Menu Close

‘महाराज’ चित्रपटामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ‘नेटफ्लिक्स’, ‘यशराज फिल्म्स’ उत्तरदायी !

हिंदु संतांना दुराचारी दाखवल्याच्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी !

हिंदु संतांची बहुसंख्य हिंदूंच्या देशात अपकीर्ती करणार्‍या चित्रपटांना प्रक्षेपणाची अनुमती मिळणे निषेधार्ह ! – संपादक 

डावीकडून विलास निकम, विनायक शिंदे, मनीष सैनी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, निवेदन स्वीकारतांना ‘नेटफ्लिक्स’चे प्रतिनिधी, शेवटी समितीचे बळवंत पाठक आणि रवींद्र दासरी

मुंबई – हिंदूंच्या संतांना जाणीवपूर्वक दुराचारी, वासनांध दाखवणार्‍या ‘महाराज’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. या चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी न घातल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला यशराज फिल्म, नेटफ्लिक्स, आमीर खान आणि जुनैद खान हे उत्तरदायी असतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे. याविषयी १३ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीने ‘नेटफ्लिक्स’ आस्थापनाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन चित्रपटाचे प्रक्षेपण बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मुंबईतील ‘नेटफ्लिक्स’च्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असतांना त्यांना आणि ‘नेटफ्लिक्स’चे प्रतिनिधी यांना पोलिसांनी बीकेसी येथील पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, ‘मानव सेवा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, धर्मप्रेमी सर्वश्री मनीष सैनी, विलास निकम, रवींद्र दासरी हे उपस्थित होते. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, संतांनी समाजाला संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवून समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे; मात्र जनतेत हिंदूंच्या संतांविषयी असलेला आदर, सन्मान, भक्तीभाव नष्ट करण्यासाठी ‘महाराज’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. इंग्रजांच्या राजवटीमध्ये धर्मग्रंथांमध्ये चुकीच्या गोष्टी घुसडल्या,  ‘फोडा आणि राज्य करा’ नीती राबवली गेली, अशा इंग्रजांच्या राजवटीत चाललेल्या एका खटल्यावर आधारित हा चित्रपट आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना, हिंदु संतांना अपकीर्त  करून भारतीय संस्कृतीवर, श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे.

चित्रपटात करण्यात आलेली संतांची अपकीर्ती !

या चित्रपटाची कथा वर्ष १८६२ मधील ब्रिटीश राजवटीतील धार्मिक नेते जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. करसनदास मुलजी यांनी ‘सत्यप्रकाश’ या गुजराती वृत्तपत्रात त्यांच्या विरोधात मानहानीकारक लेख लिहिला होता. त्यावर जो मानहानीचा खटला प्रविष्ट झाला, त्यावर आधारित हा ‘महाराज’ चित्रपट आहे. या लेखात वैष्णव पंथातील ‘पुष्टीमार्ग’ (वल्लभ संप्रदाय) साधूंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जदुनाथजींचे अनेक स्त्रियांशी शारीरिक संबंध होते आणि लोकांना त्यांची भक्ती सिद्ध करण्यासाठी त्यांच्या पत्नींना साधूंच्या स्वाधीन करावे लागत असे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटात जुनैद खान पत्रकाराच्या, तर हिंदु साधू खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

उच्च न्यायालयाकडून १८ जूनपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती !

महाराज चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाणार असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची विनंती विहिंपने न्यायालयात केली होती. या प्रकरणी अहमदाबाद येथे सुनावणी झाल्यावर उच्च न्यायालयाने १८ जूनपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.

नेटफ्लिक्सच्या कार्यालयाला पोलीस संरक्षण !

अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ आणि ‘नेटफ्लिक्स’ यांनी मिळून हा चित्रपट सिद्ध केला आहे. १४ जून या दिवशी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी माध्यमावरून चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी ‘नेटफ्लिक्स’च्या बीकेसी येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News