१. श्रीक्षेत्र शहापूर

शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणजे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी पहिला मारुती आहे. अकरा मारुतींच्या स्थापनेच्या कालावधीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, पण ‘पहिला मारुती शहापूरचाच’ याबाबत सर्वांचे एकमत असल्याचे आढळते. मूर्तीची उंची सुमारे ६ फूट असून मूर्तीचा चेहरा उग्र वाटणारा आहे. मारुतीच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे. मंदिर व मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. देवळाला तीन चौकटी आहेत. शहापूरकर कुलकर्णी यांच्या घराण्याकडे मूर्तीची व्यवस्था आहे. याठिकाणी चैत्र शु. १५ व्या तिथीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मुख्य मूर्तीबरोबरच मंदिरात एक लहानशी पितळी उत्सवमूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती चाफळच्या रामनवमीच्या उत्सवात, तेथील मंदिरात दरवर्षी आणलीच जाते.

शहापूरच्या मारुतीची स्थापना शके १५६६ साली केली गेली. कर्‍हाड – मसूर या रत्स्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि. मी. अंतरावर शहापूरला जाण्यासाठी रस्ता आहे. मंदिर गावाच्या एका बाजूला असून कृष्णा नदीच्या तीरावर आहे.

Leave a Comment