दत्त जयंती

datta

मुलांनो, दत्ताप्रमाणे प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचा निश्चय करून खर्‍या अर्थाने दत्त जयंती साजरी करूया !

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्त जयंती सर्व दत्तक्षेत्रांत साजरी होते. विद्यार्थी मित्रांनो, दत्ताची उपासना करणे म्हणजे दत्ताप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांच्याकडून सतत शिकणे अन् शिकण्याचा निश्चय करणे ! दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दत्ताविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

१. दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

१ अ. दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’, याची अनुभूती देणारा ! प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्याविना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.

१ आ. अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे; पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे.’

१ इ. दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्वव्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर ही देवता मोठी आहे, तर आपल्यासारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकव.’

२. दत्ताच्या जन्माचा इतिहास

२ अ. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी महापतीव्रता अनसूयामातेची परीक्षा पहाण्याचे ठरवणे आणि आश्रमात जाऊन पतीच्या अनुपस्थितीत तिला विवस्त्र होऊन भोजन वाढण्यास सांगणे : अत्रिऋषींची पत्नी अनसूया ही महापतीव्रता होती. ती धर्माचरणानुसार, म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगात देवाला आवडेल, असेच वागत असे. ती कधीही अधर्माने वागत नसे. याविषयी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना समजल्यावर त्यांनी अनसूयामातेची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते अतिथीचे रूप घेऊन अनसूयेकडे भोजन करण्यासाठी आले. तेव्हा तिचे पती अत्रिऋषी तप करण्यासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी अनसूया त्यांना म्हणाली, ‘‘माझे पती येऊ देत. त्यानंतर मी आपणाला भोजन वाढते.’’ मग तिघेही म्हणाले, ‘‘ते येईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्हाला लगेच जेवण वाढा. आम्ही असे ऐकले आहे की, आपल्या घरी आलेला अतिथी कधीच उपाशी जात नाही; पण आमची एक अट आहे, ‘अंगावर कोणतेही वस्त्र परिधान न करता आपण आम्हाला जेवण वाढावे.’’

२ आ. अनसूयामातेने पतीचे स्मरण करून ‘तिन्ही देवता म्हणजे स्वतःची बाळे आहेत’, असा भाव ठेवल्याने त्यांचे लहान बाळांत रूपांतर होणे : अनसूया पतीला परमेश्वर मानणारी होती. तिने विचार केला, ‘मी मनाने पुष्कळ निर्मळ आहे. माझ्या मनात कोणताही वाईट विचार नाही.’ तिने थोडा वेळ पतीचे स्मरण केले. त्या वेळी तिने ‘हे अतिथी म्हणजे माझी लहान बाळे आहेत’, असा भाव ठेवला. त्यामुळे त्या अतिथींचे लहान बाळांत रूपांतर झाले.

         मुलांनो, हे कसे झाले ? अनसूयामाता पतीला ‘देव’ मानून प्रत्येक कृती करत असे. तिच्या मनात कोणत्याही पुरुषाविषयी एक क्षणही वाईट विचार येत नसे; म्हणून ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवतांची बाळे झाली. त्यानंतर अनसूयेने कडेवर घेऊन त्या बाळांना दूध पाजले.

२ इ. तिन्ही देवतांनी प्रकट होऊन वर मागण्यास सांगितल्यावर बाळे स्वतःकडे राहू देण्यास सांगणे आणि वर मिळाल्यावर ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त अन् शंकरापासून दुर्वास अशी तीन बालके अनसूयामातेला मिळणे : त्यानंतर अत्रिऋषी, म्हणजे अनसूयेचे पती आश्रमात आले. त्या वेळी त्यांना आश्रमात तीन तेजस्वी बालके दिसली. घडलेला सर्व प्रकार मातेने ऋषींना सांगितला. तेव्हा अत्रिऋषींनी ‘ती तीन बालके म्हणजे कोण आहेत ?’, हे ओळखले. त्या वेळी ब्रह्मा, विष्णु आणि महेश प्रकट होऊन म्हणाले, ‘‘कोणताही वर मागा.’’ त्यावर ते दोघे म्हणाले, ‘‘ही बालके आमच्याकडे राहू द्या.’’ त्याप्रमाणे वर देऊन देव आपल्या लोकांमध्ये निघून गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास अशी तीन बालके अनसूयामातेला मिळाली. त्यांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले अन् दत्त विष्णुकार्यासाठी पृथ्वीवर राहिला. अशा प्रकारे दत्ताचा जन्म झाला.

         यावरून असे लक्षात येते की, देव भक्तासाठी काहीही करायला सिद्ध असतो ! भक्त प्रल्हादासाठी तो खांबातून प्रकट झाला, तर संत जनाबाईंसाठी त्याने दळण दळले. आपण भक्त झालो, आपले वर्तन देवाला आवडेल, असे झाले, तर तो आपल्यासाठी काहीही करू शकतो. तसेच अनसूयामातेच्या संदर्भात झाले. आपणही आजपासून देवाचे आवडते भक्त होण्यासाठी प्रयत्न करूया.

