संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा

एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले. गौरीची व्यथा ऐकून त्यांनी अंतज्र्ञानाने शिवाचा शोध घेऊन त्याचे बसण्याचे ठिकाण तिला सांगितले. गौरीने शिवासमोर भिल्लिणीच्या वेषात जाऊन संगीतप्रधान नृत्याला सुरुवात केली.

त्या आवाजाने शिवाची समाधी उतरली. त्याने स्मित करत तिला विचारले, ‘‘शाबरी, तू मला दिव्यसमाधीतून जागृत का केलेस ?’’ तेव्हा शाबरी म्हणाली, ‘‘आपण वर्षभर मला सोडून या समाधीवस्थेत कसे राहिलात, या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे.’’ शिव म्हणाला, ‘‘सांगीन; परंतु आता इथे नाही. जेथे मानवाची वस्ती नसेल आणि जेथे ते रहस्य कुणी ऐकणार नाही, अशा ठिकाणी मी ते तुला सांगीन.’’ काही दिवस गेल्यावर गौरीने शिवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली. शिव तिला घेऊन निबिड जंगलात यमुनानदीच्या किनारी आला आणि ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागला; कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती.

त्याच वेळी यमुना नदीतील एका मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते. कवी नारायणांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवेश केला आणि तिचा गर्भ दिसामासी वाढू लागला. शिव सांगत असलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले. भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटातून म्हणाले, ‘सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहिले आहे, हेच आपल्या उपदेशाचे सार आहे.’

हे वाक्य ऐकताच कवी नारायण मत्स्यीच्या पोटी जन्म घेणार असल्याचे शंकराने ताडले आणि त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘मच्छिंद्रा, तुम्ही पुढे बदि्रकाश्रमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी दत्तात्रेयांच्या मुखातून तुम्हाला करवीन.’’ मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले.

त्यानंतर पूर्णमास भरताच मत्स्यीच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला.

Leave a Comment