मेवाड येथील शिसोदीया राजवंशातील
शूर राजपूत राजे : बाप्पा रावळ आणि राणासंग

मेवाडचे शूर राजपूत राजे

मेवाडच्या भूमीवर घडलेला इतिहास आणि चित्तोड, उदेपूर, हळदी घाट ही धर्मक्षेत्रे त्यांच्या तेजस्वी परंपरेने चिरकाल अमर रहातील इतकी त्यांची महती आहे. पंजाब, हरियाना, सिंध आणि राजस्थान या चार प्रांतांतील लाखो शूर-वीरांनी शेकडो वर्षे युद्ध करून धर्मासाठी बलीदान करण्याची उच्च परंपरा निर्माण केली. हीच परंपरा `शिसोदीया’ राजवंशाने राजस्थानात आणि शिवछत्रपतींच्या रूपाने महाराष्ट्रात कायम ठेवली. मेवाडमध्ये हा एकच राजवंश शेवटपर्यंत परकियांशी लढून यशस्वी झाला. या परंपरेतील श्रेष्ठ वीर पुरुषांचा परिचय आपण थोडक्यात पाहू.

बाप्पा रावळ


ख्रिस्ताब्द ७३५ मध्ये सर्व अरबांनी मिळून मेवाडवर स्वारी केली. त्या वेळी शिसोदीया वंशातील बाप्पा रावळ यांनी त्यांच्याशी घनघोर युद्ध करून त्यांना पिटाळून लावले. त्यांच्या प्रांतात जाऊन तेथे आपली दहशत बसवली आणि त्या सर्व अरबांना आपले मांडलिक बनवले. या युद्धामुळे भारतावर ३०० वर्षांपर्यंत स्वारी न करण्याइतकी आणि राजपुतांच्या वाटेला न जाण्याइतकी परकियांना दहशत बसली.

राणासंग


दिल्लीवर मोगल बादशहा बाबर याचे राज्य होते. त्या वेळी मेवाडच्या शिसोदीया वंशातीलच राणासंगाने राजस्थान, पंजाब आणि सिंध येथे आपला दरारा बसवून दिल्लीतील परकीय सत्ता उखडण्याचा प्रयत्न चालू केला. बाबराला याची कुणकुण लागली आणि त्याने ख्रिस्ताब्द १५२७ मध्ये राणासंगाशी मोठे युद्ध करून त्याचा पराभव केला. त्यामुळे हिंदवी राज्याऐवजी मोगलांचे राज्य बलवान होण्यास साहाय्य झाले. असे असले, तरी बाबराच्या मनात राजपुतांविषयी दहशत निर्माण झाली आणि नंतर त्याने राजपुतांशी संघर्ष टाळला. या पराभवाने खचून न जाता राणासंगाने पुन्हा युद्धाची सिद्धता चालू केली; पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.