३. दत्ताचे कार्य

         दत्त हा विष्णूचा अवतार असून त्याचे कार्य पालन करणे, लोकांमध्ये भक्तीची ओढ निर्माण करणे आणि लोकांना आदर्श अन् आनंदी जीवन जगण्यास शिकवणे, हे आहे.

४. दत्ताने केलेले गुरु

         दत्ताने २४ गुरु केले. यातून दत्त आपल्याला ‘सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे’, हे शिकवतो. जो शिकण्याच्या स्थितीत रहातो, तोच ज्ञान ग्रहण करू शकतो. या दत्त जयंतीला आपण सतत शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी जीवन जगण्याचा निश्चय करूया. त्यासाठी आपण दत्ताने केलेल्या काही गुरूंची माहिती पाहूया.

४ अ. पृथ्वी : आपण पृथ्वीप्रमाणे सहनशील असायला हवे. लहान मूल आईच्या मांडीवर असते, तेव्हा तिला लाथा मारते, अंगावर मल-मूत्र टाकते, तरी आई त्याच्यावर कधीच रागवत नाही. आपणही भूमीवर मलमूत्र टाकतो. तिला नांगरतो. तरीही ती कधीच गार्‍हाणे करत नाही. उलट ती आपण पेरलेल्या दाण्यांच्या कितीतरी पट धान्य आपल्याला देते.

         त्याचप्रमाणे आपल्याला कोणी अपशब्द बोलले किंवा कोणी आपला अपमान केला, तरी न रागवता आपण त्यांना क्षमा करून त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे. पृथ्वीचा हा गुण शिकण्याचा प्रयत्न केल्यास आपण इतरांना आनंद देऊ शकतो.

४ आ. वायू : वारा कुठेही गेला, तरी विरक्त रहातो. आपण वाईट मुलांच्या संगतीत गेल्यावर लगेच त्यांच्यासारखे होतो. आपणही वार्‍याप्रमाणे विरक्त असायला हवे.

४ इ. आकाश : आत्मा हा आकाशाप्रमाणे चराचरातील वस्तूंना व्यापून राहिला आहे. तो सर्वांशी समभावाने वागतो. त्याचे कुणाशीच शत्रुत्व नसल्याने तो निर्मळ आहे. आपणही मनाने निर्मळ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

४ ई. पाणी : आपण पाण्याप्रमाणे सर्वांशी स्नेहभावाने वागावे. पाणी कोणामध्ये भेद करत नाही. सर्वांशी समान वागते. ज्या भांडयात आपण पाणी ठेवतो, तसाच आकार ते घेते. तसेच आपण सर्वांशी जमवून घ्यायला हवे. पाणी उच्च स्थानाचा त्याग करून नीच स्थानाप्रत जाते. त्याप्रमाणे आपणही आपल्यातील अहंचा त्याग करून शरणागत व्हायला हवे.

४ उ. अग्नी : अग्नी अंधःकाराला नाहीसे करतो. आपणही स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनातील अहंकाररूपी अज्ञान नाहीसे करायला हवे. तसे झाल्यासच आपण स्वतः आणि समाज आनंदी जीवन जगू शकतो. अग्नीची ज्वाला क्षणात नाहीशी होते. आपला देहही क्षणभंगूर आहे. त्याचा खोटा अभिमान बाळगण्यापेक्षा देवाचे अस्तित्व मान्य करावे. देह आज आहे आणि उद्या नसेल; पण ‘आपल्यात असणारा आत्मा आजही आहे अन् तो अनंत काळ असणार आहे’, याची जाणीव आपल्यात जागृत करण्याचा दिवस म्हणजे दत्त जयंती होय.

४ ऊ. चंद्र : चंद्र स्वतःच्या शीतल किरणांनी इतरांना आनंद देतो. आपण आपल्या प्रत्येक कृतीतून इतरांना आनंद द्यायला हवा. आज आपण स्वतःला याची जाणीव करून दिली पाहिजे आणि दत्ताला प्रार्थना करावी,‘हे दत्तात्रेया, तू जसा तुझ्या किरणांनी इतरांना आनंदी करतोस, तसाच मला माझ्या वागण्या- बोलण्यातून इतरांना आनंद देता येऊ दे.’ दत्ताच्या चरणी पुढीलप्रमाणे क्षमायाचना करावी, ‘हे दत्तात्रेया, मी आजपर्यंत माझ्या कृतीतून कुणाला दुःख दिले असेल, तर मला क्षमा कर.’

४ ए. सूर्य : सूर्य सर्वांना समान प्रकाश आणि उष्णता देतो.

४ ऐ. अजगर : अजगर हा पूर्णपणे प्रारब्धावर विश्वास ठेवून निश्चिंत रहातो. जे मिळेल, ते खातो. तो कडू-गोड असे कोणतेही गार्‍हाणे करत नाही. आपणही जीवनात मिळेल, ते आनंदाने स्वीकारायला हवे.

