संत तुकाराम महाराज

निरभिमानी, करुणाकर आणि क्षमाशील संत तुकाराम महाराज

महाराष्ट्रात समर्थ रामदासस्वामी नावाचे प्रसिद्ध संत होऊन गेले. त्यांच्याजवळ आंतरिक आणि बाह्य या दोन्ही प्रकारचे वैभव होते. या उलट संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते. ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत असत. त्यांच्या एका शिष्याने अविचाराने केलेली कृती आणि संत तुकाराम महाराजांची क्षमाशीलता यांविषयी जाणून घेऊया.

१. समर्थ रामदासांच्या मठातील भक्त मजेत रहातात, त्यांना मान मिळतो; म्हणून संत तुकाराम महाराजांच्या भजनी मंडळातील एक शिष्य त्यांच्याकडे आकर्षित होणे

संत तुकारामांच्या भजनी मंडळातील एका शिष्याने पाहिले की, समर्थ रामदासांच्या मठातील लोक पुष्कळ मजेत रहातात. ते चांगले कपडे घालतात आणि हलवा-पुरी खातात. समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचे गुरु आहेत; म्हणून त्यांच्याकडे पुष्कळ धन आणि वैभव आहे अन् त्यांच्या शिष्यांनाही पुष्कळ मान मिळतो; परंतु आमचे गुरु तुकाराम महाराज यांच्याजवळ तर काहीच नाही. न हलवा-पुरी, न गाद्या-तक्के.

तुकाराम महाराजांजवळ काहीही सुविधा नाही, असे तक्रारात्मक चिंतन करत तो शिष्य समर्थ रामदासांच्या मंडळाकडे आकर्षित झाला आणि तुकारामांचा तो शिष्य समर्थांकडे गेला. समर्थांना नमस्कार करून म्हणाला, महाराज, मला आपल्या शिष्याच्या रूपात स्वीकार करावे. मी तुमच्या मठात राहीन आणि कीर्तनसेवा करीन.

२. शिष्य व्हायचे असेल, तर तुकाराम महाराजांनी दिलेली माळ आणि मंत्र परत देऊन त्यांचा त्याग केल्यास तुझा गुरु होईन, असे समर्थांनी सांगणे

समर्थ : तू यापूर्वी कोणाचा शिष्य होतास ?

शिष्य : संत तुकाराम महाराजांचा.

(श्री समर्थांनी विचार केला की, ज्यांची सत्यावर प्रीती आहे, अशा तुकारामांसारख्या गुरूंचा त्याग ! आत्मसाक्षात्कारी पुरुष जेथे रहातात, तेथे वैकुंठ असतो. अशा महापुरुषाचा त्याग करायला याला कसे सुचले?)

समर्थ : संत तुकाराम महाराजांचा शिष्य असतांना मी तुला मंत्र कसा देऊ शकेन ? माझ्याकडून मंत्र घ्यायचा असेल, जर माझा शिष्य व्हायचे असेल, तर तुकारामांची माळ परत देऊन टाक आणि त्यांनी दिलेला मंत्रसुद्धा परत देऊन ये. पहिल्या गुरूंचा त्याग कर, मग मी तुझा गुरु होईन.
(सत्य समजवण्यासाठी समर्थ असे म्हणाले होते. तो तर खूष झाला की, आताच तुकारामांचा त्याग करून येतो आणि त्यांनी दिलेला मंत्र अन् माळ त्यांना परत देऊन येतो.)

३. तुकाराम महाराजांची निरभिमानता लक्षात येणे

शिष्य (तुकाराम महाराजांकडे जाऊन ) : महाराज, आता मला तुमचा शिष्य म्हणून रहायचे नाही.

तुकाराम महाराज : मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केला केव्हा ? अरे बाबा, तू स्वतःहून आला होतास. मी कुठे तुला पत्र लिहून बोलावले ? मी कधी तुला बळजोरीने माळ घातली होती ? माळ तर तू स्वतःच तुझ्या हातांनी घातली होतीस आणि माझ्या गुरूंनी जो मंत्र दिला, तोच मी तुला सांगितला होता. यात माझे काहीच नाही.

