३. चाफळचे दोन मारुती

चाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली व जवळच असलेल्या चाफळला आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराचे बांधकाम शके १५६९ पूर्ण झाले. समर्थांना ज्या वेळी श्रीरामाने दृष्टांत देऊन अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी माहिती दिली, त्याच वेळेस मारुतीनेही समर्थांना दृष्टांत दिला की, ‘माझी मूर्ती श्रीरामाच्या समोर स्थापन कर.’ त्याप्रमाणे श्रीरामाच्या मंदिरात हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० मध्ये समर्थांनी केली. (चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.)

अ. दासमारुती


दोन्ही हात जोडून उभी असलेली नम्र मारुतीची मूर्ती म्हणजे अकरा मारुतींपैकी दासमारुती होय. ६ फूट उंच असलेल्या मारुतीच्या चेहर्‍यावर विनम्र असे भाव आहेत. समोरच उभ्या असलेल्या श्रीरामाच्या चरणांवर मारुतीची दृष्टी आहे. मूर्ती अत्यंत रेखीव आहे.

मंदिर अतिशय सुंदर असून आजुबाजुच्या परिसरात प्रसन्न वातावरण आहे. सुमारे ३६० वर्षांपूर्वी समर्थांनी बांधलेले दासमारुतीचे मंदिर आजतागायत चांगल्या स्थितीत आहे. मंदिर एवढे भक्कम आहे की, १९६७ साली झालेल्या भूकंपातही या मंदिरास एक तडाही गेला नाही.

ब. प्रतापमारुती

प्रताप मारूती

प्रताप मारूती

अकरा मारुतींपैकी हा महत्त्वाचा मारुती आणि चाफळमधील हा दुसरा मारुती होय. भीममारुती, प्रतापमारुती किंवा वीर मारुती अशी तीन नावांनी हा मारुती ओळखला जातो. मूर्ती जवळजवळ आठ फूट उंच आहे. मारुती स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे ही मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. कंबरेभोवती सुवर्णाची कासोटी असून तिला छोट्या घंटा जोडलेल्या आहेत. (सुवर्ण कटि कासोटी, घंटा किणकिणी…) मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. भक्तांच्या श्रद्धापूर्वक प्रार्थनेला पावणारा व दुष्टांचा संहार करणारा हा भीमरूपी मारुती एक जागृत देवस्थान आहे.

समर्थ रामदास जेव्हा या मठात राहत असत, तेव्हा या मंदिरातील मूर्तीपाशी बराच वेळ बसून राहत असे म्हटले जाते. चाफळ गावावरील कोणतेही संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात ह्या मारुतीला महारुद्राभिषेक करण्यात येतो.

चाफळमधील या दोन्हीही प्रसिद्ध मारुतींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बसेसची सोय आहे. भाविकांना मंदिराच्या परिसरात उत्तम प्रकारची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.