हनुमान जयंती

          मित्रांनो, आज आपण दूरचित्रवाणीवर अनेक मालिका पहातो. त्यात शक्तीमानसारखे एखादे काल्पनिक पात्र दाखवले जाते. ते पाहून आपल्याला वाटते की, आपणही असे शक्तीमान व्हावे. अनेक मुले अशा पात्रांना खरे समजून तशी कृती करण्याचाही प्रयत्न करतात; पण हे सर्व खोटे आणि काल्पनिक असते. यापेक्षा आपल्या देवता पुष्कळ शक्तीमान आणि सर्वार्थाने आदर्श आहेत. मारुतिराया पुष्कळ शक्तीमान होता. त्याने केवळ एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला, तसेच समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश केला. मित्रांनो, आपल्याला अशा सर्वशक्तीमान हनुमानासारखे व्हायला आवडेल कि खोटे पात्र असलेल्या शक्तीमान आणि स्पायडरमॅनसारखे व्हावेसे वाटेल ?

         आपल्या मनात प्रश्‍न आला असेल की, हनुमान एवढा शक्तीमान कसा ? याचे उत्तर म्हणजे हनुमानाने श्रीरामाची भक्ती केली. भक्तीनेच शक्ती मिळते. भक्ती केली, तर आपणसुद्धा मारुतिरायासारखे शक्तीमान होऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वशक्तीमान आणि महापराक्रमी व्हावेसे वाटते ना ? आपणही मारुतिरायाचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यास सिद्ध होऊ. आज आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वशक्तीमान हनुमानाचा जन्म आणि इतर माहिती समजून घेऊ, तसेच कोणत्या गुणांमुळे तो श्रीरामाचा आवडता आणि परमभक्त झाला, हेही पाहू.

१. मारुतीच्या जन्माचा इतिहास आणि त्याला हनुमान असे नाव मिळण्याचे कारण

         राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.

२. कार्य आणि वैशिष्ट्ये

२ अ. महापराक्रमी : हनुमंताने जंबू, माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ या मोठमोठ्या विरांचा नाश केला. त्याने रावणालासुद्धा बेशुद्ध केले. समुद्रावरून उड्डाण करून लंकादहन केले आणि द्रोणागिरी पर्वतही उचलून आणला. मित्रांनो, या सर्व गोष्टींवरून आपल्याला मारुतिराया किती महापराक्रमी होता, हे लक्षात आले असेल.

२ आ. निस्सीम भक्त : मित्रांनो, मारुतिराया केवळ पराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. देवासाठी प्राण देण्याची त्याची सिद्धता होती. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. देवाच्या नामातच शक्ती आहे, हे त्याला ठाऊक होते. आपणही सतत नामस्मरण करून देवाचे भक्त होऊया अन् देवाची शक्ती मिळवूया. मारुतिरायाला देवाच्या सेवेपुढे सर्व तुच्छ वाटत असे. असा भक्तच देवाला आवडतो. आपणही त्याच्यासारखे भक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा.

२ इ. अखंड साधना : युद्ध चालू असतांना मारुतिराया थोडावेळ बाजूला जाऊन ध्यान लावे आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करत असे.

२ ई. बुद्धीमान : मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा ? मित्रांनो, जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. आजपासून आपणही मारुतिसारखी भक्ती करून बुद्धीमान होऊया !

२ उ. जितेंद्रिय : मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो; पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही.

२ ऊ. भाषणकलेत निपुण असणारा : मारुति उत्तम वक्ता होता. त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला.

  मित्रांनो, वरील सर्व गुण आपल्यात येण्यासाठी आपण मारुतीला प्रार्थना करूया, हे मारुतिराया, आम्हाला तुझ्यासारखी भक्ती करण्याची शक्ती आणि बुद्धी दे. तुझे सर्व गुण आमच्यात येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

३. मारुतीच्या मूर्तीचा रंग शेंदरी असण्याचे आणि त्याला शेंदूर लावण्याचे कारण

३ अ. प्रभु श्रीरामावरील निस्सीम भक्तीचे प्रतीक म्हणून सर्वांगाला शेंदूर लावणे : मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक गोष्ट आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, रामाचे आयुष्य वाढावे; म्हणून मी शेंदूर लावते. मित्रांनो, मारुतिराया रामाचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल, तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला. हे प्रभु श्रीरामाला समजल्यावर  तो प्रसन्न झाला आणि म्हणाला, मारुतिराया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे.