४ ओ. समुद्र : पावसाळ्यात नद्यांनी पुष्कळ जल आणल्यास समुद्र आनंदी होत नाही किंवा नाही आणले, तरी दुःखी होत नाही. आपणही आपल्या जीवनात दुःख आले, तर दुःखी होऊ नये किंवा पुष्कळ सुख मिळाले, तर हुरळून जाऊ नये. सदैव स्थिर आणि शांत रहायला हवे.

४ औ. बालक : बालक ‘मला कोणी विचारावे किंवा मान द्यावा’, असा विचार कधीच करत नाही; पण ते सतत आनंदी रहाते. मान-अपमानाचा विचार न करता सर्व चिंतांचा परिहार करून आपल्याला बालकाप्रमाणे रहाता यायला हवे.

४ अं. वृक्ष : वृक्ष सतत परोपकार करतो. तो सावली, फळे, फुले इत्यादी सर्वच इतरांना देतो; पण कुणाकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. जर आपल्याला आनंदी जीवन जगायचे असेल, तर आपण प्रत्येक कृती निरपेक्षपणे करायला हवी.

५. दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

५ अ. गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.

५ आ. ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांचे प्रतीक आहेत.

५ इ. औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्ततत्त्व अधिक आहे.

६. मूर्तीविज्ञान

         दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.

६ अ. कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.

६ आ. शंख आणि चक्र : श्रीविष्णूचे प्रतीक आहे.

६ इ. त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.

६ ई. झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

७. प्रमुख तीर्थक्षेत्रे

७ अ. माहूर : ता. किनवट, जि. नांदेड, महाराष्ट्र.

७ आ. गिरनार : जुनागडजवळ, सौराष्ट्र. याला १० सहस्र पायर्‍या आहेत.

७ इ. कारंजा : श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान ! काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्तमंदिर उभारले.

७ ई. औदुंबर : श्री नृसिंह सरस्वती यांनी चातुर्मासात येथे निवास केला होता. हे स्थान महाराष्ट्रातील भिलवडी स्थानकापासून १० कि.मी. अंतरावर कृष्णाकाठी आहे.

७ उ. नरसोबाची वाडी : हे महाराष्ट्रात असून श्री नृसिंह सरस्वती येथे १२ वर्षे राहिले होते. येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे.

७ ऊ. गाणगापूर : हे पुणे-रायचूर या मार्गावर कर्नाटकात आहे. येथे भिमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे नृसिंह सरस्वती यांनी २३ वर्षे वास्तव्य केले होते.

८. सहलीसाठी पर्यटनस्थळी जाण्यापेक्षा
तीर्थक्षेत्री जाऊन तेथील चैतन्याची अनुभूती घेऊया

         दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा आपण अशा स्थानांना भेटी द्यायला हव्यात; कारण त्या स्थानातील शक्तीचा आपल्याला लाभ होतो. पर्यटनस्थळांना भेट देण्यापेक्षा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सहल घेऊन जाण्यास आपल्या शिक्षकांना सांगा. अनेकांना या ठिकाणी गेल्यावर शांत वाटणे, मनाची एकाग्रता वाढणे, तसेच उत्साह वाढणे, अशा अनेक अनुभूती आल्या आहेत.

९. दत्ताची उपासना कशी करावी ?

९ अ. गंध : दत्ताला अनामिकेने (करंगळीजवळच्या बोटाने) गंध लावावे.

९ आ. फुले : जाई आणि निशिगंध ही फुले सात किंवा सातच्या पटीत वाहावीत.

९ इ. उदबत्ती : चंदन, केवडा, चमेली, जाई किंवा अंबर या गंधाच्या उदबत्त्या लावाव्यात.

९ ई. अत्तर : दत्ताला ‘वाळा’ या गंधाचे अत्तर अर्पण करावे.

९ उ. प्रदक्षिणा : दत्ताभोवती ७ प्रदक्षिणा घालाव्यात.

१०. प्रत्येक देवतेची शास्त्रीय माहिती समजून घेऊन त्याविषयी इतरांना सांगून धर्मप्रसार करा

         मुलांनो, आज आपण ‘दत्त’ या देवतेविषयी माहिती पाहिली. यातून आपल्या लक्षात आले असेल, की आपल्या धर्माचे शिक्षण घेणे किती आवश्यक आहे ! शाळांमधून आपल्या देवतांची माहिती सांगत नसल्याने आपली देवतांविषयीची श्रद्धा वाढत नाही. तसेच कोणी त्याविषयी माहिती विचारली, तर आपल्याला ती सांगता येत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी आपण आपल्या प्रत्येक देवतेची शास्त्रीय माहिती समजून घेऊ आणि इतरांनाही सांगू. हेच दत्तात्रेयांना आवडेल. मग काय मुलांनो, आपल्या देवतांची माहिती समाजाला सांगून धर्मप्रसार करणार ना ?’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

दत्ताचा नामजप येथे ऐका !

दत्तपिठांविषयी सविस्तर विवेचन येथे वाचा !

दत्ताच्या आरत्यांचा संग्रह