हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण !

‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का ? त्या आजीचे वय आहे ८५ वर्षाचे. त्यांची दृष्टी अजूनही उत्तम आहे. श्रवणही चांगले आहे. ऊस खाता येईल,असे दात आहेत. शरीर तसे धडधाकट आहे. त्या घरकाम आणि स्वयंपाकसुद्धा करतात. त्यांचा वीस वर्षे वयाचा नातू आजीची थट्टा करण्याकरता विचारतो, आजी, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते ?

आजी : अरे, सूर्य नव्या रुपयासारखा चमकतो ना म्हणून. सगळी दुनियाच रुपयाभोवती फिरते ना. पृथ्वीचा काय अपराध ?

नातू : अरे वा ! आजी तू खूप शिकलेली आहेस.

आजी : छे ! छे ! असले काही अभद्र बोलू नकोस. मी चुकीचे सांगितले का ?

नातू : आजी, तू अगदी खर तेच सांगितलेस; म्हणून तर मी विचारले.

आजी : खरे बोलायला शिकण्याची काय गरज ? शिकावे लागते, ते खोटे बोलण्याकरता. पत्रकार, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी असे सगळे परदेशात शिकायला जातात, ते लोकांना भुलवून अधिक पैसे कसे उपटता येतील, याकरताच ना ? तिथे खोटे बोलावे लागते. भारतातल्या शिक्षणाने तसे लोकांना चांगले फसवता येत नाही. परदेशातल्या शिक्षणाने तो खोटे बोलण्यात विलक्षण कुशल होतो. (गंभीर वाणीने) खरं बोलायला शिकण्याची आवश्यकता नाही. गुन्हेगाराला, खुनी माणसाला पाठीशी घालायचे असेल, तर खोटे बोलावे लागते. रुग्णाकडून जास्त पैसे उकळण्याकरता वैद्याला खोटे बोलावे लागते. लोकांना फसवून आपला माल त्यांच्या गळी उतरविण्याकरता व्यापार्‍याला खोटे बोलावे लागते. श्रीमंत वडिलांच्या मुलाकडून पैसे उकळण्याकरता शिक्षकाला खोटे बोलावे लागते.त्याकरता शिकावे लागते. खरे बोलणार्‍याला शिकण्याची काय गरज ? खरे बोलणार्‍याच्या जवळ केवळ हृदय हवे आणि तेच तर शिक्षणाने हिरावून घेतले आहे ना !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)