प्रख्यात बालरोगतज्ञ पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) यांनी केला देहत्याग !

पू. अप्पाकाका

पू. अप्पाकाका

बालसंस्कार संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलांविषयीच्या विविध विषयांवरील लेखांद्वारे मुलांवर सुसंस्कार करणारे प्रख्यात बालरोगतज्ञपू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) (वय ८० वर्षे) यांनी ९ नोव्हेंबर २०१३ रोजी पहाटे ३ वाजता चेंबूर (मुंबर्इ) येथील त्यांच्या रहात्या घरी देहत्याग केला. सनातन संस्थेचे प्रेरणास्थानप.पू.डॉ. जयंतबाळाजी आठवले यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

पू. अप्पाकाका हे सनातन यांनी स्वतःला परम भाग्यशाली समजण्याची कारणे

१. गुरुवर्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवलेयांचे वास्तव्य भूतलावर असतांना भगवंताने मला जन्मास घातले.

२. जन्म भारतभूमीसारख्या वेदभूमीत आणि पुण्यभूमीत झाला.

भारताला कर्मभूमी आणि पुण्यभूमी म्हणण्याची कारणे

२ अ १. वेदांची निर्मिती होण्याचे स्थान : भगवंताने सृष्टी-निर्मितीच्या वेळी मनुष्याला मार्गदर्शक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगणारे वेद निर्माण केले. त्यांत अनेक द्रष्ट्या ऋषीमुनींनी ध्यानात विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळवून आणि स्वतः नामानिराळे राहून भर टाकली.

२ अ २. भगवंताने अवतार घेणे आणि अजूनही अंशावतार घेत असणे

२ अ २ अ. श्रीराम : त्रेतायुगात भगवान श्रीरामाने देव अवतार घेऊन आदर्श मनुष्य जीवन कसे जगावे ?, याचा पायंडा आपल्या कृतीतून घालून दिला.

२ अ २ आ. श्रीकृष्ण : भगवान श्रीकृष्णाने आपल्या जीवनातून आदर्श अवतार कसा असतो ?, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्याने युद्धभूमीवर अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगून वेद अन् उपनिषद यांतील सर्वश्रेष्ठ ज्ञान सारांशरूपाने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. आदर्श कर्मयोगी, भक्तीयोगी, ज्ञानयोगी आणि ध्यानयोगी आपले जीवन कसे जगतो, हे स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिले.

२ अ २ इ. महर्षी व्यास : महर्षी व्यासांनी वेदांची पुनर्रचना करून, तसेच महाभारत आणि पुराणे लिहून अध्यात्मातील उच्च ज्ञान त्या वेळच्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले.

२ अ २ ई. तीर्थक्षेत्रे : जगातील सर्वांत अधिक, म्हणजे ५२ तीर्थक्षेत्रे भारतभूमीत आहेत.

२ अ २ उ. ग्रंथ निर्मिती : गुरुवर्य प.पू. डॉक्टरांनी कलियुगासाठी उपयोगी अशा अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचे जगातील अनेक भाषांत भाषांतर करून अध्यात्मातील ज्ञान जगाला उपलब्ध करून दिले. मोक्षप्राप्तीसाठी जलद गतीने आध्यात्मिक उन्नती करवून देणारा गुरुकृपायोग जगाला अर्पण केला. त्यानुसार प्रत्यक्ष साधना करवून घेऊन गुरुपौर्णिमा २०१३ पर्यंत ३६ साधकांना १० ते १५ वर्षांत संतपदाला पोहोचवले.

३. जन्म

३ अ. संतश्रेष्ठ आणि राष्ट्रपुरुषांच्या राज्यात जन्म : माझा जन्म महाराष्ट्रात झाला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, जेथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास इत्यादी संतांनी आपले अभंग, ओवी आणि समास यांतून परमोच्च ज्ञान मराठी भाषेतून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यांना भक्तीमार्गाला लावले.

३ आ. कुटुंब : माझा जन्म सत्शील, सात्त्विक, मध्यमवर्गीय, सुशिक्षित आठवले कुटुंबात झाला.

३ आ १. वडील : आदर्श शिक्षक होते.

३ आ २. आई-वडील : श्री. बाळाजी आणि सौ. नलिनी आठवले हे आदर्श पालक होते आणि आम्हाला देवासमान होते. दोघेही धार्मिक होते. ते नामसाधना करून वृद्धावस्थेत संतपदाला पोहोचले.

३ आ ३. चार भाऊ : चि. अनंत, जयंत, सुहास आणि विलास साधना करणारे, धार्मिक आणि सात्त्विक आहेत.

३ आ ४. प.पू. डॉक्टर : तीन क्रमांकाचा भाऊ, म्हणजेच माझे गुरुवर्य प.पू. डॉ. जयंत आठवले. त्यांनी आपल्या आध्यात्मिक कार्यामुळे कुलाचा नव्हे, तर भारतभूमी आणि सृष्टीचाच उद्धार केला. अशी जगद्गुरु असणारी व्यक्ती आपला भाऊ असावा, त्यापेक्षा दुसरी अधिक भाग्यवान गोष्ट असूच शकत नाही.

३ आ ५. पत्नी : सौ. विजयासारखी पत्नी मिळाली. सौ. विजयाने माझ्या संसाराचे सर्व प्रकारचे दायित्व उत्तम रीतीने पार पाडल्यामुळे मला माझे निरनिराळे आवडते विषय आणि अध्यात्म यांचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला. ब्रह्मचारी किंवा संन्यास आश्रमातील व्यक्तीला मिळू शकेल, त्यापेक्षा अधिक वेळ मला तिच्यामुळेच मिळाला.

४. सात्त्विक मराठी भाषा

संस्कृतनंतर सर्वांत अधिक सात्त्विक भाषा मराठी असून माझा जन्म मराठी भाषिक कुटुंबात झाला.

५. शिक्षण

आर्यन हायस्कूलमध्ये झाले. तेथे ५ ते ७ वी पर्यंत संत नामदेव, संत तुकाराम इत्यादी संतांचे अभंग आणि ८ ते ११ वी पर्यंत श्रीमद्भगद्गीतेतील अध्याय असे प्रतिदिन अर्धा घंटा धार्मिक शिक्षण मिळत असल्याने नकळत अध्यात्माचा पाया रचला गेला.

५ अ. अध्यात्म : गुरुवर्य प.पू. डॉक्टरांमुळे अधूनमधून प.पू. भक्तराज महाराजांचे दर्शन होत असे. ख्रिस्ताब्द १९९० साली प.पू. भक्तराज महाराजांनी नरसोबाची वाडी येथील गुरुपौर्णिमेत गुरुमंत्र दिला.२००४ नंतर हृदयविकाराच्या व्याधीमुळे थोडे नैराश्य आले होते. ते प.पू. डॉक्टर आणि कुटुंबियांच्या आधारामुळेच नाहीसे झाले. २००७ साली गुरुवर्यांनी शिष्य म्हणून माझा स्वीकार केला. तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. त्यांच्या कृपेमुळे त्यांनीच १६.१२.२०१२ या दिवशी संतपदावर आरुढ केले.

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।

अर्थ : शिष्याला मोक्षप्राप्ती केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.

पू. अप्पाकाकांचा सर्वांत आवडता श्‍लोक

सच्चिदानन्दरूपाय विश्‍वोत्पत्यादिहेतवे ।
तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः ॥

अर्थ : सच्चिदानंदस्वरूप, विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण असणार्‍या आणि त्रिविध तापांचे हरण करणार्‍या भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमन करतो.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (२०.५.२०१३, दुपारी ४.५०)

पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले यांच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनाविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा !