पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासाठी प्रतिदिन हे करा !

मुले अनुकरणप्रिय असतात. जन्मापासून सतत ती आपल्या आई-वडिलांचे निरीक्षण करत असतात. त्यामुळे बर्‍याच मुलांची चालण्याची, बोलण्याची आणि वागण्याची ढब आपल्या आई-वडिलांप्रमाणे असल्याचे आढळते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या कृती आणि बोलणे यांकडे बारकाईने लक्ष द्यावे अन् काही दोष असल्यास सुधारावे.

१. प्रतिदिन उठल्यावर देवाला नमस्कार करून प्राणायाम करावा आणि थोडा वेळ ध्यानधारणा करावी.

२. आंघोळ झाल्यावर देवाला, आई-वडिलांना आणि वडील माणसांना नमस्कार करावा. तसेच केव्हाही वडील माणसे, गुरुजन, शिक्षक भेटल्यावर त्यांना नमस्कार करावा.

३. प्रतिदिन सूर्यनमस्कार घालावेत किंवा आसने आणि व्यायाम करावा.

४. दूध/चहा प्यायल्यावर आपली कपबशी धुऊन ठेवावी.

५. बाहेरून आल्यावर चपला बाहेर काढून पाय धुऊन घरात यावे.

६. संत्रे खाल्ल्यावर साल घरातील कचर्‍याच्या टोपलीत टाकावे.

७. काही खाण्याच्या किंवा जेवायच्या आधी हात धुऊन जेवावयास बसावे.

८. अन्नाला प्रार्थना करूनच जेवणाला प्रारंभ करावा, तसेच जेवण झाल्यावर दात ब्रशनेघासावे.

९. पुस्तक वाचून झाल्यावर जागच्याजागी ठेवावे, म्हणजे मुलेसुद्धा खेळ खेळून झाल्यावरआपली खेळणी कपाटात ठेवतील.

१०. पाहुणे आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करावे. तसेच नेहमी नम्रतेने बोलावे आणि वागावे.

११. सायंकाळी देवांसमोर दिवा लावून स्तोत्रे म्हणावीत.

१२. अभ्यास सोडून मुलांनी दूरचित्रवाणी पाहू नये, असे वाटत असेल, तर त्या वेळी स्वतः संयम बाळगून आपल्या आवडीचा त्याग करावा.

संतांनी म्हटलेच आहे… ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘संस्कार हीच साधना !’ , लेखक : डॉ. वसंत आठवले, बालरोगतज्ञ