गुरु गोविंद सिंह – खालसा पंथाचे संस्थापक

शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. मुसलमानांचा प्रतिकार करावयास सांगितले नाही. शिखांचे ९ वे धर्मगुरु तेग बहाद्दूर यांनाही मोगलांनी हालहाल करून मारले.

शिखांचे १० वे गुरु, गुरु गोविंद सिंह यांनी अनेक वर्षे मोगलांकडून झालेले अन्याय सहन केले. मोगलांनी त्यांच्या वडिलांना क्रूरतेने मारले. मग त्यांनी सर्व शिखांना एकत्र करून प्रारंभी धर्मासाठी मरावयास सिद्ध असलेले ५ शिष्य निवडले. त्यांना ‘पंच प्यारे’, असे म्हणतात. त्यांनी धर्मयुद्ध करण्यासाठी ‘खालसा’ पंथाची स्थापना केली. ‘खालसा’ म्हणजे शुद्ध, पवित्र. खालसा पंथीय ही प्रार्थना करतात, ‘परमेश्वरा, मी योग्य कारणासाठीच लढीन. मी युद्धावर जातांना मला निर्भय बनव. ‘मी युद्धात जिंकेनच’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण कर. माझ्यात तुझ्या कीर्तनाची आवड निर्माण कर आणि मृत्यूसमयी तुझ्या चरणी विलीन करून घे.’ खालसा पंथ हा निरंकारी आहे. निरंकारी म्हणजे ईश्वराला निराकार मानणारा. याचा दुसरा अर्थ आहे ‘निरहंकार.’ ‘श्री’ हे देवीचे नाव आहे आणि भगवती म्हणजे तलवार. त्यांच्या योद्ध्यांना ‘संत-सिपाही’, असे म्हणतात.

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९१)

Leave a Comment