श्री रामाचे अभंग : २

भक्‍तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
भक्‍तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
भक्‍तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥

जो अज्ञानमदांधदैत्यदमनीं वीराग्रणी कीं असे ।
देवा सोडविता समर्थ प्रभु हा यावीण त्राता नसे ॥
देहाहंकृतिमत्तरावण असा ज्या योगि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥२॥

वैराग्यात्मक द्या सदा मन महारुद्रासि या चेतना ।
सीता स्वानुभवात्मिका जननि जैं व्हावी तुम्हां पालना ॥
ज्याचा आश्रय लाभतांचि विषयव्यामोह जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥३॥

मी गोरा बहु वा कुरुप मज हें तारुण्य वृद्धाप्य वा ।
मी हा ब्राह्मण क्षत्र वा वणिज वा मी शुद्र आलों भवा ॥
श्रीमान् विश्‍व दरिद्रि स्त्री पुरुष मी हा भाव जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥४॥

मी थोटा बहिरा मुका असत मी पंगू तसा अंध वा ।
मी हा चंचल धीत भ्याड जड वा विद्वान्सुखी खिन्नवा ॥
मी हा बद्ध विमुक्‍त शिष्य गुरु वा हा भाव जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥५॥

जें सच्चिद्‌घन दिव्य सौख्य मिति ज्या लाभे न वेदांतरीं ।
जे का वेद वदे स्वरुप असकें तें रामरुपांतरीं ॥
येतां प्रत्यय हा न दुःख भविचें भिन्नत्व जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥६॥

योगायोगिं वसे तनू न कसला त्या पाश विश्‍वांतरीं ।
ज्यातें ब्रह्मचि मी अखंड असतें रामकृपें अंतरीं ॥
’मी, हा हें मम’ या न बंध कसला अज्ञान जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥७॥

’मी मी’ जें निज अंतरीं स्फुरत तें पुर्वील सच्चित्सुखीं ।
नेवोनी विलया त्यजूनि अवघें श्रीराम ठेवा मुखीं ॥
संसारीं प्रभुभक्‍ति धर्म जगवा जीवत्व जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥८॥

माझ्या अंतरिं जें असें प्रगटलें तें दाविलें हें असें ।
जाणोनि निजरुपिं चित्त जडवा श्रीराम त्राता वसे ॥
ऐक्यत्वें जरि रामपाद गवसे मायाहि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥९॥

Leave a Comment