३ आ. मारुतीला शेंदूर लावणे आणि तेल वाहणे : हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात.

४. मारुतीची रूपे

४ अ. प्रताप मारुति : एका हातात द्रोणागिरी पर्वत आणि दुसर्‍या हातात गदा, असे याचे रूप असते. यातून मारुतीची सर्वशक्तीमानता पहायला मिळते.

४ आ. दासमारुति : श्रीरामापुढे हात जोडून उभा असलेला, मस्तक झुकलेले आणि शेपटी भूमीवर रुळलेली, असे याचे रूप आहे. यातून हनुमान किती नम्र आहे, हे आपण शिकायचे आहे.

४ इ. वीरमारुति : हा सतत लढण्याच्या पवित्र्यात उभा असतो. आपणही याच्यासारखे अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण निश्‍चय करूया की, आम्ही अन्यायाविरुद्ध लढायला मारुतीप्रमाणे सिद्ध राहू.

४ ई. पंचमुखी मारुति : आपण पुष्कळ ठिकाणी पंचमुखी मारुतीच्या मूर्ती पहातो. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह आणि कपिमुख अशी मूर्तीची मुखे असतात. पंचमुखीचा अर्थ आहे, पाच दिशांचे रक्षण करणारा. मारुति पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व या पाच दिशांचे रक्षण करतो.

५. पूजाविधी

          मारुतीच्या पूजाविधीत शेंदूर ,तेल आणि रुईची पाने वापरतात; कारण या वस्तूंमध्ये महर्लोकापर्यंतची देवतांची शक्ती आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते.

         आता आपण हनुमान जयंतीला करावयाच्या पूजाविधीची शास्त्रीय माहिती देणारा दृकश्राव्यपट (व्हिडिआे) पाहूया.

​६. पूजा करतांना करावयाच्या कृती

अ. मारुतीला अनामिकेने (करंगळीच्या जवळील बोट) शेंदूर लावावा.

आ. त्याला रुईची पाने आणि फुले पाच किंवा पाचच्या पटीत वहावीत.

इ. मारुतीला केवडा, चमेली किंवा अंबर यांच्या २ उदबत्त्या घेऊन ओवाळावे.

उ. पाच किंवा पाचच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात.

ऊ. समर्थ रामदास स्वामींनी रामाचा तेरा कोटी जप केल्यावर त्यांच्यासमोर मारूति प्रकट झाला आणि त्याने सांगितले, या स्तोत्राचे भक्तीपूर्ण पठण करणारा निर्भय होईल. मित्रांनो, आपणही हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रतिदिन मारुतिस्तोत्राचे पठण करण्याचा निश्‍चय करूया.

७. सर्वशक्तीमान आणि महापराक्रमी देवतेचे म्हणजे हनुमानाचे होणारे विडंबन रोखा !

७ अ. हनुमानाचे चित्र असलेला पुठ्ठा (पॅड) वापरू नका ! : काही मुले परीक्षेला जातांना हनुमानाचे चित्र असलेला पुठ्ठा वापरतात. यांतून आपण देवतेचा अपमान करतो. मित्रांनो, आपण असा अपमान करायचा का ? असे करणे पाप असल्याने आपण ते करायला नको आणि आपल्या मित्रांनाही ते करण्यापासून रोखूया. यामुळे आपल्यावर हनुमानाची कृपा होईल.

७ आ. हनुमानाचे चित्र असलेले टी शर्ट घालणे बंद करा ! : काही मुले हनुमानाचे चित्र असलेले शर्ट घालतात. हेसुद्धा आपल्या देवतेचे विडंबन आहे. ते आपण रोखायला हवे. टी शर्ट धुतांना तो चुरगळला जातो आणि आपण तो कुठेही काढून ठेवतो. यांतून देवतेचा अपमान होतो. असे करणे पाप आहे, हे लक्षात ठेवा.

        मित्रांनो, आपल्या आदर्श आणि सर्वशक्तीमान अशा देवतांचे विडंबन आपण सहन करायचे का ? नाही ना ? तर आजपासून आपण हनुमानाचे होणारे विडंबन रोखण्याचा प्रयत्न करूया आणि  कुणी करत असेल, तर त्यालाही समजून सांगूया.

        आज आपल्याला मारुतिरायाविषयीची माहिती समजली, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि यातील प्रत्येक कृती आचरणात येण्यासाठी मारुतिरायाकडे शक्ती मागूया.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.


मारुतिस्तोत्र  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !


मारुतिची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !