पालकांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करा अन् आदर्श पिढी घडवा !

पालकांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करा अन् मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श पिढी घडवा !

आजची पिढी संगणक, टॅब, स्मार्ट फोन इत्यादी आधुनिक उपकरणांच्या आहारी इतकी गेलेली आहे की, त्यांना वाचन, गायन, मैदानी खेळ आणि त्या माध्यमातून विकसित होणारी बुद्धी, घडणारे मन अन् शरीर यांचे महत्त्वच राहिलेले नाही. धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी बालक घडवणे, तसेच त्यांच्यावर संस्कार करणे, हेही त्यामुळे कठीण झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठीचे उपाय कळावेत, यासाठीच श्रीकृष्णाने आधुनिक उपकरणांच्या वापराचे दुष्परिणाम, पालकांनी घ्यावयाची काळजी आणि मुलांना संस्कारक्षम करण्याचे महत्त्व यांविषयी सुचवलेली सूत्रे…

१. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन त्यांचे दुष्परिणाम भोगणारी सध्याची पिढी

१ अ. ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ यांच्या आहारी गेल्यामुळे वाचनास वेळ नसणारी आजची मुले : मागील पिढ्यांच्या मुलांवर सातत्याने वाचनाचे महत्त्व बिंबवले जात असे. परिणामतः संतचरित्रे, तसेच क्रांतीकारकांच्या आणि अन्य चांगल्या संस्कार करणार्‍या गोष्टी वाचनात येऊन त्यांचाच मुलांची पुढील प्रगती होण्यास हातभार लागत असे; परंतु आता ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ सारख्या विविध अ‍ॅप्समुळे मुलांना ग्रंथवाचन करण्यास उसंतच नाही, असे झाले आहे.

१ आ. ज्ञानार्जन करण्यापेक्षा इकडची माहिती तिकडे घेणे आणि गुण मिळवणे, यासाठीच प्रयत्न करणारे सध्याचे विद्यार्थी : सध्या शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये करावे लागणारे विविध प्रकल्पही ‘सायबर कॅफे’मध्ये जाऊन वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून माहिती शोधून पूर्ण होतात. अनेकांच्या संदर्भात ज्ञानार्जन करण्यापेक्षा केवळ इकडची माहिती तिकडे घेणे आणि गुण मिळवणे, असे घडत असल्याचे लक्षात येत आहे.

१ इ. विविध ‘अ‍ॅप्स’वरील माहिती एकमेकांना पाठवतांना ती नीट वाचलेली नसल्याने मुलांना गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागणे : बहुतांश मुलांचे वाचन या विविध अ‍ॅप्स आणि संकेतस्थळे यांवरचेच असतेे. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि ‘हाईक’वर आलेली माहिती, छायाचित्र किंवा चलत्चित्रे (व्हिडीओे) इतर मित्रांना पाठवणे अन् त्यांच्याकडून कौतुक करवून घेणे, यांतच ही मंडळी खुश रहातात. बर्‍याच वेळा या अ‍ॅप्सवरील माहिती नीट पाहिलीसुद्धा जात नाही. त्यामुळे अनेक गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे सर्व नियतकालिकांतून छापून येणार्‍या वृत्तांमध्ये आपण वाचतच आहोत.

१ ई. लहान मुलेे वर्तमानपत्र वाचत नसणे आणि संस्कार करणारे कार्यक्रम सध्याच्या पिढीला आवडत नसणे : ‘प्रतिदिन सकाळी येणारे वर्तमानपत्र किती मुले वाचतात ?’, याचा अभ्यास केल्यासही आपणास कळू शकेल की, ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. मध्यंतरी प्रवासात एक विदेशी छायाचित्रकार भेटला होता. त्याने विचारले, “भारतात नियतकालिकांची स्थिती काय आहे ? अमेरिका आणि फ्रान्स येथेही प्रिंट मिडीया आता डबघाईला आल्यासारखी झाली आहे. माझी मुलेही वृत्तपत्रे वाचत नाहीत. दूरचित्रवाणीवरील हिंसक कार्यक्रम पहातात. प्रेमभावना आणि संस्कार असलेले कार्यक्रम सध्याच्या पिढीला आवडतच नाहीत.” ही स्थिती केवळ विदेशातच नाही, तर आपल्या देशातही आता पालकांना सतावू लागली आहे. भेद एवढाच की, तेथे वाचन आणि दूरचित्रवाणीवरील चांगले कार्यक्रम हा प्रकार गुंडाळून ठेवल्यासारखा झाला असेल, तर ‘आपल्याकडे त्याचा आरंभ आहे’, असे आपण म्हणू शकतो.

१ उ. दिवसभर कानात ‘इअर फोन’ घालून आधुनिक गाणी ऐकल्याने होणार्‍या दुष्परिणांमापासून अनभिज्ञ असलेली आजची मुले : संगणक आणि भ्रमणभाष यांवरच सर्व सोयी उपलब्ध असल्याने मुलांना पेटी, तबला आणि तंबोरा इत्यादी वाद्यांची ओळख ही तोंडओळखच असते. पूर्णवेळ कानात ‘इअरफोन’ घालून आधुनिक गाणी ऐकण्यातच त्यांचा वेळ जातो. या वाद्यांचा होणारा परिणाम आणि स्पंदनशास्त्राचा ते अभ्यास तरी कधी करणार ? बरं, ते ऐकतात, ते संगीत तरी काय करते ? तर त्यांच्यातील आणि आसपासच्या वातावरणातील रज-तम वाढवते; परंतु याचेही शिक्षण नसल्याने मुलांना हे कळतच नाही.

१ ऊ. शाळा, अभ्यास आणि शिकवणी यांतच मुलांचा अधिक वेळ जात असणे अन् मैदानी खेळांची जागा संगणकीय खेळांनी घेतलेली असणे : खेळाच्या संदर्भात म्हणावे, तर मैदानी खेळ मागे पडू लागल्यासारखे वाटतात आणि त्याला कदाचित् असे कारणही दिले जाऊ शकते की, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि त्यामुळे वाढणारे काँक्रिटीकरण. मुलांचे आजचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की, त्यांची स्थिती केवळ स्पर्धेतील घोड्यांसारखी झाली आहे. शाळा, अभ्यास आणि शिकवणी यांतच अधिक वेळ जात असल्याने मिळणार्‍या रिकाम्या वेळेत संगणकीय खेळांतच ते गुंतून रहातात. त्यामुळेही मैदानी खेळ मागे पडले आहेत.

२. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकवणारे मार्गदर्शक देणे, ही काळाची आवश्यकता असणे

‘आज काळ पालटला आहे. आपली विचारसरणीसुद्धा पालटली पाहिजे. ‘आधुनिक उपकरणांचा चांगला उपयोग कसा करावा ?’, हे टीका करणार्‍यांना ठाऊक नाही’, असे काही तथाकथित समाजसुधारक म्हणतील; परंतु या पालटत्या काळातील पिढीसुद्धा तितकीच प्रगल्भ, बुद्धीमान आणि चाणाक्ष आहे, याकडे आपण दुर्लक्ष करायला नको. मुलांना योग्य मार्गदर्शन करून या उपकरणांचा योग्य उपयोग शिकवणारे मार्गदर्शक, तसेच दिशादर्शक आज आपल्याला त्यांना द्यायला हवेत. केवळ विचारसरणी पालटून आपल्याला समाज घडवता येऊ शकणार नाही.

३. मुलांंच्या मनात राष्ट्र अन् धर्म प्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवणे, हे पालकांचे कर्तव्य असणे

लहान मुले ही ओल्या मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना घडवू, तशी ती घडतात. ‘त्यांना घडवण्यासाठी आधी स्वतःला घडायला, म्हणजे पालटायला हवे’, हे पालकांनी जाणायला हवे. केवळ शाळा आणि महाविद्यालये यांतील शिक्षकांवर अवलंबून न रहाता प्रत्येक पालकानेच आपल्या मुलासाठी झटले पाहिजे. त्याचा शिक्षक, मित्र आणि मार्गदर्शक बनले पाहिजे. शाळा आणि महाविद्यालये यांतील शिक्षक हे राष्ट्र अन् धर्म प्रेमाचे बीजारोपण करतील; परंतु त्याच्यामध्येे राष्ट्र आणि धर्म प्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवायला, त्याच्यातील गुणांचा विकास करून त्याचा उपयोग योग्य प्रकारे करवून घेण्यासाठी पालकच हवेत.

४. समाजात एकीकडे व्यावहारिक प्रगती करणारे पालक आणि दुसरीकडे मुलाला आज खायला काय देऊ ? या विवंचनेत असणारा पालक अशी दोन टोके पहावयास मिळणे

तसे पहाता आज बहुतांश पालक हे चांगला शैक्षणिक दर्जा असलेले आहेत. शहरी भागातील आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर असतात, तसेच नोकरी नाही; परंतु काहीसे शहरातील पालकांप्रमाणे वागणारे गावाकडील पालक आपण पाहू शकतो. एकंदरित समाजाचे राहणीमान चांगले झाले आहे, तरीही समाजातील एका भागात व्यावहारिक प्रगती, पैसे मिळवणे आणि ते स्वतःच्या सुखासाठी व्यय करणे असे स्वरूप पहायला मिळते, तर दुसर्‍या ठिकाणी शिक्षण अन् संस्कार यांपेक्षा ‘मुलाला आज खायला काय देऊ ?’ या विवंचनेत असणारा पालकही दिसतो.

५. सनातन संस्था आणि सनातनच्या उपक्रमांमुळे पालक अन् मुले यांच्यात झालेली लक्षणीय सुधारणा

५ अ. राष्ट्रप्रेमी आणि संस्कारी पिढी सिद्ध करून समाजऋणातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला देवाने संधी दिलेली असणे अन् सनातन संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी कार्यरत असणे : अशा या पालकवर्गाला धर्मशास्त्रानुसार देवऋण, ऋषीऋण, समाजऋण, मातृ-पितृऋण यांपैकी समाजऋणातून मुक्त होण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि संस्कारी पिढी सिद्ध करून मनुष्यजन्म सार्थकी लावण्याची देवाने दिलेली संधीच आहे.

देवाने दिलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी सनातन संस्थेकडून प्रबोधनाचे गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्य चालू आहे. या अंतर्गत बालसंस्कारवर्ग, प्रवचने, सत्संग, प्रश्‍नमंजुषा इत्यादी विनामूल्य उपक्रम, तसेच सनातन प्रभात नियतकालिक आणि ‘www.balsanskar.com’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहस्रो साधक मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

५ आ. सनातनच्या उपक्रमांमुळे पालकांनी आधुनिक उपकरणांच्या संदर्भात स्वतःत काही पालट केल्याने मुलांवरही त्याचा चांगला परिणाम होणे : अनेक शाळा, महाविद्यालये आणि खाजगी शिकवणीवर्ग यांचा या सर्व उपक्रमांस उस्फूर्त सहभाग अन् पाठिंबा असतो. हे विशेष आणि स्तुत्य आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून केवळ पाल्यांवरच संस्कार होत नाहीत, तर ‘आपण स्वतःला पालटायला हवे’, याची पालकांनाही जाणीव होऊ लागली आहे. अशाच काही पालकांनी आधुनिक उपकरणांच्या वापरात स्वतःत काही पालट केले आणि त्यामुळे मुलांवरही त्याचा चांगला परिणाम झाला. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर मित्र गटांकडून येणारे संदेश मुलांच्या वाचनात येणार नाहीत, याची काळजी घेणे

२. अशा प्रकारच्या गटांमध्ये स्वतःचा सहभाग बंद करणे अथवा गटातील मित्रांनाही ‘आपल्या संदेशांचा स्तर कसा हवा ?’ याची जाणीव करून देणे

३. संगणक, भ्रमणभाष इत्यादींचा वापर आवश्यक तितकाच करणे आणि वेळ अन् पैसे यांची बचत करून तो वेळ मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी देणे

४. ‘संगणक आणि भ्रमणभाष यांचा वापर राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी कसा करावा ?’ हे स्वतः शिकणे अन् मुले वयाने मोठी असल्यास त्यांनाही शिकवणे

५ इ. पालकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे घरातील तणाव न्यून होऊन मुलांमध्ये देश आणि धर्म यांविषयी अभिमान निर्माण करणे सहज शक्य होऊ लागणे : हे पालट केल्याने खरोखरच पालकांना कौटुंबिक तणाव न्यून होऊन आपसातील प्रेम वाढल्याचे जाणवले, तसेच विविध धार्मिक कृतींचा अभ्यास झाल्याने त्या कृती करणे आणि मुलांकडून करून घेणे, राष्ट्र-धर्म यांविषयी अन् क्रांतीकारकांविषयी अभिमान निर्माण करणारे कार्यक्रम किंवा प्रदर्शन यांसाठी मुलांना घेऊन जाणे, दिवाळीत गड-किल्ले बनवून त्याची माहिती मिळवण्याच्या माध्यमातून राजे शिव छत्रपतींसारखा देव, देश आणि धर्म यांविषयी अभिमान निर्माण करणे, हे सहज शक्य होऊ लागले आहे.

६. बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येकानेच सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक

हिंदु धर्मातील प्रत्येक गोष्ट किती व्यापक उद्देशाने सांगितली आहे, हे आपण प्रत्येकानेच जाणून घेणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण घ्या आणि त्याचा प्रसार करा. धर्म वाचला, तर राष्ट्र वाचेल आणि राष्ट्र वाचले, तर समाज वाचेल. आजचे प्रत्येक मूल, तसेच त्याचे पालक हे या समाजाचे घटक आहेत. त्यामुळे आजच्या या बालदिनी प्रत्येकानेच चांगले दिवस येण्यासाठी मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– श्री. वैभव आफळे, सनातन संकुल, देवद, पनवेल. (९.११.२०१४)