पूर्वीचे आदर्श पालक आणि हल्लीचे पालक

पालक हा पाल्याचा जीवनातील पहिला मित्र असतो. पालक म्हणजे पाल्याच्या जीवनातील प्रत्येक सुख-दु:खांना कारणीभूत ठरणारा एकमेव घटक (संत ज्ञानेश्वरांचे आई-वडील, जिजामाता)

१. पूर्वीचे आदर्श पालक

स्त्रियांनी जिजाबाईप्रमाणे आपल्या मुलांना घडवावे ! : स्त्रियांनी जिजाबाईसारखे मुलांवर संस्कार करायला हवेत, तरच मुले सुसंस्कारित होतील. राष्ट्र व धर्म यांच्याविषयीचे बाळकडू देऊन जसे जिजाबाइंर्नी शिवरायांना घडवले, तसे सर्व स्त्रियांनी आपल्या पाल्याकडे जाणीवपूर्वक लक्ष व वेळ देऊन त्यांना घडवले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलांसाठी वेळ देऊन प्रयत्न करायला हवेत.

२. हल्लीचे पालक

काळानुसार पालकांत होणारे परिवर्तन

१. वैचारिक

२. बौद्धिक

३. सामाजिक

अ. संस्कारापेक्षा नोकरीला प्राधान्य देणारे पालक

हल्ली पालक म्हणतात, `आम्हाला नोकरीतून वेळ नाही, मग आम्ही मुलांकडे लक्ष कसे देणार ?’ आपणच आपल्या गरजा वाढवतो. मग जास्त पैशांची आवश्यकता भासू लागते. त्यामुळे घरातील आई-बाबा दोघेही नोकरी करू लागतात.

१. मुलांना पाळणाघरात ठेवणे : आज बहुसंख्य पालक नोकरीसाठी बाहेर जातांना मुलांना पाळणाघरात ठेवतात. त्यामुळे मुलांना आई-बाबांचा सहवास फार कमी मिळतो.

२. मुलांना शिकवणीवर्गाला पाठवणे : पैशाच्या आधारावर मुलांना शिकवणीसारखी माध्यमे वापरून मुलांकडे दुर्लक्ष करतात. पैशांच्या बळावर मुलांमध्ये सद्गुण येणार नाहीत.

२ अ. शिकवणीला पाठवल्यामुळे होणारे दुष्परिणाम

आई-वडिलांविषयी प्रेम न वाटणे : शिकवणीतून मुलाला चांगले गुण मिळतील; पण त्याच्यावर संस्कार होणार नाहीत व त्याची भावनिक भूकही भागत नाही. त्यामुळेच मुलांना आई-वडिलांविषयी प्रेम वाटत नाही. देश व धर्म यांविषयी प्रेम रुजणे तर दूरच !

आ. मुलांना वेळ न देणारे पालक

काही पालक गरज म्हणून तर काही निव्वळ टाईम-पास म्हणून नोकऱ्या करतांना दिसतात. हल्लीचे काही पालक तर पार्टी, तसेच मनोरंजनाची इतर साधने यात दंग असतात. मुलांचे विचार ऐकून घ्यायलाही कोणी नसते. मुलांना प्रेम हवे असते, आई-बाबा हवे असतात.

मुलांना वेळ न दिल्यामुळे होणारे दुष्परिणाम

१. मानसिकदृष्टया दुर्बल बनणे : आज मुलांच्या समस्या ऐकायला पालकांना वेळ नाही, शिक्षकांनाही नाही. मग त्यांनी कुणाला सांगायचे ? कधी वेळेअभावी, तर कधी कधी याची जाणीवच नसल्यामुळे मुलांना पालकांचा सहवास मिळत नाही. ही त्यांची मानसिक कुचंबणा त्यांची मने दुर्बल बनवते. त्यामुळे ती चिडचिडी होतात. मानसिकदृष्ट्या त्रस्त होतात व अभ्यासात मागे पडतात. अशा वेळी पालक शिकवणीला पाठवण्याचा पर्याय शोधतात.

२. राष्ट्राला सक्षम पिढी न मिळणे : मुले मानसिकदृष्टया दुर्बल बनल्यामुळे राष्ट्राला सक्षम पिढी मिळत नाही.

