मुलांचा दिनक्रम कसा असावा ?

मुले आदर्श व सुसंस्कारीत व्हावीत, यासाठी प्रत्येक पालकाचा खटाटोप असतो. यासाठी आपण आपल्या पाल्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊन पुढे मोठी व्यक्ती बनेल, ऐवढे मर्यादित ध्येय ठेवून मुलाची क्षमता, त्याची आवड, त्याच्यात असलेले सुप्त गुण व दोष यांचा अभ्यास करण्यास कमी पडतो व आपल्या अपेक्षा कळत-नकळत त्यांच्यावर लादत जातो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेमध्ये दोघांनाही समाधान मिळत नाही. जर आपण आपल्या मुलांचे पालन-पोषण करतांना साधनेचा दृष्ष्टीकोन ठेवल्यास आपल्याला व मुलांना एक प्रकारचे समाधान तर मिळेलच, त्याचबरोबर मुलांमध्ये आवश्यक बदल दिसतील. यासाठी सर्वसाधारणपणे मुलांचा दिनक्रम कसा असावा, याबाबत थोडक्यात येथे देत आहोत.

मुलांची सकाळची शाळा असल्यास मुलांचे असे नियोजन करा !

१. सकाळी अंथरुणावरून उठल्यानंतर भूमीदेवतेला प्रार्थना करावी. सकाळचे आवरल्यावर देवाला व वडिलधार्‍यांना नमस्कार करावा. आंघोळ व नाश्ता करून शाळेत जावे. शाळेत जातांना आईला सांगून व देवाला प्रार्थना करूनच बाहेर पडावे.

२. शाळेत जातांना वाटेत मनातल्यामनात आपल्या कुलदेवतेचा नामजप करावा. शाळेत गेल्यावर तेथील वास्तुदेवतेला, स्थानदेवतेला तसेच श्री सरस्वती व श्रीगणेश या देवतांना प्रार्थना करावी.

३. प्रत्येक विषयाचा तास सुरू होण्यापूर्वी व नंतर प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करावी. असे केल्यामुळे वर्गात शिक्षक जे काही शिकवतात त्या वेळी एकाग्रता साधण्यास मदत होते.

४. शाळा सुटल्यावर तेथील वास्तुदेवतेला, स्थानदेवतेला तसेच श्री सरस्वती व श्री गणेशाला कृतज्ञता व्यक्त करावी.

५. शाळेतून आल्यावर आधी हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन कपडे बदलावेत. देवाजवळ कृतज्ञाता व्यक्त करावी.

६. जेवण किंवा डबा खातांना देवाला प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करावी.

७. जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी. या वेळेत वृत्तपत्रे चाळावीत.

८. अभ्यासाला बसण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. प्रार्थना करून एका वहीवर आज कोणता अभ्यास करायचा आहे, ते लिहून काढावे.

९. प्रत्येक विषयाचा अभ्यास झाल्यावर वहीत नोंद करावी. (असे केल्याने मुलांना आपल्याला किती अभ्यास करायचा आहे, याची कल्पना येते व आपोआप जबाबदारीची जाणीव वाढण्यास मदत होते. सुरुवातीला काही दिवस पालकांनी कसा अभ्यास करायचा व अभ्यासाची सूची कशी काढायची, हे शिकवावे. नंतर मुले स्वतःच काढू लागतात.)

१०. सायंकाळचा वेळ खेळण्यासाठी द्यावा. हे खेळ मैदानातील असावेत.

११. तिन्हीसांजेच्या वेळी हात-पाय धुऊन देवापुढे बसून शुभंकरोती, स्तोत्रे, परवचा म्हणावी व थोडा वेळ नामजप करावा.

१२. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे वाचन, चित्र काढणे, चित्र रंगवणे करण्यास सांगावे. त्यानंतर काही अभ्यास राहिला असल्यास तो पूर्ण करण्यास सांगावे.

१३. रात्री ८.३० ते ९ या वेळेत जेवण झाल्यावर पालकांनी मुलांशी बोलावे. यात प्रामुख्याने –

अ) आज दिवसभरात शाळेत काय शिकवले ?

आ) दिवसभरात इतरांकडून काय शिकायला मिळाले ?

इ) दिवसभरात कोणत्या चुका झाल्या ?

ई) आजची चूक पुन्हा होऊ नये; म्हणून काय प्रयत्न केले ?

उ) दिवसभरात स्वतःमधील कोणकोणते दोष आढळून आले ?

वरील पाच मुद्यांवर त्यांना खेळीमेळीने योग्य ते दृष्टीकोन द्यावे.

मुलांना एक वही तयार करून द्यावी. त्यामध्ये दिनांक, दिवसभरात झालेली चांगली कृती, दिवसभरात झालेली चुकीची कृती, प्रार्थना व कृतज्ञता किती वेळा केल्या, नामजप किती वेळ झाला, असे रकाने करावेत व तो तक्ता ते रोज भरतील असे पहावे. सुरुवातीला त्यांना हा तक्ता भरण्यास अडचण येत असल्यास आपण त्यांना मदत करावी. एकदा अशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम बसला की, ते करतांना त्यांनाही आनंद मिळेल; कारण रोज त्यांना त्यांच्या चुका दिसतील व त्या कमी करण्यास त्यांच्याकडून प्रयत्नही होतील.

(टीप : हेच वेळापत्रक सकाळी ११ वाजता शाळा असतांनाही आचरणात आणावे.)