Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार


परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही.

आईवडील

परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला.

कार्य

अधम अशा क्षत्रियांचा वध : `वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन’ न म्हणता `राजविमर्दन’ म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’
कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.’ या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.

क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.

वैशिष्ट्ये

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.
तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर’, असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक : एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.
दानशूर : परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.
भूमीची नवनिर्मिती : जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.’ यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र’ ही संज्ञा आहे.
परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.

परशुरामक्षेत्रे

सह्याद्रीच्या उत्तर टोकावर साल्हेरच्या डोंगरावरील मध्ययुगीन गडावर, पंजाबात कांगडा जिल्ह्यामध्ये, कोकणात चिपळूणपासून पाच मैलांवरील एका डोंगरावर तसेच गोमंतकात काणकोण येथे परशुरामाचे एक पुरातन मंदिर आहे.

मूर्ती

भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची मूर्ती असते.

पूजाविधी

परशुराम हा श्रीविष्णूचा अवतार असल्याने तो उपास्यदेवता म्हणून पुजला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती एक कात व उत्सव म्हणून साजरी केली जाते.