इ. पालकांचा शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन चुकीचा असणे

संस्कारापेक्षा परीक्षेत मिळणारे गुण महत्त्वाचे वाटणे : हल्लीच्या पालकांच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व म्हणजे मुलांना मिळणारे गुण. शिक्षणामुळे मुलांच्या वागणुकीत होणारा बदल व त्यांच्यावर होणारे चांगले संस्कार याहीपेक्षा मुलांना मिळणारे गुण, हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. हा त्यांचा दृष्टीकोनच मुळात चुकीचा आहे व तो बदलायला हवा. `शिक्षण म्हणजे सुसंस्कारांचे संवर्धन व विकास.’ `शिक्षण म्हणजे माणूस म्हणून जगायला शिकणे.’ हा दृष्टीकोनच आज पालक विसरले आहेत. `माझा मुलगा डॉक्टर किंवा अभियंता व्हायला हवा. त्याने खूप पैसे मिळवायला हवेत’, हीच त्यांची इच्छा असते. `माझा मुलगा प्रथम माणूस म्हणून जगायला शिकला पाहिजे, त्याच्यावर सुसंस्कार व्हायला पाहिजेत’, असे पालकांना वाटत नाही. त्यामुळे जसा मुलाला परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचा (मार्कांचा) आढावा पालक घेतात, तसा आढावा मुलांच्या गुणांचा घेतला जात नाही. पर्यायाने मुलांनाही परीक्षेत मिळणारे गुणच (मार्क) महत्त्वाचे वाटतात.

ई. अधिक गुण, गुणांची स्पर्धा, पैसा, करियर हेच जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे

भारतावर राज्य करणाऱ्या ख्रिस्तासी इंग्रजांनी राष्ट्राभिमानी व धर्माभिमानी नागरिक तयार करणारी उज्ज्वल `गुरुकुल शिक्षणपद्धती’ मोडित काढली. तेव्हापासून धर्माभिमानी हिंदु निर्माण होणारा मुख्य स्रोतच बंद पडला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढत गेला व बहुतांश समाज त्यांच्या पाल्यांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या स्पर्धेत उतरला. (हल्लीच्या बहुतांश पालकांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान हेच पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले व चंगळवादी बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांवरही त्याच विचारांचे व कृतींचे संस्कार केले जातात. अधिक गुण, गुणांची स्पर्धा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची स्पर्धा, पैसा, त्यासाठी करियर हा पालकांचा मुलांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व स्वसंस्कृतीचे विस्मरण यामुळे सध्याची लाडकी मुले `ऐकत नाहीत’ असेच चित्र बहुतांश बघायला मिळते. यासाठी पालक त्यांना जास्तीतजास्त विविध छंद आणि शिकवणीवर्गांना घालून व्यस्त ठेवण्याच्या मागे असतात. त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, अशी बहुतांश सुशिक्षित पालकांची मनापासून इच्छा असते. मात्र अशा स्थितीत नेमके काय करावे, हे त्यांनाही कळत नसते. म्हणूनच इंग्रजांनी दाखवलेल्या चंगळवादाकडे नेणारी पिढी तयार करण्याचे कात आजच्या पालकांनी अंगिकारल्यासारखे वाटते.

३. धर्मशिक्षण ते केवळ उच्चशिक्षण, असा उतरणीला लागलेला भारतीय शिक्षणाचा प्रवास !

प्राचीन काळातील गुरुकुल शिक्षणपद्धतीत राष्ट्राभिमानी पिढ्या घडवण्याची ताकद असणे :प्राचीन काळी `गुरुकुल शिक्षणपद्धती’ हीच भारताची खरी ओळख होती. धर्मधुरंदर व राष्ट्राभिमानी पिढ्या घडवण्याची ताकद या पद्धतीमध्ये असल्याची खात्री इंग्रजांना पटल्यानेच इंग्रजांनी मॅकोलेला भारतात आणून `गुरुकुल शिक्षणपद्धती’ चिरडून टाकली. मॅकोलेने पेरलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या विषारी बिजांचा आज मोठा वृक्ष झाला आहे. हिंदु नवे वर्ष केव्हापासून सुरू होते ? आपला प्रमुख धर्मग्रंथ कोणता ? हिंदु धर्मातील प्रमुख देवता व त्यांचे कार्य काय ? मनुष्य जन्माचे ध्येय काय ?, अशा बहुतांश मूलभूत प्रश्नांचीही उत्तरे आजच्या युवकांना देता येणार नाहीत, हे सत्य दुर्दैवाने आपल्याला पचवावे लागेल ! हिंदु धर्माची मूल्ये आचारण्यातच जीवनाचे खरे सार आहे व इंग्रजांनी आपल्याला हिंदु धर्मापासून दूर नेल्याची जाणीव अजूनही आपल्याला होत नाही, ही शोकांतिका आहे !

Leave a Comment