मुलांनो स्वतःमध्ये राष्ट्रप्रेम वाढवा !

मुलांनो, जसे तुमच्या घरात कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही छोटी-मोठी कामे करता, त्याचप्रमाणे ज्या देशात तुम्ही रहाता, त्या देशाप्रतीही तुमची काही कर्तव्ये आहेत. ही कर्तव्ये पार पाडायची असतील, तर प्रथम तुमच्यात राष्ट्राभिमान निर्माण व्हायला हवा.

मुलांनो, स्वतःमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान
निर्माण होण्याच्या उद्देशाने विविध देशभक्तीपर गीते म्हणण्यास शिका !

अ. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फाशी जाणार्‍या क्रांतीकारकांच्या तोंडी ‘वन्दे मातरम्’ हेच शब्द असायचे. त्यामुळे ‘वन्दे मातरम्’ हे गीत म्हणतांना क्रांतीकारकांच्या बलीदानाची आठवण होते. हे गीत संस्कृतप्रचुर असल्याने त्यातील चैतन्याचा म्हणणार्‍याला आणि ऐकणार्‍याला लाभ होतो. मुलांनी या गीताची सर्व कडवी तोंडपाठ करून ते गीत चालीत म्हणण्यास शिकावे.

आ. ‘शिवकल्याण राजा’, ‘माझे राष्ट्र महान’ यांसारख्या ध्वनी-चकत्या (सीडी) / ध्वनीफीती (कॅसेट) यांतील राष्ट्रभक्तीपर गीते ऐकावीत आणि पाठ करून म्हणावीत.

शाळेत किंवा इतर ठिकाणी समूहगीतांच्या स्पर्धा असतील, तेव्हा ‘वन्दे मातरम्’ हे गीत, तसेच अन्य देशभक्तीपर गीतेच ‘समूहगीते’ म्हणून सादर करावीत. एकत्रित येऊन देशभक्तीपर गीते म्हटल्याने मुलांमध्ये संघटितपणा निर्माण होतो.

अशी काही गीते balsanskar.com च्या पुढील मार्गिकेवर (लिंकवर) ऐकण्यास मिळतील – https://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/cid_65.html

पोवाडे

छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य शूरांच्या स्फूर्तीदायी चरित्रांची माहिती होण्यासाठी आणि त्यांच्या पराक्रमी इतिहासाचे स्मरण होण्यासाठी पोवाडे म्हणण्यास शिकावेत. पोवाड्यांमुळे क्षात्रवृत्ती निर्माण होऊन राष्ट्रभक्तीचा संस्कारही होतो.

राष्ट्र, धर्म आणि साधना या विषयांवरील कविता

दैनिक किंवा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्र, धर्म आणि साधना या विषयांवर अनेक कविता प्रसिद्ध होतात. या कवितांना चाली लावून त्या म्हणाव्यात. यामुळे मुलांना आणि इतरांना राष्ट्र अन् धर्म यांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.

देशभक्तीपर गीत म्हटल्यामुळे जनमानसावर होणारा परिणाम

१. भजने, आरत्या, पाळणा, देशभक्तीपर गीते, क्षात्रगीते, पोवाडे इत्यादी शिकत किंवा म्हणत असतांना त्यांचा अर्थ समजून घ्यावा.

२. देवतेप्रती भाव असणार्‍या विध्यार्थ्याने भक्तीगीत म्हटले, तर ते ऐकणार्‍यांमधील भाव जागृत करते. त्याचप्रमाणे देशाविषयी प्रेम असलेल्या विध्यार्थ्याने देशभक्तीपर गीत म्हटले, तर ते ऐकणार्‍यांमधील देशप्रेम जागृत करते.

(अशी गीते या संकेतस्थळावर ‘स्फूर्तीगीते’ या सदराखाली उपलब्ध आहेत.)

स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि अन्य कार्यक्रम यांमधून
देवभक्ती अन् राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते म्हणणे, तसेच
इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणे, हे राष्ट्रभक्तीचेच लक्षण होय !

मुलांनो, ठिकठिकाणच्या गाण्यांच्या स्पर्धा, शाळेचे स्नेहसंमेलन किंवा अन्य कार्यक्रम यांमध्ये भजने, भक्तीगीते, देशभक्तीपर गीते, क्षात्रगीते किंवा पोवाडे म्हणावेत. ‘ऑर्केस्ट्रा’सारखे कार्यक्रम ठेवणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे यांचे प्रबोधन करणे अन् त्यांना देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते सादर करण्याची विनंती करणे हे राष्ट्रप्रेमाचेच लक्षण आहे.

सार्वजनिक ठिकाणीही देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते सादर केल्याने तुमचा राष्ट्राभिमान अन् धर्माभिमान वाढेल आणि वृत्ती सात्त्विक होईलच; पण समाजासमोरही नीतीमत्ताहीन नट-नट्यांचा आदर्श रहाण्यापेक्षा संत, राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचा आदर्श राहील.