धैर्यशील विवेकानंद

बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. `पळू नका ! त्यांना सामोरे जा !', असे तो त्यांना सांगत होता. त्याच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले. आणि काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या.

मुलांनो, संकटांना कधीही घाबरू नये. त्यांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे.