-
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाच्या लढ्याला मोठे यश!
-
नाटकाचे नाव बदलून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचे सेन्सर बोर्डाचे निर्मात्यांना स्पष्ट निर्देश

मुंबई/रत्नागिरी : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या व विठ्ठल भक्तांना हिंसक दाखवणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाने पुकारलेल्या लढ्याला आता मोठे यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’ने ८ जून २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. यात वारकरी संप्रदायाचा अवमान टाळण्यासाठी या नाटकातील सर्व आक्षेपार्ह भाग, श्रीविठ्ठल मूर्ती आणि संतांची नावे तातडीने वगळण्याचे आदेश नाट्य निर्मात्याला दिले आहेत.
रत्नागिरी येथे पार पडलेल्या ६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत वीरशैव समाज (लांजा) निर्मित आणि अमोल रेडीज लिखित-दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते. या नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’, ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून आणि मुलाची हत्या दाखवत वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवले होते. त्याला समितीने व वारकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. सेन्सॉर बोर्डाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी नाट्य निर्मात्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नाटकातील पात्रांना दिलेली ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ ही संतांची नावे पूर्णपणे बदलण्यात यावीत. नाटकाचे ‘ईठ्ठला’ हे शीर्षक बदलण्यात यावे. नाटकातील प्रमुख कुटुंब हे ‘वारकरी’ न दाखवता निव्वळ एक धार्मिक, साधाभोळा सेवेकरी परिवार दाखवण्यात यावा. तसेच त्यांच्याकडून कोणाचीही हत्या केली जाते असे दाखवू नये, जेणेकरून कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. रंगमंचावर प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती आणि त्या अनुषंगाने येणारे वादग्रस्त प्रसंग पूर्णपणे टाळण्यात यावेत. तसेच ‘‘कुणाला मारु नये असे कुठे लिवलय का विठ्ठलाने?’’ हे अत्यंत संतापजनक वाक्य संहितेतून कायमचे वगळण्यात यावे. तसेन सुधारित नाट्यसंहिता मान्यतेसाठी सादर करण्यासाठी सांगितले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांची भेट घेताच त्यांनी तातडीने दखल घेऊन निर्मात्यांची कानउघडणी केली होती. तसेच सेन्सॉर बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हे योग्य आदेश जारी केले आहेत. त्याबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती मंत्री महोदयांचे जाहीर आभार मानत आहे.
या विषय हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, हा केवळ एका नाटकाचा विरोध नाही, तर समस्त वारकरी संप्रदाय आणि हिंदूंच्या जागृत अस्मितेचा हा एक मोठा विजय आहे! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमची आराध्य दैवते, विठ्ठल माऊली आणि पूजनीय संतांची घोर विटंबना करणारा अघोरी प्रकार या नाटकातून केला जात होता. तो आता सेन्सॉर बोर्डाच्या अधिकृत आदेशामुळे पूर्णपणे थांबला आहे, मात्र आमचा मूळ प्रश्न कायम आहे की, मुळात सेन्सॉर बोर्डाने प्रारंभीच अशा नाटकाला मान्यता दिलीच कशी? यापुढे सेन्सॉर बोर्डाने हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणाऱ्या नाटकांना अनुमती देऊ नये यासाठी कडक खबरदारी घ्यावी आणि नियमावली तयार करावी. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना यापुढेही असाच चोख जाब विचारला जाईल!
‘ईठ्ठला’ नाटक सादर केल्यास कायदेशीर कारवाई होईल – रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत
-
बंदी असतांनाही वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकाचे प्रयोग रत्नागिरीत सादर करण्याचा प्रयत्न
-
विठ्ठलभक्तांनी ‘जनता दरबारात’ पालकमंत्र्यांना दिले निवेदन

