भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध राजे :
हरिहर आणि बुक्कराय !

`शंकराचार्य विद्यारण्यस्वामी’ यांच्या मार्गदर्शनाखाली साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे राजे : हरिहर आणि बुक्कराय !

स्वतंत्र विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे राजे

`दक्षिण भारतात धुमाकूळ घालणाऱ्या मुघल आक्रमकांना निस्तेज करून `शंकराचार्य विद्यारण्यस्वामी’ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय हे भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध राजे होत. त्यांनी ख्रिस्ताब्द १३३६ ते १३७६ अशी ४१ वर्षे विजयनगरवर राज्य केले आणि वैभवशाली हिंदु साम्राज्याचा पाया रचला. दक्षिण भारताच्या इतिहासात अजरामर झालेले विजयनगर हे तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

यादव कुळातील संगमा हे `होसला’ राजवंशातील राजसभेत राज्यभूपती (जहागीरदार) होते. त्यांना हरिहर, बुक्का, कांपण्णा, मारप्पा आणि मुदप्पा असे पाच पुत्र होते. विजयनगरचे साम्राज्य स्थापण्याचे श्रेय संगमा यांच्या या पाच सुपुत्रांनाच जाते. या पाच भावांपैकी, हरिहर आणि बुक्कराय या दोघांनी विशेष काम केल्यामुळे इतिहासात त्यांच्या नावाचा विशेष उल्लेख आढळतो. विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या चार राजघराण्यांपैकी `संगमा’ हे पहिले होते.

हिंदु साम्राज्यासाठी केलेले योगदान

१४ व्या शतकात दक्षिणेत मुघल राज्यकर्ते विशेष आक्रमक बनले होते. होसला, सिना आणि ककटीय ही तत्कालीन सामर्थ्यवान अशी साम्राज्ये मुघलांनी हस्तगत केली होती. अशा कठीण प्रसंगी शंकराचार्य विद्यारण्यस्वामी आणि संत सयना यांच्या प्रेरणेने हरिहर अन् बुक्कराय यांनी मुघल आक्रमकांना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

हरिहर आणि बुक्कराय यांना महम्मद बीन तुगलक याने खरेतर मुसलमान बनवले होते; परंतु संतांच्या कृपेने त्यांनी परत हिंदु धर्म स्वीकारला आणि सुसज्ज लष्करी सेना स्थापन करून दक्षिण भारतात धुमाकूळ घालणाऱ्या मुघल आक्रमकांना निस्तेज करत हिंदु साम्राज्य स्थापन केले. हरिहर हा नव्याने स्थापलेल्या साम्राज्याचा पहिला राजा होता.

हरिहर यांच्या निधनानंतर िख्र्तासब्द १३५६ ते १३७७ पर्यंत सम्राट बुक्कराय यांनी राज्य केले. सम्राट बुक्कराय यांचा सुपुत्र कुमार कंपण्णा याने मदुरेच्या सुलतानाशी केलेल्या घनघोर लढाईत सुलतान मारला गेला आणि दक्षिण भारत बुक्करायांच्या अधिपत्याखाली आला. बुक्कराय हे एक समर्थ राजा होते. सम्राट बुक्करायांनी बहामनी सुलतानाशी दोन वेळा युद्ध केले. महंम्मद-१ याच्या कार्यकाळात पहिले, तर मुजाहिद याच्या कार्यकाळात दुसरे. त्यांनी गोवा प्रांतही जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणला होता. मलबार आणि श्रीलंका यांच्या तत्कालीन राजांनी तर त्यांचे सार्वभौमत्व मान्य करून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध राखले होते.

सम्राट बुक्कराय यांनी वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी देशभरातील विद्वानांना एकत्र करून वेदग्रंथांवर नवी भाष्ये लिहून घेतली आणि हिंदु धर्मात बळावलेल्या दुष्प्रवृत्तींना आळा घातला.’ बुक्कराय यांच्या निधनानंतर `हरिहर दोन’ (हरिहर यांचा मुलगा) याने त्यांची गादी पुढे चालवली.’