त्याग

७०-८० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विनू नावाचा एक ६-७ वीतला मुलगा होता. तो मोठ्या वाड्यात राहायचा. त्या वाड्याच्या परसात फणसाचे झाड होते. एकदा त्या झाडाला मोठमोठे फणस लागले. विनूच्या आईने पिकलेले फणस झाडावरून काढून त्याचे गरे काढले. मग तिने विनूला पाच द्रोण आणायला सांगितले. त्या पाच द्रोणामध्ये तिने थोडे थोडे फणसाचे गरे घातले. आता विनूला काय वाटले, पहिला द्रोण आई मलाच देणार. आईने सांगितले, ‘जा हा द्रोण देवापुढे ठेऊन देवाला नमस्कार करून ये.’ विनूने तसे केले. आता आई मलाच देणार तेवढ्यात आई म्हणाली, ”हा द्रोण शेजारच्या काकूंना नेऊन दे.” नंतर उरलेल्या दोन पैकी एक द्रोण आईने विनूला दिला आणि म्हणाली, ”हा द्रोण गल्लीतील त्या काकूंना देऊन ये.” शेवटी विनू रागावला आता हा शेवटचा द्रोण कोणासाठी असेल असे त्याला वाटले; पण तेवढ्यात आईने शेवटच्या द्रोणातील एक गरा विनूला भरवला. तेव्हा विनू म्हणाला, ”काय ग आई आपल्या घरचा फणस गावाला आधी आणि मला शेवटी होय, का असे केलेस ?” तेव्हा आई म्हणाली, ”विनू आपल्याला फणस कोणी दिला ? त्या झाडाने. ते झाड आपल्या दारात कसे वाढले ? देवानेच दिले ना ते आपल्याला ? मग केवळ आपणच त्याची फळे खायची ?” तेव्हापासून कधीही विनूने मी, मला, माझे असे केले नाही; म्हणूनच तो विनू म्हणजे आचार्य विनोबा भावे देवाचे भक्त बनले. संस्कृतमधील भगवद्गीता त्यांनी मराठीत लिहिली. ती म्हणजे गीताई.

मुलांनो, आपल्यालाही देवासारखे व्हायचे आहे ना ! मग आपणही दुसऱ्यांना साहाय्य करायचे, भांडायचे नाही. आपल्याला काही चांगले मिळाले की, इतरांना द्यायचे.

Leave a Comment