रत्नागिरी (महाराष्ट्र) – वारकरी संप्रदायाची विटंबना करणार्या ‘ईठ्ठला’ नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठलभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. या नाटकाला महाराष्ट्रात बंदी असतांनाही हे नाटक सादर करण्याचा अट्टाहास केला जात आहे. या विरोधात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ठाम भूमिका घेत ‘नाटक सादर केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी दिली आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ११ एप्रिल या दिवशी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या ‘जनता दरबारा’त त्यांची ही भूमिका मांडली. बंदी असूनही नाटक सादर केले जात असल्याविषयी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
१. यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी निवेदन दिले असता पालकमंत्री डॉ. सामंत यांनी नाटकाच्या सादरकर्त्यांना नाटकाच्या नावात पालट करा, पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणार्या संकल्पनेत त्वरित पालट करा’, अशा कडक सूचना दिल्या, तसेच ‘सदर नाटक परत सादर करता येणार नाही’, अशी समजही दिली होती.
२. यानंतरही ‘ईठ्ठला’ नाटक पुन्हा विविध ठिकाणी सादर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे’, अशी माहिती वारकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे साधक यांनी जनता दरबारात दिली. तेव्हा पालकमंत्री म्हणाले, ‘‘बंदी असूनही नाटक सादर करण्याचा प्रयत्न होत असेल, तर सादरकर्त्यांची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. नाटक सादर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. एक हिंदु म्हणून माझी ही भूमिका आहे. मी तुमच्यासोबत आहे.’’
३. या वेळी लांजा तालुका वारकरी संप्रदायाचे सर्व ह.भ.प. मनोहर उपाख्य दादा रणदिवे, तुळशीराम मोरे, विष्णु लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे अमितराज खटावकर, भैरूलाल भंडारी, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे वारकरी आणि विठ्ठलभक्त यांनी स्वागत केले आहे.
काय आहे ‘ईठ्ठला’ या नाटकात ?
१. नाटकात श्री विठ्ठलाच्या भक्तीत बेभान होऊन नाचणारे दांपत्य पैशांच्या लोभापायी १० लोकांची हत्या करतात, असे दाखवले आहे. हे वारकरी तत्त्वज्ञानाच्या पूर्णतः विरोधात आहे.
२. नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जनाई’ आणि ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांचा अवमान करण्यात आला आहे.
३. पत्नीच्या सांगण्यावरून पती (तुका) अितथींची हत्या करतो आणि पत्नी स्वतःच्या मुलाची हत्या करते, असे अत्यंत निषेधार्ह चित्रण यात आहे.
वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;
-
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!
-
मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश

मुंबई/रत्नागिरी : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांची कडक शब्दांत ‘कानउघडणी’ केली. त्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी हे नाटक सद्यस्थितीत थांबवण्याचा आणि नाव, कथानक व पात्रांच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात दिला आहे.
नेमके प्रकरण काय? :
रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निर्माता श्री. जयप्रकाश पाखरे, वीरशैव समाज, लांजा निर्मित श्री. अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित अमोल रंगयात्रीतर्फे (लांजा) ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते. हे नाटक पाहिल्यानंतर हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते संतापले. नाटकात वारकरी भक्तांना चक्क ‘हत्यारे’ म्हणून दाखवून संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे समोर आले.

मंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कडक सूचना ! :
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री सतीश सोनार व श्री रवी नलावडे यांनी मुंबईत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. या वेळी ना. सामंत यांनी तात्काळ नाटकाच्या निर्मात्यांना भ्रमणभाषवरून संपर्क साधला आणि संतांच्या नावाने चाललेला हा अनाचार थांबवण्याचे आदेश दिले. “नाटकाचे नाव बदला, पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणारी संकल्पना त्वरित बदला,” अशा कडक सूचना मंत्र्यांनी दिल्या.
निर्मात्यांची लेखी माघार:
मंत्र्यांच्या भूमिकेनंतर, नाटक निर्माते ‘वीरशैव समाज, लांजा’ यांनी हिंदु जनजागृती समितीला लेखी पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “वारकरी संप्रदाय आणि समितीने घेतलेल्या आक्षेपांचा आदर राखून आम्ही हे नाटक थांबवत आहोत. आक्षेपार्ह प्रसंग आणि नावांमध्ये आवश्यक बदल करूनच पुढील सादरीकरण केले जाईल.”
नाटकातील अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह भाग :
१. विठ्ठलाचे नाव घेणारे दाम्पत्य १० निष्पाप पाहुण्यांची हत्या करते, असे दाखवून वारकरी भक्तांना गुन्हेगार ठरवण्यात आले.
२. नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून होताना दाखवले, जो वारकरी संतांचा मोठा अपमान आहे.
३. आई (जना) ही विठ्ठल नामात बेभान होऊन आपल्याच मुलाची (नामा) हत्या करते, असे अघोरी दृश्य दाखवून समाजाची दिशाभूल करण्यात आली.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या श्रद्धास्थानांची विटंबना कदापि खपवून घेतली जाणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन तातडीने जी कारवाई केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”


