देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. ती असे न करण्यासाठी विनवत होती; पण त्याचा काहीएक परिणाम त्यांच्यावर झाला नाही. द्रौपदीला वाटले, ‘माझे पाच पती आहेत. संपूर्ण जगाला ते भारी आहेत. ते माझे नक्कीच रक्षण करतील.’ तिने युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या सर्वांना साहाय्य करण्याची विनंती केली; पण कोणीच पुढे आले नाही. तिने सर्व ज्येष्ठांनाही हाक मारली; परंतु सगळे माना खाली घालून बसले होते. शेवटी तिने श्रीकृष्णाला हाक मारली. तो लगेच धावून आला. तिला वस्त्रे पुरवली आणि तिचे रक्षण केले. तिने श्रीकृष्णाला विचारले, ‘‘देवा, मी संकटात असल्याचे कळूनही तू मला साहाय्य करण्यास का आला नाहीस ?’’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तुला तुझ्या पतींवर विश्वास होता ना, तू त्यांना बोलावले; मग मी कसा येणार ? तू मला हाक मारताच मी आलो.’’ द्रौपदीने श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

तात्पर्य : देवाविना आपले कोणी नसते़ आपण ज्यांना आपले म्हणतो, तेही साहाय्याच्या वेळी येत नाही. एखाद्याला पुनःपुन्हा हाक मारली, तर एकदातरी त्या व्यक्तीला वळून मागे बघावेच लागते. देव मात्र एका हाकेला धावून येतो; पण आम्ही त्याला सोडून सर्वांना हाक मारत बसतो. आपण देवाला सतत हाक मारली, तर तो सतत आपल्यासमवेत राहाणार नाही का ? मग आतापासून नामजप करणार ना ?

Leave a Comment