व्यवहारात राहूनही अनुसंधान ठेवावे भगवंताशी !

रावणाने सीतेचे हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागला. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, ‘‘आपण ज्या देवाचे नाम अहोरात्र घेतो, तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करत आहे, ते पाहा ! बर्‍याच वेळा साधी माणसे सुद्धा इतका शोक करीत नाहीत.’’ हे ऐकून शंकर म्हणाला, ‘‘पार्वती ! तू चुकतेस, रामचंद्राचा हा शोक वरवरचा आहे,खरा नाही. भगवंताने मनुष्यदेह धारण केला आहे, त्याला अनुसरून तो वागत आहे.’’ पार्वती म्हणाली, ‘‘आपण म्हणता हे मला खरे वाटत नाही; कारण ‘‘सीता, सीता’’, असे म्हणून राम झाडांना आलिंगन देत आहे. तो सीतेसाठी खरोखर वेडा झाला आहे.’’ यावर शंकर म्हणाला, ‘‘आपण असे करू ! तू सीतेचे रूप घे आणि त्याच्या वाटेत जाऊन उभी रहा. काय होते ते आपण बघू.’’ ठरल्याप्रमाणे पार्वतीने हुबेहुब सीतेचे रूप घेतले आणि रामचंद्र चालले होते त्या वाटेवर जाऊन ती उभी राहिली; पण श्रीरामचंद्रांनी तिच्याकडे लक्षच दिले नाही.

बर्‍याच वेळा पुढे येऊनही ते लक्ष देत नाहीत असे पाहून पार्वती त्याला म्हणाली, ‘‘हे काय ! मी सीता समोर आहे ना !’’ त्या वेळी मात्र श्रीरामचंद्र किंचित हसले आणि म्हणाले, ‘‘जगन्माते तू आदिमाया आहेस. मी तुलाओळखले आहे. तू परत जा.’’ हे शब्द ऐकून पार्वती एकदम लाजली व म्हणाली ‘‘राघवेंद्रा, मी शंकराची आज्ञा घेऊन तुमची परीक्षा पहाण्यासाठी आले होते. मला आता कळले की, आपण साक्षात् विष्णुच आहात.’’

‘आपण शिवाचे म्हणणे ऐकले नाही. रामाबद्दल कुत्सित् बुदि्ध धारण केली. आता शिवाला काय उत्तरदेऊ’, असा तिला पश्चात्ताप झाला. ‘‘तू रामचंद्राची परीक्षा घेतलीस ?’’, असे म्हणून स्वतःवरील तिचा अविश्वास जाणून तिचा शिवाने मनापासून त्याग केला. तो कैलास पर्वतावर गेला. मार्गात आकाशवाणी झाली,‘परमेश्वरा, आपण धन्य आहात. आपली प्रतिज्ञा धन्य आहे.’ पार्वतीने विचारले, ‘‘आपण कोणती प्रतिज्ञा केली होती ?’’ शिवाने विष्णूसमोर केलेली प्रतिज्ञा पार्वतीला सांगितली नाही. ‘पतीने आपला त्याग केला आहे’, हे जाणून दक्षकन्या सती पार्वती शोकसागरात बुडून गेली. इतरांनी तिला इतर अनेक गोष्टी सांगून तिचा शोक दूर केला.

तात्पर्य : ज्या व्यवहारामध्ये आपण आहोत त्याचे सोंग बरोबर बजावले पाहिजे; पण ते आतमध्ये मात्र शिरता कामा नये. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवावे व बाहेर प्रपंचाचे कर्तव्य करावे.’ (श्री गोंदवलेकर महाराजयांचे चरित्र आणि वाङ्मय, पृ. ६९५)

संदर्भ : शिवपुराण, प्र. न. जोशी.

Leave a Comment