चहाला पर्यायी पेय : कशाय

१ अ. धने-जिर्‍याचा कशाय : चहापेक्षा धने-जिर्‍याचा कशाय पिणे चांगले असते.

१ आ.बडिशेप इत्यादींचा कशाय : प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायात पुढील औषधी घटक वापरून कशाय करण्याचा प्रघात आहे. बडिशेप, धने, जिरे, ओवा, बाळंतशेप, गोखरु, वावडिंग, सुंठ आणि ज्येष्ठमध या वस्तू सम प्रमाणात घेऊन थोड्या भाजून मग दळून घ्याव्यात. प्रतिदिन काढा करण्यासाठी कपभर पाण्यात पाऊण चमचा दळलेली भुकटी घालून उकळून घ्यावे आणि कशाय गाळून उष्ण असतांना घ्यावा. त्यात साखर, मीठ, दूध इत्यादी काही घालावे लागत नाही.

१ इ. लाभ : हा काढा पोटाला पुष्कळ चांगला असतो. यातील बडिशेप आणि धने पोट स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहेत, जिरे शरिरातील उष्णता न्यून करते, ओव्यामुळे पोटात वायू (गॅसेस्) होत नाही, वावडिंगामुळे जंत होत नाहीत, सुंठीमुळे कफ होत नाही आणि ज्येष्ठमधाने काढ्याला गोडी येते अन् घसा स्वच्छ रहातो.

तुळशीचा काढा

प्रत्येक ऋतूनुसार ठराविक औषधी वनस्पतींचा काढा घेणे आरोग्याला अतिशय उपयुक्त ठरते. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा आवश्यकतेनुसार साखर घालून घेऊ शकतो. या काढ्यात दूध घालू नये. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा घेतल्याने सर्दी, खोकला, ताप येणे इत्यादी विकार होत नाहीत. तुळस विषघ्न असल्याने शरिरातील विषारी द्रव्यांचा नाश होतो, तसेच पचन सुधारून भूक चांगली लागू लागते.

तुळशीचा काढा करण्याची पद्धत

मंजिर्‍यासहित तुळशीची २५-३० पाने १ कप पाण्यात उकळावीत. पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा. काढा गाळून उष्ण असतांनाच आवश्यकतेनुसार साखर घालून किंवा न घालता प्यावा. तुळशीचा काढा करण्यापूर्वी ३ घंटे तुळशीची पाने पाण्यात भिजवून ठेवल्यास काढ्यात तुळशीचा अर्क अजून चांगला येतो. सकाळ-सायंकाळ काढा करणार असू, तर एक वेळ वापरलेल्या पानांसमवेत थोडी नवीन पाने वापरू शकतो.

आयुर्वेदामध्ये दिलेली दिनचर्या अशा पद्धतीने पाळण्यासाठी आपल्याला अतिरिक्त वेळ द्यावा लागत नाही. प्रतिदिन अशी दिनचर्या पाळल्यास आपण पुष्कळ रोग टाळून जीवनातील अमूल्य वेळ वाचवून साधना चांगल्या पद्धतीने करू शकतो.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment