भक्त शिरोमणी संत नरसी मेहता आणि ‘केदार’ रागाची किमया !

‘वैष्णव जन तो’ या पावन पंक्ती लिहिणारे म्हणजे भक्त शिरोमणी संत नरसी मेहता !

देवाचे नाव देहभान विसरून सुरेखपणे आळवणे हाच त्यांचा छंद, ब्रह्मानंद होता. भजन आळवतांना केदार रागात ते रंगून जात. या एका रागाच्या रसमोहिनीने प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांना अंकित झाला होता.या रागाने त्यांनी अनेकांचे दुःख दूर केले. कित्येकांचे सुख वाढवले होते. या रागाच्या स्वरांनी सर्पदंश झालेल्या एका हरिजन बालकाचा प्राण परत आला होता. एकदा एक भला संसारी ब्राह्मण नरसीकडे आला. मुलीच्या लग्नाला लागणारे द्रव्य कोठून आणणार ही त्याची चिंता होती. नरसीची महती त्याने ऐकली होती. तो या भक्तश्रेष्ठाला शरण आला. नरसीने त्याला विचारले, ‘‘किती द्रव्य हवे ?’’ ब्राह्मण भीत भीत उत्तरला, ‘‘५०० रुपये.’’ त्यांनी सावकाराचे घर गाठले. लोभी आणि चाणाक्ष सावकाराला नरसीचे भक्तीवैभव ठाऊक होते. त्याची केदार रागाची कीर्ती कानी होती. तो म्हणाला, ‘‘पैसे देतो; पण तारण काय ?’’ सावकाराने तोड सुचवली, ‘‘तुझा राग केदार गहाण ठेव. पैसे देतो.’’

संत नरसी मेहता यांच्याजवळ तीच एक मूल्यवान वस्तू होती. तरीही ‘आता श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष दर्शनाला मुकणार. जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद हरवून बसणार’, हा विचार त्यांच्या मनात नव्हता. त्यांनी म्हटले, ‘‘केदार राग गहाण ठेवा; पण ब्राह्मणाला धन द्या.’’ ‘व्याजासकट पैसे फिटेपर्यंत नरसी केदार राग चुकून आळवायचा नाही’, ही प्रमुख अट होती. मंगल कार्य झाले. त्या आनंदापुढे आपल्या हानीची संत नरसी यांना खंतच वाटली नाही.केदार रागावाचून भजन, कीर्तन चालू राहिले; पण रस जमेना, वृत्ती रंगेना. देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाशिवाय हृदयाची व्याकुळता शमेना. दिवसामागून दिवस जाऊ गेले; पण पैसा मिळेना. सावकाराचे देणे फिटेना आणि केदार राग बंधनमुक्त झाल्यावाचून नरसींना शांती लाभेना. त्याचवेळी निंदकांनीही त्यांची भक्ती थोतांड असल्याचे आरोप केले.

राजाने नरसींना पाचारिले. त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरले – ‘राजवाड्यातील एका दालनात श्रीकृष्णाची एक मूर्ती ठेवण्यात आली. त्या मूर्तीच्या हाती एक पुष्पहार देण्यात आला. त्या मूर्तीपुढे नरसींनी आपले भजन, कीर्तन करावे. श्रीकृष्णाने सजीव होऊन नरसींच्या गळ्यात पुष्पहार घालावा. ही गोष्ट विशिष्ट कालावधीत घडून आली नाही, तर नरसीवरचे आरोप खरे समजून शासन केले जाईल.’ अशी राजाज्ञा नरसींना ऐकवण्यात आली. नरसी अविचल! ते म्हणाले, ‘‘प्रभूची इच्छा असेल तसे होईल.’’

नरसींनी श्रीकृष्णापुढे आसन घातले, टाळवीणा घेतली. ‘नरसींची भक्ती खरी कि निंदकांची पाशवी शक्ती खरी’, हा निर्णय लागावयाचा होता. नटनागराला भक्तांची परीक्षा पहाण्याची हौस ! नरसींसाठी प्रकट होणे, श्रीकृष्णाला अशक्य का होते ! केदार राग आळवल्याविना श्रीहरीने जागचे हलूच नये, इतकी संत नरसी मेहता यांची साधना भक्ती पांगळी-दुबळी होती ? घटका सरत होती. पळे पळत होती. मध्यरात्र जवळ आली. नरसींच्या कसोटीचा क्षण दूर नव्हता. विरोधकांच्या आशा पालवल्या.त्याच वेळी नगरात चमत्कार झाला. सावकाराच्या दारावर थाप पडली. नरसी मेहता यांची हाक त्याच्या कानी पडली, ‘‘कृपा करा दार उघडा.’’ सावकाराने स्वागत केले. नरसींनी व्याज आणि मुद्दल ठेवले आणि म्हटले, ‘‘पैसे परत करण्यास उशीर झाला. क्षमस्व. ‘केदार’ राग मोकळा झाला अशी पावती द्या.’’ सावकाराने पैसे घेतले करारपत्र काढले. पैसे पोचण्याची स्वाक्षरी करून कागद संत नरसी मेहता यांच्या स्वाधीन केला.

इकडे भजन करतांना संत नरसी मेहता यांनी सहज डोळे उघडून कृष्णमूर्तीकडे पाहिले. तेवढ्यात एक कागद त्याच्यासमोर अलगद आला. व्याजमुद्दल पोहोचल्याची सावकाराची स्वाक्षरी असलेले ते करारपत्र पाहून नरसी चकित झाले! त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. श्रीकृष्णाची लीला अगाध होती. त्यांचा केदार मुक्त झाला होता ! नरसींनी केदार रागात भजन आळवण्यास आरंभ केला. केदाराच्या स्वरांनी एक वेगळेच दिव्य स्वरभावविश्व निर्माण केले. श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती एक तेजोवलय निर्माण झाले. निंदकांच्या उरात धडकी ! नरसींच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. इतका वेळ जड अचेतन असलेली श्रीकृष्णमूर्ती सजीव झाली आणि आपल्या हातातील पुष्पमाला नरसींच्या गळ्यात घालण्यासाठी पुढे सरकू लागली.

केदारच्या स्वलहरींनी प्रसन्न झालेल्या भक्तांची लाज राखणारे गिरधर नागर आपल्या भक्ताच्या गळ्यात माळ घालून क्षणार्धात अंतर्धान पावले !

– डॉ. स्वरूपा महेंद्र कुर्डेकर