पाल्याच्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करून मुलांना यशस्वी होण्यासाठी साहाय्य करा !

आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही; मात्र हे यश मिळवण्याच्या संदर्भातील सर्व संकल्पना पालकांना सुस्पष्ट असायला हव्यात ! त्यासाठी पालकांचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही सुस्पष्ट हवा. याविषयी निश्चिती करायची असेल, तर पुढील प्रश्न स्वतःला विचारा !

१. केवळ पैसा आणि यश हे माझ्या आयुष्याचे ध्येय मिळवून मी पूर्ण समाधानी आहे का ? मग आपल्या पाल्याने त्याच वाटेवरून जायला हवे कि मला आकलन झालेल्या जीवनाच्या व्यापकतेचे आकलन आणि अनुभव याचा लाभ त्याला आताच करून द्यायला हवा ?

२. माझ्या मुलाला अमुक एक बनवायचे आहे, तर ती केवळ माझी इच्छा आहे कि त्याचीही तशी इच्छा आहे ? त्याला काही वेगळे काही करायचे आहे का ? त्यासाठीही मी काही वाव दिला आहे का ? किंवा या दोन्ही गोष्टींची काही सांगड घालून दिली आहे का ?

१. आपल्या पाल्याच्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करतांना खालील गोष्टी लक्षात घ्या !

सर्व विद्यार्थ्यांचे वेळापत्रक हे एकसारखे असू शकत नाही. तुमच्या पाल्याचे वेळापत्रक पुढील गोष्टींवर अवलंबून असेल –

१. पाल्याचे व्यक्तीमत्त्व उदा. खोडकर, अभ्यासू, एकपाठी, ढ आदी.

२. उपलब्ध सुविधा

३. अभ्यासासाठी किमान आवश्यक वेळ (हा इयत्तेनुसार पालटत जाईल.)

४. वर्षभरातील विविध कालखंड उदा. परीक्षेच्या वेळी आणि इतर वेळी

५. पाल्याची इयत्ता

२. वेळापत्रक करतांना लक्षात घ्यावयाचे अन्य घटक

१. गृहपाठाला किती वेळ लागतो ?

२. धड्याचे आकलन व्हायला किती वेळ द्यावा लागतो ?

३. एखादे सूत्र किंवा उत्तर लक्षात रहायला किती वेळ लागतो ?

४. पाठांतरासाठी किती वेळ लागतो ?

थोडक्यात वेळापत्रकाचे ध्येय ‘अमुक इतके तास अभ्यास’ असे नसून पाल्याच्या प्रकृतीनुसार, कुवतीनुसार, त्याच्या किमान अभ्यासासाठी आवश्यक वेळ, अभ्यासाचा प्राधान्यक्रम, अभ्यास चांगला केव्हा होऊ शकतो, पाल्य सर्वांत ताजातवाना असतांना आकलन करून घेण्याचा भाग इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन वेळापत्रक बनवले जावे. अभ्यास नीट व्हावा आणि तो लाभदायक व्हावा, यासाठी पाल्याला मोकळ्या वातावरणात, मैदानात किंवा इतर मुलांबरोबर खेळण्यासाठी काही वेळ द्यायला हवा.

३. पालक म्हणून मुलांच्या अभ्यासाकडे कसे लक्ष दिले पाहिजे ?

मुले कोणत्या वयोगटात आहेत, त्यांची क्षमता काय आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना नेमकी कोणत्या प्रकारच्या साहाय्याची आवश्यकता आहे, हे ओळखून त्या प्रकारचे साहाय्य त्यांना करायला हवे. उदा. काही मुलांना केवळ अभ्यासाचे स्मरण करून देण्याची आवश्यकता असेल, काहींना केवळ प्रोत्साहन देण्याची असेल, तर काहींना प्रत्यक्ष अभ्यासात मदत करण्याची आवश्यकता असेल. काहींना वेगवेगळ्या वेळी यांपैकी वेगवेगळ्या गोष्टीची आवश्यकता असेल. यात पालकांनी आपली कुवत, क्षमता, वेळ आणि इतर प्राधान्यक्रम लक्षात घेऊन या गोष्टी करावयाच्या आहेत.

– मानसोपचारतज्ञ आणि पालक आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत