाचे नियम मोडणे मला आवडणार नाही. ते आंबे परत घेऊन जा. खरी तत्त्वनिष्ठता यालाच म्हणतात.

संदर्भ : साप्ताहिक जय हनुमान, २०.७.२०१३