‘भारतात सुराज्य स्थापन करणे’, हेच खरे ‘करियर’

रामराज्यात एके ठिकाणी असे वर्णन केले आहे, ‘अलंकार घातलेली स्त्री रात्रीच्या वेळीही मार्गावरून (रस्त्यावरून) एकटी फिरू शकत असे.’ रामराज्यात ते शक्य होते; कारण रामराज्य हे आदर्श राज्य होते. रामराज्य हे आदर्श होते; कारण रामराज्यातील राजा आणि प्रजा धर्माचरणी होती. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोगलांनी केलेली हानी भरून काढण्यासाठी सुरतेची लूट केली, हा इतिहास तुम्ही जाणतच आहात. छ. शिवाजी महाराज आणि मावळे यांनी त्या लुटीचा एक अंशसुद्धा स्वतःसाठी ठेवला नाही, तर सर्व स्वराज्यासाठी दिला. मावळे हे करू शकले; कारण ते राष्ट्रभक्त होते. मुलांनो, प्रतिदिन दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रे यांत आपल्याला काय दिसते ? सर्वत्र चोऱ्या, भ्रष्टाचार, स्त्रियांवर अत्याचार, देवळांतील मूर्तींची तोडफोड, देवतांचे विडंबन… हेच सारे पहायला मिळते ना ? देशातील बहुसंख्य जनता धर्माचरणी आणि राष्ट्रभक्त नसल्यामुळेच अशी स्थिती ओढवली आहे.

मुलांनो, उद्याचा आदर्श भारत घडवणे, हे तुमच्या हाती आहे. चला तर, धर्माचरणी आणि राष्ट्रभक्त बनून तुम्ही याचा शुभारंभ करणार ना ?

मुलांनो, तुम्ही मोठेपणी डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ व्हायचे ध्येय ठेवले असेल ना ? हे ध्येय चांगले आहे; पण जरा विचार करा, ‘आज पुष्कळ देणगी (डोनेशन) न देता शाळा-महाविद्यालयांत प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून; परंतु लाच न देता मोठमोठ्या परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण झाले आहे.’ अशा परिस्थितीत काय तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल ? केवळ भ्रष्टाचारच नव्हे, तर बेकारी, दारिद्य्र अशा अनेक समस्या देशात आहेत. शत्रूराष्ट्रांच्या आक्रमणांचा धोका तर आहेच. मुलांनो, अशा वेळी तुम्ही तुमच्या ‘करियर’कडे (भविष्याकडे) लक्ष देण्यासह देशाच्या भविष्याकडे लक्ष देणेही तेवढेच आवश्यक बनले आहे. लो. टिळक, स्वा. सावरकर यांनी जर शिक्षण घेऊन मोठेपणी स्वतःचे ‘करियर’च केले असते, तर हिंदुस्थान स्वतंत्र झाला असता का ? स्वामी विवेकानंदांनी जर मोठेपणी स्वतःचे ‘करियर’च केले असते, तर हिंदु धर्माचे रक्षण झाले असते का ?

मुलांनो, तुम्ही राष्ट्रपुरुष, संत आणि राम-कृष्ण यांसारख्या देवता यांचा आदर्श ठेवला, धर्माचरण केले, नैतिक मूल्यांची जपणूक करून शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्र अन् धर्म यांच्या सेवेसाठी केला, तर भारतात पुन्हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे ‘हिंदवी स्वराज्य’ (हिंदू राष्ट्र, आदर्श राज्य, रामराज्य) निश्चितच स्थापन होईल. असे ‘सुराज्य स्थापन करणे’, हेच तुमचे खरे ‘करियर’ आहे !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

Leave a Comment