वस्तू अर्पण करतांना तिच्या मूल्यापेक्षा त्या वेळी असणारा भाव महत्त्वाचा ! – गुरु गोविंदसिंह

१. राजा रघुनाथसिंहाने गुरु गोविंदसिंहांच्या चरणी रत्नजडित सोन्याची कंकणे अर्पण करणे

‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवूलागले. या सत्संगाला राजा रघुनाथसिंहसुद्धा आला होता. त्यांनीही गुरुचरणी रत्नजडित सोन्याची कंकणे ठेवली.

२. कंकण धूत असतांना ते पाण्यात पडणे आणित्या वेळी राजानेअमूल्य
कंकण पाण्यात पडल्याचे दुःख व्यक्त करून ते शोधण्यासाठी प्रयत्न करणे

गुरु गोविंदसिंह त्या कंकणांवर दृष्टी टाकत राजाला म्हणाले, ‘‘रघुनाथसिंह, सूर्याच्या प्रकाशात ही कंकणे किती चमकत आहेत. असे वाटते की,पाण्याने धुतल्यावर यांची चमक आणखीन वाढेल.’’ असे म्हणून गुरुगोविंदसिंह आसनावरून उठले आणि यमुना नदीत एक कंकण धुऊ लागले. त्या वेळी ते कंकण पाण्यात पडले.

रघुनाथसिंहच्या मुखातून अचानक निघाले, ‘‘अरेरे ! एवढे अमूल्य कंकण तुमच्या हातातून पडले! सोनाराने किती परिश्रमाने बनवले होते. त्याच्यासाठी पुष्कळ व्ययही केला होता.’’ असे म्हणत राजा रघुनाथसिंह कंकण शोधण्यासाठी यमुनेत उतरला. बरेच प्रयत्न केल्यावरही कंकण हाती लागले नाही. तेव्हा बाहेर येऊन त्यांनी गुरु गोविंदसिंहांना विचारले, ‘‘कृपया, कंकण कोठे पडले होते, हे तुम्ही सांगाल का ?’’

३. धन-वैभवाच्या प्रदर्शनासाठी राजा रघुनाथसिंहाने कंकण अर्पण केल्यामुळे गोविंदसिंहांनी दुसरे कंकणही यमुनेत फेकणे

राजा रघुनाथसिंह दक्षिणा ठेवायला आला होता, तेव्हाच गोविंदसिंहांना कळून चुकले होते की, स्वतःच्या धन-वैभवाच्या प्रदर्शनासाठीच रघुनाथसिंह कंकण घेऊन आला आहे. हातात असणारे दुसरे कंकणही यमुनेत फेकत ते म्हणाले, ‘‘जेथे हे कंकण पडेल, तेथेच पहिले पडलेआहे.’’ रघुनाथसिंहाचा अभिमान न्यून झाला आणि तो काहीही न बोलता आसनावर जाऊन बसला.

४. गुरु गोविंदसिंहांनी एका वृद्धेने प्रेमाने आणलेले दूध आणि फळे यांचा स्वीकार करणे

गुरु गोविंदसिंह चालत चालत श्रोत्यांच्या अंतिम ओळीत आले आणि एका वृद्धेजवळ जाऊन म्हणाले,‘‘आई, माझ्यासाठी काय आणले आहेस ?’’ क्षणभर ‘प्रत्यक्ष गुरु माझ्याजवळ आले आहेत’, यावरआजीचा विश्वासच बसेना. गोविंदसिंह पुन्हा म्हणाले, ‘‘आई, तुम्ही आणलेली वस्तू घेतांना मला आनंदहोईल.’’ आजीबाई अतिशय संकोचाने म्हणाल्या, ‘‘मी आणलेल्या वस्तू अत्यंत तुच्छ आहेत. आज घरातून येतांना ‘तुम्ही आमच्यासाठी सत्संग घेता. बोलल्यामुळे तुमच्या घशाला त्रास होत असेल. सत्संगाआधी थोडेसे दूध प्यायलात तर बरे वाटेल’, या विचाराने मी थोडेसे गाईचे दूध खडीसाखर घालून आणले आहेअन् थोडी फळेही आणली आहेत. तुमच्या चरणी ही लहानशी भेट अर्पण करण्याची इच्छा सत्संग चालू होण्याआधीच झाली होती; परंतु तुमच्या चरणी तर अमूल्य देणग्या येऊ लागल्या ! त्यातही सोन्याची कंकणे अर्पण झालेली पाहून मला ही भेट अतिशय सामान्य वाटली.’’ आजींकडे स्नेहाने पहात गुरुगोविंदसिंह म्हणाले, ‘‘माझ्यापुढे हा जो अमूल्य वस्तूंचा ढीग पडला आहे, त्यात सोन्या-चांदीचे अलंकारअवश्य असतील; परंतु आई, तुम्ही आणलेल्या दुधात जो गोडवा आहे, तो या वस्तूंमध्ये नाही !’’ एवढे बोलून गोविंदसिंहांनी आजीबार्इंच्या हातातील दुधाची लोटी घेतली आणि ते दूध पिऊ लागले. नंतर फळांची टोपलीही घेतली. आपण अर्पण केलेली भेट गुरूंनी स्वीकारलेली पाहून आजीचे डोळे हर्षाश्रूंनी भरले.

५. भेटवस्तूचे महत्त्व तिच्या मूल्यावरून नाही, तर ती देण्यामागे असणार्‍या भावावरून ठरणे

गुरु गोविदसिंह पुन्हा त्यांच्या आसनावर जाऊन बसले आणि म्हणाले, ‘‘भेटवस्तूचे महत्त्व तिच्या मूल्यावरून ठरत नाही, तर ती देण्यामागे असणार्‍या भावावरून ठरते. आज हे दूध पिऊन मला झालेल्याआनंदापुढे स्वर्गाचे सुखही तृणवत् आहे. त्यात मातेचे वात्सल्य होते. मातोश्री, तुमच्यासारखे भक्तच धर्माचा गौरव आहेत. तुम्ही माझा गुरुस्थानी आदर करत असला, तरी माझ्यासाठी तुम्ही पूजनीय आहात.’’

संदर्भ : ऋषी प्रसाद, डिसेंबर २००३

Leave a Comment