शिष्य : महाराज ! मला तुमची माळ नको.

तुकाराम महाराज : नको असेल, तर तोडून टाक.

शिष्य (लगेच माळ तोडून) : महाराज, आता तुमचा मंत्रसुद्धा घेऊन टाका.

तुकाराम महाराज : मंत्र माझा नाही, माझ्या गुरुदेवांचा मंत्र आहे. बाबाजी चैतन्य यांचा प्रसाद आहे. माझे, तर काहीच नाही.

४. दुसरे गुरु करायचे असल्यामुळे मला तुमचा मंत्र नको, असे शिष्याने सांगितल्यावर तुकाराम महाराजांनी मंत्र म्हणून दगडावर थुंकायला सांगणे आणि तसे केल्यावर महाराजांच्या संकल्पाने मंत्र दगडावर उमटणे

शिष्य : मला नको तुमचा मंत्र. मला तर दुसरे गुरु करायचे आहेत.

तुकाराम महाराज : मंत्र म्हणून दगडावर थुंकून टाक. म्हणजे मंत्राचा त्याग होईल.

(त्या अभाग्याने गुरुमंत्र त्यागण्यासाठी मंत्र म्हटला आणि तो दगडावर थुंकला. पहातो तर तो मंत्र दगडावर उमटला. शिष्याच्या कल्याणासाठी तुकारामांच्या संकल्पाने काम केले; म्हणूनच मंत्र दगडावर उमटला.)

शिष्य (समर्थांकडे जाऊन) : महाराज, मी मंत्राचा त्याग करून आलो आणि माळसुद्धा तोडून टाकली. आता मला तुमचा शिष्य बनवावे.

समर्थ : मंत्राचा त्याग केला, तेव्हा काय झाले ?

शिष्य : मंत्र दगडावर उमटला.

५. समर्थांनी शिष्यास स्वीकारण्यास नकार देणे आणि तुकाराम महाराजांकडे परत पाठवणे

समर्थ : असे महान गुरुदेव ! ज्यांनी दिलेला मंत्र दगडावर उमटला ! दगडावरसुद्धा त्यांनी दिलेल्या मंत्राचा प्रभाव पडला; परंतु मूर्खा ! तुझ्यावर काही परिणाम झाला नाही, तर माझ्या मंत्राचाही तुझ्यावर काय प्रभाव पडेल ? तू तर दगडापेक्षाही निरुपयोगी (कुचकामी) आहेस; मग येथे काय करशील ? हलवा-पुरी खाण्यासाठी साधू बनलास काय ?

शिष्य : मी माझ्या गुरूंचा त्याग केला आणि तुम्हीही मला वार्याहवर सोडले ?

समर्थ : तुझ्यासारखे अधांतरीच रहातील. तुझी लक्षणेच अशी आहेत. तुझ्यासारख्या गुरुद्रोह्यांना मी शिष्य बनवीन का ? मला काय अपराधी बनायचे आहे.

शिष्य : महाराज, कृपा करून माझा स्वीकार करा.

समर्थ : नाही, हे शक्य नाही.

तो शिष्य पुष्कळ रडला, त्याने गयावया केली.

समर्थ (करुणा करून) : संत तुकाराम उदार आत्मा आहेत. त्यांच्याकडे जाऊन माझ्या वतीने प्रार्थना कर की, समर्थांनी नमस्कार सांगितला आहे आणि सांग, मला क्षमा करा.

६. समर्थांनी पाठवले आहे; म्हणून तुकारामांनी परत माळ देणे

तो तुकाराम महाराजांकडे जाऊन प्रार्थना करू लागला. तुकाराम महाराजांनी विचार केला की, समर्थांनी पाठवले आहे, तर मी नकार कसा देऊ ?

तुकाराम महाराज : बरे बाबा ! तू आला होतास, तूच माळ मागितली होतीस मी दिली. ठीक आहे. नंतर तूच माळ तोडून टाकलीस. आता पुन्हा तूच आला आहेस, तर पुन्हा देतो. समर्थांनी पाठवले आहे, तर अडचण (हरकत) नाही. समर्थांचा जयजयकार असो !

संदर्भ : ऋषीप्रसाद, जुलै २००२