अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स.१८५६-१८७८)

माघ वद्य १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास बारा वर्षे राहिले. आणि मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूरमार्गे अक्कलकोट येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत म्हणजे शके १८०० पर्यंत होते.

दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय.

अक्कलकोटचे परब्रह्मश्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इ.स. १८५६ मधे प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले. जनजागृतीचे कार्य केले. ”जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्यभावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,” असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले.

स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. नंतर पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.

अशा प्रकारे स्वामींनी मंगळवेढे येथील बसप्पाचे दारिद्र्य नष्ट केले. त्याला सापाचे सुवर्ण करून दिले. त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडात पाणी आणले. पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले. हे सर्व चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले. संत हे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक, पारमार्थिक ऐश्वर्या साठीच असतातते दुस-यांना सुखाने सुखावणारे असतात.

स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सतविचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीत लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानीत. त्यांना साधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. स्वामी समर्थ अतिशयतेजःपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करीत.

एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे हत्तीवर बसून आले होते. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले, ”तुझे मोठेपण तुझ्या घरात. ते येथे कशाला पाहिजे ?आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो.” तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत.

अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून, संसारातून विटले, तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, ”तुझ्या नावाची चिट्ठी आली आहे.” तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की, ”मला अजून आपली सेवा करावयाची आहे !” तात्या भोसले यांनी त्या यमदूताला पाहिले, ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की, ”हा माझा भक्त आहे. याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा !” त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला.

श्री स्वामीसमर्थ हे भक्तकाम कल्पद्रुम आहेत, चिंतामणी आहेत. त्यांच्या हृदयात करुणेचा सागर हेलावतो आहे. त्यांना हाक मारा, ते सदैव तुमच्या जवळच आहेत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणा बाबत सदोदित जागरूक राहून त्यांची भयानक संकटातून मुक्तता करतात.

अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त होता. त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेक-यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेक-यास म्हणाले, ”अरे, विहिरीवर कोण जीव देतेय पहा बर .त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये !” सेवेकरी विहिरीजवळ गेला तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याने तिला स्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले. तिची पोटदुखी नाहिशी झाली.

स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रुपात दर्शन घडविल्याचे अनेक कथांतून आढळते. द्वारकापुरीत त्या वेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त राहात होते. हे सूरदास जन्मांध होते. आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला हाक मारली. म्हणाले, ”तू ज्याच्या नावाने हाका मारीत आहेस तो मी, बघ इथ तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा. ”इतक बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुणरूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, ”मला दिव्यदृष्टी दिलीत. आता मला जन्ममरणाच्या या तापा पासूनमुक्त करा !” स्वामी समर्थांनी सूरदासाला ”तू ब्रह्मज्ञानी होशील!’ ‘असा आशीर्वाद दिला.

स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागो जागी आहेत. १८७८ साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी ”हम गया नही, जिंदा है l” हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्या वेळी त्यांचे स्मरण केले जाते, त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात, हे निश्चित.