प्रश्नाचा निषेध करून तडक सभागृहामधून बाहेर पडणारे राष्ट्राभिमानी सुभाषचंद्र बोस !

‘नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आय्.सी.एस्.’ची परीक्षा इंग्लंडला देऊन भारतात परत आले. त्यानंतर त्यांना एका लेखी परीक्षेस बसावे लागले. परीक्षेची प्रश्नपत्रिका पहाताच सुभाषबाबू एकदम संतापलेच. त्या प्रश्नपत्रिकेत भाषांतरासाठी एक परिच्छेद दिला होता.

त्या परिच्छेदात पुढील ओळ होती. ‘Indian Soldiers are generally dishonest’ ‘भारतीय सैनिक सामान्यतः अप्रामाणिक असतात’, अशा प्रकारचे भाषांतर उमेदवाराला करायचे होते. सुभाषबाबूंनी त्या प्रश्नाचा निषेध केला. परीक्षा चालकांना तो प्रश्न रहित करण्याची विनंती केली. ‘हा प्रश्न सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. जो कोणी हा प्रश्न सोडवणार नाही, त्याला उच्चपदी नोकरी मिळणार नाही’, असे संचालकांनी उत्तर दिले. त्यांचे ते उत्तर ऐकून सुभाषचंद्रांना राग अनावर झाला. त्यांनी ती प्रश्नपत्रिका फाडून टाकली. ते संचालकांना म्हणाले, ‘‘आग लागो तुमच्या नोकरीला ! माझ्या देशबांधवांवरील असा खोटा आरोप सहन करण्यापेक्षा मी भुकेने मेलो, तरी चालेल. अशी लाचारी पत्करण्यापेक्षा मरण श्रेष्ठ !’’ सुभाषबाबू त्या परीक्षा सभागृहामधून तडक बाहेर पडले.

तात्पर्य : स्वहितापेक्षा स्वदेश अधिक महत्त्वाचा असतो.

विचार : जो आपल्या मातृभूमीवर प्रेम करू शकत नाही, तो कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही.’

संदर्भ : ‘अशी मूल्ये असे संस्कार’, संपादक : प्रकाश अर्जुन राणे

Leave a Comment