Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

‘कॉपी’ हा शिक्षणक्षेत्राला प्रदीर्घ काळ लागलेला ‘कर्करोग’

        वार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो. पेपरच्या वेळी ‘कॉपी’ करतांना विद्यार्थी पकडला गेल्यास काहींचे वर्ष फुकट जाते, तर काहींचे जीवन उद्ध्वस्त होते. व्यावहारिक दृष्टीने ही कुप्रथा म्हणजे भ्रष्टाचार ! या भ्रष्टाचाराचा वेध घेणारा लेख…

१. शिक्षणक्षेत्रात कॉपी ही केवळ दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये होते, असे नसून कायद्याच्या परीक्षेतसुद्धा होत असणे, म्हणजे कायद्याच्या रखवालदारांकडूनच चौर्यकर्म होत असणे :
‘कॉपी हा शिक्षणक्षेत्राला प्रदीर्घ काळ लागलेला असा ‘कर्करोग’ असल्याचे सांगितले जाते. खरे तर आपल्या शिक्षणक्षेत्राला आता इतके असाध्य रोग जडलेले आहेत की, त्या रोगांच्या पुढे कॉपीसारखा  रोग हा सर्दी- पडशासारखा वाटावा, अशी अवस्था आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हेही तितकेच खरे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी होते, असे नाही, तर अलीकडे ती चक्क कायद्याच्या परीक्षेतसुद्धा होत असल्याचे आढळून येते, म्हणजे ‘उद्या जे कायद्याचे रखवालदार होणार, तेच आज हे चौर्यकर्म करत आहेत’, असा त्याचा उघड उघड अर्थ आहे.

२. ग्रामीण भागात शाळांचा पट टिकवून ठेवण्यासाठी संस्था-चालक आणि शिक्षक यांची परीक्षार्थीना फूस असणे आणि तसे पोषक वातावरण त्यांना सिद्ध करून दिले जाणे :
ग्रामीण भागात शाळांचा पट टिकवून ठेवण्यासाठी संस्था-चालक आणि शिक्षक यांची परीक्षार्थीना फूस असते आणि तसे पोषक वातावरणही त्यांना सिद्ध करून दिले जाते. अनेक निब्बर बनून गेलेल्या पालकांना हे हवे असते; कारण त्यांना त्यांचा बाळ्या अथवा बाळी परीक्षेच्या मांडवाखालून कोणत्याही कटकटीविना (सहीसलामत) बाहेर पडणे आवश्यक वाटत असते. अशा वेळी संबंधित सारेच घटक कातडी बचावू धोरण स्वीकारून, मूग गिळून गप्प रहाणेच पसंत करतात. मुख्याध्यापकाला आपली आसंदी टिकवायची असते आणि संस्था-चालकांना शाळा चालवायची असते. बहुतांशी शिक्षक हे आपल्या अशा वरिष्ठांचीच री ओढणारे असल्याने कॉपीचा प्रसार होण्यास विलंब लागत नाही. काही काही केंद्रांवर तर अशा अघोषित कॉपी प्रकारांना  एवढा ऊत येत असतो की, कॉपी न करता सरळ मार्गाने उत्तीर्ण होऊ पहाणार्‍या असंख्य परीक्षार्थींना याचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यातून मनस्तापसुद्धा होत असतो. आता हे सारे गृहित धरूनच परीक्षेला त्यांना सामोरे जावे लागत असते.

३. कॉपी करणारा परीक्षार्थी एवढा एकच घटक या रोगाचे मूळ नसून असंख्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटक त्यात गुंतलेले असणे :
अशा वेळी आपण संबंधित मंडळींना कायद्याची भीती दाखवून कितपत नमवू शकणार आहोत आणि कॉपीचा समूळ नायनाट कसा काय करणार आहोत, असा तो गुंतागुंतीचा प्रश्न आहे. म्हणजेच कॉपी करणारा उमेदवार अगोदर त्याकरिता सिद्ध होतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष कॉपी करण्यास सरावतो. यातूनच कॉपी करणार्‍यांची संख्या बळावते आणि पर्यवेक्षकांना धमक्या देणे, शिवीगाळ करणे असले अश्लाघ्य प्रकार चालू होतात. मग सरळमार्गी शिक्षक या कामातून सुटका करून घेण्याकरता खटाटोप करू लागतात आणि आपसूकच कॉपीखोरांना मोकळे रान मिळते. त्यामुळे कॉपी करणारा परीक्षार्थी एवढा एकच घटक या रोगाचे मूळ नसून असंख्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे घटक त्यात गुंतलेले असतात.

४. ‘तू अनुत्तीर्ण झालास, तरी चालेल; पण कॉपी करून उत्तीर्ण होता कामा नये’, असे खडसावून सांगणारे पालक आज दिसत नसणे आणि ‘कॉपी करणार नाही’, असा विचार विद्यार्थ्यांनी करण्यासाठी तशा संस्कारांचीआवश्यकता असणे :
खरे तर ‘तू अनुत्तीर्ण झालास, तरी चालेल; पण कॉपी करून उत्तीर्ण होता कामा नये’, असे खडसावून सांगणारे पालक  आज दिसेनासे झालेले आहेत. शिक्षक तर नाहीतच नाहीत. जे असतील ते अपवादात्मकच म्हणावे लागतील. तसे हे शिक्षकांचेच मानले, तर नैतिक दायित्व आहे. शिक्षकांनी जर परीक्षेची उत्तम सिद्धता करून घेऊन परीक्षार्थींना उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास प्राप्त करून दिला, तर कॉपीकडे मुले वळणार नाहीत. शिक्षकांचे शिकवणे त्या अर्थाने समाधानकारक असत नाही, असा याचा उघड उघड अर्थ आहे. ‘मी कॉपी करणार नाही’, असा आपल्या पाल्याचा आणि विद्यार्थ्यांचा मनोनिग्रह सिद्ध करून घेणे अन् यासाठी तशा संस्कारांची जोपासना करणे, हाच यातील महत्त्वाचा मार्ग आहे.’

– श्री. वैजनाथ महाजन (संदर्भ : दै. तरुण भारत, १६.१.२०११)