वर्गात ‘ऑफ’ तासाला (मोकळ्या तासाला) काय कराल ?

         मित्रांनो, वर्गात आठवड्यातून एखादा तरी ‘ऑफ’तास तुम्हाला मिळतो ना ? काय करता तुम्ही या तासाला ? काय, वर्गात धमाल करता ? कॅन्टीन’मध्ये गप्पा मारत बसता ? …अजून काय करता येईल, असे विचारतांय, तर सांगतो – या तासाला स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची चरित्रे वाचा ! जगातील अन्य कोणत्याही देशातील क्रांतीकारकांना सुचली नसतील, अशी साहसे भारताच्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात करून दाखवली आहेत. ही त्याची काही उदाहरणे –

१. स्वा. सावरकरांनी विशाल सागरास अन् आकाशास साक्ष ठेवून नौकेवरून भर समुद्रात उडी मारली.

२. साँडर्सवध प्रकरणी पकडले गेल्यावर ब्रिटीश शासनाच्या अन्यायाच्या विरोधात ६३ दिवसांचे उपोषण करून जतिंद्रनाथ दास यांनी मृत्यूला कवटाळले.

३. आई-वडील, पत्नी अन् मुलगा यांना हिंदुस्थानातच सोडून गेलेल्या मदनलाल धिंग्रा यांनी २५ व्या वर्षी इंग्लंडमध्येच कर्झन वायलीला गोळ्या घातल्या.

४. ब्रिटिशांच्या विरोधातील मिरवणुकीत भाग घेतला म्हणून १५ वर्षांच्या चंद्रशेखर आझाद यांनी पाठ रक्तबंबाळ होऊनही ‘हूं कि चू’ न करता वेताचे १५ फटके खाल्ले.

         एक नाही, दोन नाहीत, असे शेकडोंनी प्रसंग इतिहासाच्या पानापानावर अंकित आहेत अन् तुम्हाला सांगत आहेत, ‘यापुढे ‘ऑफ’ तासाला धमाल बंद; कॅन्टीन, कॉलेज कट्टा, कॅम्पस येथे वेळ वाया घालवणे बंद… सर्व बंद. या वेळेत देशाच्या क्रांतीकारकांनी दिलेला रोमहर्षक लढा वाचा !’