७. श्रीक्षेत्र बहे – बोरगाव

कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे – बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांवचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे. इथली मूर्ती ही भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहात ‘रामलिंग’ नावाचे एक प्राचीन बेट आहे. या बेटावर राममंदिर आहे. या राममंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना शके १५७३ मध्ये समर्थांनी केलेली आहे. मंदिर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य ठिकाणी आहे.

रावणवध करून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला असे म्हटले जाते. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करीत असताना सुचले असेही म्हटले जाते. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी निसर्गसृष्टीने बहरलेला व अगदी रम्य असा इथला परिसर आहे. मारुती मंदिराबरोबरच या कृष्णा नदीत अनेक लहान-लहान बेटे व अनेक समाधी इथे आहेत. कृष्ण-माहात्म्यात ‘बाहुक्षेत्र’ असा या स्थानाचा उल्लेख आढळतो. या बेटापासून ‘मच्छिंद्र’ गड जवळच आहे.