खेळ आणि मनोरंजन यांचे मुलांच्या आयुष्यातील स्थान

         छोट्यांच्या, तसेच मोठ्यांच्या जीवनातही खेळाला फार मोठे महत्त्व आहे. पुरातन कालापासून तत्कालीन संस्कृतीत खेळाचा उल्लेख सापडतो. खेळ खेळणे, हा वेळेचा दुरुपयोग असे काही जणांना वाटते; परंतु खेळाचे लाभ पाहिल्यास तोटे अल्प आहेत.

१. मुलांची वाढ आणि विकास यांमध्ये खेळाचे फार महत्त्वाचे स्थान आहे !

         मुलाची शारीरिक, सामाजिक, मानसिक, तसेच बौद्धिक जडण-घडण आणि वाढ होण्यास खेळणी फारच उपयुक्त ठरतात. खेळ खेळता खेळता इतर मुलांसमवेत सहकार्याने आणि खेळीमेळीने खेळण्यास मूल आपोआप शिकते. त्यासह इतरांशी मिळते जुळते घेण्यासही ती शिकतात. धार्मिक सण आणि इतर कौटुंबिक समारंभांमुळे, तसेच सहलीमुळे प्रतिदिन येणारा तोच तोपणा न जाणवता मुलांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होते.

अ. अभ्यास, इतर कामे यांमुळे आलेला ताण न्यून करण्याचे खेळ हे एक साधन आहे.

आ. सांघिक खेळांमुळे संघभावना वाढीस लागते.

इ. खेळांमुळे कल्पकता वाढीस लागते.

ई. खेळ विजय आणि हार यांचा सामना करण्यास शिकवतात. पराभव पचवण्यास शिकवतात.

उ. खेळ नियमांचे पालन करण्याची सवय लावतात.

ऊ. खेळांमुळे काही प्रमाणात बुद्धी, नियोजनबद्धता, पारख करणे, हे गुणही वाढीस लागतात.

२. खेळामुळे मुलांची मानसिक वाढ होण्यास साहाय्य होणे

         सायकल चालवणे आणि इतर पटांगणातील खेळ यांमुळे मुलांच्या शरिरास व्यायाम मिळतो अन् शरीर बळकट बनण्यास साहाय्य होते. तसेच स्नायूंच्या कौशल्यपूर्ण हालचाली आत्मसात होतात. बालवर्गात खेळ आणि खेळण्यांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. खेळामुळे मुलांची मानसिक वाढ होण्यास साहाय्य होते.

३. मूल मोकळेपणाने भावना व्यक्त करू शकत नसल्यास भावनांचा उद्रेक विध्वंस करण्यात होत असणे

         जर मूल मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करू शकले नाही, तर त्याच्या दबलेल्या भावनांचा उद्रेक, आदळ-आपट, मोड-तोड अशा प्रकारे होतो. त्याच्या भावनांचा आणि मनाचा होणारा कोंडमारा यास खेळण्याद्वारे नासधूस करून मार्ग मिळतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘संस्कार हीच साधना !’
लेखक : डॉ. वसंत आठवले, बालरोगतज्ञ