गुढीपाडवा

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करणेआणि श्रीरामाने दुष्ट वालीचा वध करणे

‘आपण ज्या प्रकारे दिवसाचा प्रारंभ करतो, त्याप्रमाणे दिवसभरातील प्रत्येक कृतीवर त्याचा परिणाम होतो. दिवसाचा आरंभ जर आदर्श असेल, तर दिवसातील प्रत्येक कृती आदर्श होते. याचप्रमाणे वर्षारंभ जर आदर्श भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदु धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला केला, तर त्या व्यक्तीचे जीवन आदर्श बनेल. मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व आहे, ‘या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि आदर्श जीवन जगणार्‍या श्रीरामाने दुष्ट वालीचावधही याच दिवशी केला.’ आपणही या दिवशी वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या जीवनाचा आरंभ करायला हवा.

आदर्श हिंदु संस्कृतीचा आणि धर्माचा विसर पडल्याने आज
व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या जीवनात दुःख, तसेच तणाव निर्माण होणे

‘विद्यार्थी मित्रांनो, सार्‍या विश्वाला गुरुस्थानी असलेल्या आणि मानवाला आदर्श अन् सर्वगुणसंपन्न करणार्‍या, तसेच प्रत्येक व्यक्ती, कुटुंब अन् समाज यांना आनंदी जीवनपद्धतीचा अनमोल ठेवा प्रदान करणार्‍या हिंदु संस्कृतीचा, धर्माचा आम्हाला विसर पडला आहे. याचाच परिणाम म्हणून आज व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या जीवनात दुःख, तसेच तणाव आहे.

पूर्वी भारतात ‘मानवाने आदर्श जीवन कसे जगावे ?’ याचे शास्त्र शिकवले जायचे. सकाळी केव्हा उठावे, काय खावे, काय खाऊ नये, कोणते कपडे परिधान करावेत, स्त्रियांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, पुरुषांनी काय करावे अन् काय करू नये, इत्यादी सर्व शास्त्रे पूर्वी शिकवली जात होती. त्यामुळेच पूर्वीचे लोक आनंदी जीवन जगत होते.

इंग्रजांनी आनंदी जीवन देणारी आपली जीवनपद्धत
नष्ट करून केवळ दुःखी बनवणारी शिक्षणपद्धत आपल्यावर लादणे

मित्रांनो, विश्वातील सर्व लोक आपल्या जीवनपद्धतीचा अभ्यास करायला येतात. पूर्वीच्या काळी नालंदा, तक्षशिला यांसारखी विद्यापीठे होती. येथे सर्व प्रकारच्या कला आणि विद्या यांचे शिक्षण मिळत असे. मानवाला आनंदी जीवन प्रदान करणारी आपली जीवनपद्धत इंग्रजांनी नष्ट केली आणि त्याला भोगी बनवून त्याचे जीवन दुःखी करणारी अन् पदव्या देणारी शिक्षणपद्धती आपल्यावर लादली. आज आपण पाहतो, लहान मुलेही आत्महत्या करतात. त्यांच्या वर्तनात चांगला पालट झाला आहे किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार रुजले आहेत, असे आढळत नाही.

शास्त्र आणि इतिहास यांचा आधार नसलेल्या ३१ डिसेंबरला नववर्षारंभ
करण्यापेक्षा तो गुढीपाडव्याला करून आनंदी जीवनाची गुढी उभारूया !

ज्यांनी आमची संस्कृती नष्ट केली, आम्हाला आनंदी जीवन जगण्याच्या कलेपासून दूर ठेवले, अशा इंग्रजांचा ३१ डिसेंबर हा दिवस शास्त्राधार नसलेला आणि इतिहासहीन असा आहे. त्यामुळे आपण या दिवशी नववर्ष साजरे करायचे नाही.

दिवसभरातील आपले वागणे, बोलणे, चालणे, खाणे यांवर पाश्चात्त्य विकृतीचा प्रभाव पडला आहे. ३१ डिसेंबरला लोक मद्य पिऊन रात्रभर अयोग्य वर्तन करतात. याचा इतर लोकांना त्रास होतो. यावरून लक्षात येते, ‘हे आपले नववर्ष नाहीच.’ मित्रांनो, आपण अशा पाश्चात्त्य विकृतीला सीमापार करण्याचा निश्चय करूया. जर आपल्याला नवीन वर्षाचा आरंभ चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर आपण हिंदु संस्कृतीनुसार आपला वर्षारंभ साजरा करायला हवा; कारण गुढीपाडवा या तिथीमागे शास्त्र आणि इतिहास आहे. या दिवशी आदर्श आणि आनंदी जीवनाची गुढी उभारून सर्व भारतियांना तसे करण्यास प्रवृत्त करूया.

भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करणारे आणि विदेशी संस्कृतीप्रमाणे ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करणारे यांच्या जीवनपद्धतींमधील भेद

गुढीपाडव्याला नववर्षारंभ करणारे ३१ डिसेंबरला नववर्षारंभ करणारे
१. उठण्याची वेळ सूर्योदयापूर्वी उठणे सकाळी विलंबाने उठणे
२. चहा घेण्याची पद्धत स्नान करून घेणे ‘बेड टी’ घेणे
३. अभिवादन करण्याची पद्धत ‘नमस्कार’ म्हणणे ‘हॅलो’ म्हणणे
४. शुभेच्छा देणे मराठीतून इंग्रजीतून
५. आहार पोळी-भाजी इत्यादी सात्त्विक पदार्थ पिझ्झा इत्यादी तामसिक पदार्थ
६. वेशभूषा सदरा-पायजमा यांसारखे सात्त्विक पोशाख टी शर्ट-जीन्स यांसारखे असात्त्विकपोशाख
७.वाढदिवसकरण्याची पद्धत तुपाचा दिवा लावून, देवाला प्रार्थना करून साजरा करणे मेणबत्ती विझवून, केक कापून साजरा करणे

८. आई – वडिलांशी वागणे

‘आई-बाबा’ म्हणणे आणि त्यांनानमस्कार करणे ‘मम्मी-पप्पा’म्हणणे आणि ‘हॅलो, हाय’ करणे
९. शिक्षकांशी वागणे ‘गुरुजी’ म्हणणे आणि आदरानेनमस्कार करणे ‘सर’ म्हणणे आणि आदराने न वागणे
१०. आदर्श कोणाचा ? संत ज्ञानेश्वर, छ. शिवाजी महाराज, स्वा. सावरकर इत्यादी ब्रुसली, रॉक, सलमान खान इत्यादी
११. सायंकाळची कृती ‘शुभम् करोति’ म्हणणे दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणे
१२. खेळ खेळणे कबड्डी, खो खो यांसारखे भारतीय खेळ संगणकावरील विकृत खेळ
१३. नृत्य, गायन यांची भक्तीगीते, राष्ट्रभक्तीवरील गीते आणि भावगीते ऐकणे, लोकनृत्य करणे इंग्रजी पॉप गाणी गाऊन त्यावर नाचणे

विद्यार्थी मित्रांनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे आवर्जून करा !

अ. सर्वांना याच दिवशी नववर्ष साजरे करण्यास प्रवृत्त करा.

आ. शाळांमधून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे गुढीपाडव्याविषयी प्रबोधन करा. हा दिवस ‘संस्कृती दिन’ (कल्चर डे) म्हणून साजरा करण्यास शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना सांगा. फलकावर गुढीपाडव्याचे महत्त्व आणि सर्व मुलांना ‘नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे लिहिण्यास प्रवृत्त करा.

इ. नववर्षाच्या शोभायात्रेत किंवा प्रभात फेरीत सहभागी व्हा.

ई. घरासमोर सात्त्विक रांगोळी काढा.

उ. सदरा-पायजमा किंवा धोतर-सदरा हे सात्त्विक पोषाख परिधान करा. निळा, गुलाबी अशा सात्त्विक रंगाचे कपडे घाला.

ऊ. गुढी आणि आई-वडील, तसेच घरातील मोठी माणसे यांना नमस्कार करा.

ए. आपले मित्र आणि नातेवाईक यांना मराठीतूनच नववर्षाच्या शुभेच्छा द्या.

विद्यार्थी मित्रांनो, या शुभदिनी खालील गोष्टींचा निश्चय करूया !

अ. आपल्या जीवनात तणाव आणि दुःख निर्माण करणार्‍या दोषांचे, उदा. आळस, नियोजन न करणे, इतरांचा विचार नसणे इत्यादींचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करीन !

आ. आज्ञापालन, त्याग, क्षात्रवृत्ती इत्यादी रामाचे गुण आपल्यासह इतरांमध्ये यावेत, यासाठी सतत प्रयत्न करीन !

इ. रावणरूपी अहंकाराचा नाश करून श्रीरामासारखे आदर्श जीवन जगण्यासाठी प्रयत्नरत राहीन !

गुढीपाडव्याच्या दिवशी हे करू नका !

अ. देवतांच्या रांगोळ्या काढू नका.

आ. टी शर्ट-पँट यांसारखे विदेशी आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका.

इ. कोणालाही इंग्रजीत शुभेच्छा देऊ नका.

ई. प्रदूषणकारी फटाके वाजवू नका.

उ. ध्वनीप्रदूषण करणारे कर्णकर्कश डी. जे. लावू नका.

ऊ. विकृत चित्रपट पाहू नका.

‘आम्हाला आदर्श राज्यातील आदर्श आणि सर्वगुणसंपन्न नागरिक बनव’, अशी श्रीरामाला प्रार्थना करणे

मित्रांनो, अशाप्रकारे आपण आपले नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करून इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करूया. त्यामुळे खर्‍या अर्थाने आपल्यावर देवाची कृपा होईल. या दिवशी आपण सर्वांनी श्रीरामाला प्रार्थना करूया, ‘हे श्रीरामा, लवकरात लवकर तुझ्याप्रमाणे आदर्श राज्यकर्ते आम्हाला मिळून आदर्श राज्य येवो. आम्हाला आदर्श राज्यातील सर्वगुणसंपन्न नागरिक बनव. आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन यांसाठी सतत अन् गांभीर्याने प्रयत्न होऊ देत, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

गुढीपाडव्यासंबंधी शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !