देशभक्त हरनामसिंह

         देशासाठी क्रांतीकार्य करणार्‍या अनेक क्रांतीकारकांपैकी एक असलेले देशभक्त हरनामसिंह यांचा त्यांच्या आज असलेल्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त अल्पपरिचय…

१. कॅनडात ‘दी हिंदुस्थान’ या पत्राच्या माध्यमातून बाँबविद्येचा प्रसार करणारे  हरनामसिंह

         कॅनडा येथे उद्योगधंद्यासाठी गेलेल्या हरनामसिंहानी ‘दी हिंदुस्थान’ नावाचे पत्र चालू केले. हरनामसिंह अत्यंत प्रभावी लेखक होते. या पत्राचा कॅनडातील भारतियांवर पुष्कळ प्रभाव पडला. कॅनेडियन शासनाने हरनामसिंहावर बाँब बनवणे आणि ते शिकवणे, विद्रोही प्रचार करणे, असे आरोप ठेवून ४८ घंट्यांत कॅनडा सोडण्यास भाग पाडले.

२. ‘गदर’ पत्राचा निरनिराळ्या देशांत प्रचार करणारे देशाभिमानी हरनामसिंह

          हरनामसिंहाचे मित्र रेमिस्बर्ग यांनी स्वतःच्या बोटीतून हरनामसिंहाना अमेरिकेत आणले. हरनामसिंह अमेरिकेत ‘गदर’ पत्राला साहाय्य करू लागले. ‘कोमागाटामारू जहाज’ प्रकरणानंतर हरनामसिंहानी अमेरिका सोडली. चीन, जपान आणि सयाम (थायलंड) या देशांत ‘गदर’चा प्रचार करत ते ब्रह्मदेशात प्रविष्ट झाले.

३. क्रांतीकार्यासाठी फाशीची शिक्षा

         ख्रिस्ताब्द १९१५ मध्ये सिंगापूर येथील उठाव फसल्यावर मोठ्या प्रमाणात धरपकड चालू झाली. त्यामुळे अनेक नेते ब्रह्मदेशात प्रविष्ट झाले. मधेच झालेल्या धरपकडीमुळे हरनामसिंहाना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. कारागृहातून हरनामसिंहानी पलायन केले. त्यांना पुन्हा पकडून फासावर चढवण्यात आले, तो दिवस होता १९ ऑक्टोबर १९१६ !

         हरनामसिंह आणि त्यांचे क्रांतीकारी मित्र भाई भागासिंग, भाई बलवंतसिंह आणि हरनामसिंह हे तिघेही एकापाठोपाठ देशकार्यासाठी अजरामर झाले.’

संदर्भ : ‘दैनिक लोकमत’, ११.५.२००७

Leave a Comment