दसरा (दशहरा)

विद्यार्थी जीवनातील लेखणी, पुस्तके आणि वह्या रूपीशस्त्रांचे पूजन करणे अन् आपल्या वर्तनातूनत्यांचा अवमान होऊ न देणे, हाच खरा दसरा होय !

विद्यार्थीमित्रांनो, आपण अनेक सण साजरे करतो आणि प्रत्येक सणातून आपल्याला जीवनाची अनेक नैतिक मूल्ये शिकायला मिळतात. ही मूल्ये आपण आपल्या जीवनात उपयोगात आणल्यास आपले जीवन आनंदी आणि आदर्श बनते. आपला प्रत्येक सण म्हणजे प्रत्यक्ष आदर्श जीवनाचा पाठच आहे. आश्विन शुद्ध दशमीलादसरा हा सण साजरा करतात.दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.आज आपणया सणाचे महत्त्व जाणून घेऊया.

१. विद्यार्थ्यांमधील दहा दुर्गुणांना हरवण्याचा निश्‍चय करण्याचा दिवस म्हणजे दसरा ! : दसर्‍याला दशहरा असेही म्हणतात. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीचे नऊ दिवस देवीने असुरांशी युद्ध करून आणि दहाही दिशांवर नियंत्रण मिळवले.

मित्रांनो, तोच हा दिवस ! जसे देवीने असुरांचा नाश केला, म्हणजे वाईट गोष्टींचा नाश केला, तसा आपणसुद्धा या दिवशी आपल्यातील कोणत्याही दहा दोषांचे निर्मूलन करण्याचा निश्‍चय करायला पाहिजे. आपणसुद्धा आपल्यातील दहा दोषांचे निर्दालन करायचे आणि दहा दुर्गुणांना हरवायचे. तोच आपल्यासाठी खरा दसरा होय. मग मित्रांनो, आपण असे करूया ना ?

२. रावणावर रामाने विजय मिळवलेला आणि पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे परत घेतली तो दिवस म्हणजे विजयादशमी ! : त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्राने याच दिवशी रावणाचा वध केला आणि रावणावर विजय मिळवला, म्हणजे विजयाचा दिवस म्हणून याला विजयादशमी असेही म्हणतात. द्वापरयुगात पांडवांनी अज्ञातवास संपताच याच दिवशी शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे परत घेतली होती.

‘श्रीरामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले.’

३. दसर्‍याच्या दिवशी आप्तस्वकियांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटणे : पूर्वी मराठे वीर शत्रूचा प्रदेश जिंकून सोन्या-नाण्याच्या रूपात संपत्ती घरी आणून ती देवासमोर ठेवत आणि मोठ्यांना नमस्कार करीत. ती प्रथा आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो.

४. शस्त्र आणि उपकरण यांचे पूजन

४ अ. राजा : या दिवशी राजे आपल्या शस्त्रांची पूजा करतात. प्रत्येक शस्त्रामध्ये देव आहे, या श्रद्धेने आपण शस्त्रांची पूजा करायची असते.

४ आ. शेतकरी : या दिवशी शेतकरी आपल्या शेतीत साहाय्य करणार्‍या अवजारांची पूजा करतात.

४ इ. विद्यार्थी : विद्यार्थी आपल्या वह्या-पुस्तकांची पूजा करतात. मित्रांनो, आपणसुद्धा आपल्या वह्या, पुस्तके, लेखणी या सर्वांची पूजा करायला हवी; कारण विद्यार्थी जीवनातील ही शस्त्रेच आहेत. तसेच या प्रत्येकात देव आहे, याची जाणीव आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. ही शस्त्रे नसतील, तर आपण काहीच करू शकणार नाही. या सर्वांप्रती दसर्‍याच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे; कारण या सर्व उपकरणांमुळे आपण अभ्यास करू शकतो. मित्रांनो, विद्यार्थी जीवनातील ही शस्त्रे सरस्वतीमातेचे प्रतीक आहेत. आपण आपल्या जीवनातील ज्ञानग्रहण करायला साहाय्य करणार्‍या सर्व शस्त्रांचे या दिवशी पूजन करूया.

५. शालेय उपकरणांची क्षमा मागणे : काही मुले वह्या फेकणे, पेनाने मारणे, इतरांना दुःख देणे, तसेच दफ्तर फेकणे, अशा कृती करतांना दिसतात. मित्रांनो, हे अयोग्य आहे. आपण या सर्व उपकरणांची या दिवशी प्रथम क्षमा मागूया. या उपकरणांचा अपमान होऊ नये, यासाठी देवाकडे प्रार्थना करूया. करणार ना ? या शस्त्रांचा आपल्याकडून अपमान झाल्यास क्षमा मागूया. हाच खरा दसरा होय !

– श्री. राजेंद्र पावसकर, पनवेल.

Leave a Comment