५. श्रीक्षेत्र उंब्रज

मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर उंब्रज हे ठिकाण आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी वयाने लहान वाटणार्‍या या मारुतीस ‘बालमारुती’ म्हणतात. या मूर्तीची उंची सुमारे ६ फुट असून मूर्ती आकर्षक आहे. मूर्ती चुना, वाळू व ताग या तिन्हीच्या मिश्रणातून बनवलेली आहे. मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. या मारुतीला ‘उंब्रजचा मारुती’ किंवा ‘मठातील मारुती’ असेही म्हणतात. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला कळस नाही.उंब्रजच्या मारुतीची स्थापना शके १५७१ मध्ये केली गेली.

‘विश्रामधाम’ या ग्रंथातील उल्लेखानुसार या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थ रामदास स्वामींनी येथे सलग १३ दिवस कीर्तन केले. या मूर्तीच्या स्थापनेसंबंधी असेही म्हटले जाते की, चाफळहून समर्थ रामदास स्वामी उंब्रजला स्नान करण्यासाठी येत असत, म्हणून या मारुतीची स्थापना केली असावी. मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते. परिसर अतिशय पवित्र व मंगलमय आहे. चैत्र शुद्ध १५ ला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. हनुमान जयंतीच्या १ दिवस आधी इथे ‘सांप्रदायिक भिक्षेचा’ कार्यक्रम होतो.