आदर्श आणि वैभवसंपन्न विजयनगर !

१. पृथ्वीच्या पाठीवरील सर्वांत अधिक रमणीय आणि प्रेक्षणीय नगर !

‘विजयनगर हे कलाकौशल्याचे नगर. तेथे नगररचनेचा अपूर्व असा नमुना पहायला मिळतो. आताही त्याला तोड नाही. शृंगेरीमठाचे अधिपती विद्यारण्य स्वामी यांनी विजयनगरचे हिंदु साम्राज्य क्षत्रिय राजवंशाकरवी उभे केले. ही राजनगरी तुंगभद्रेच्या दक्षिणेला आहे. विजयनगरासारखे रमणीय आणि प्रेक्षणीय नगर पृथ्वीच्या पाठीवर नव्हते. या हिंदु साम्राज्याने तीनशे पन्नास वर्षे हिंदुधर्म आणि संस्कृती यांचे अखंड रक्षण केले, त्या विजयनगरचे आताचे नाव हंपी आहे.

२. शत्रूंपासून रक्षणासाठीची अद्भुत बांधणी

या नगराची रचना अद्भुत आहे. सभोवती एकाबाहेरएक असे सात कोट आहेत. इथे पुरुषभर उंचीचे दगड भूमीत इतके घट्ट गाडलेले आहेत की, स्वार आणि शिपाई यांना ते सहज ओलांडता यायचे नाहीत. सातव्या कोटाच्या आत दालने आणि मंत्रालय आहे.

उत्तरेचे द्वार आणि दक्षिणेचे द्वार यांतील अंतर आठ मैलांचे आहे. चारही दिशेस दुर्गम बुरूज आहेत. हेबुरूज म्हणजे आश्रय आणि संरक्षण यांची ठिकाणे ! कोटाच्या बाहेर मोठमोठे अणकुचीदार उंच दगडांचे सुळके आहेत. कोटातून आतल्या भागात पाणी नेण्यास अद्ययावत व्यवस्था आहे. आतील दिशेला दोन मोठे तलाव आहेत. यांनाच ‘पुष्करणी’ म्हणतात.

३. कलाकौशल्याने समृद्ध असलेल्या प्रचंड वास्तू

घोडा आणि हत्ती यांच्यासाठी मोठा गोठा आहे. ‘कमलमहल’ हा राजाच्या हत्तीचा गोठा ! (The stable of the royal elephants..) अत्यंत सुंदर कलाकौशल्याने समृद्ध अशा प्रचंड वास्तु ग्रॅनाईटच्या १० माळ्याच्या इमारती म्हणजे राम मंदिर ! त्या राम मंदिरात हिंदु पुराणातले अतिसुंदर प्रसंग कोरलेले आहेत. दहा मीटरचे अखंड कोरीव पाषाण ! ते सिंहासन, ती मंदिरे, सात माळे उंच असा त्या नगरासभोवतीचा तो कोट, तीस चौरस मैलांचे ते क्षेत्रफळ !(Its temples, palaces aqueducts and seven rows of fortified walls spread out in an area of twenty six square miles.)

४. भव्यता आणि सुंदरता यांनी युक्त असलेला राजवाडा अन् मंदिरे !

‘फिग्युटेडी’ या प्रवाशाने हा राजवाडा पाहिला होता. त्याने विजयनगराचे केलेले वर्णन, ‘भूमीपासून छतापर्यंत सुवर्णाचा पत्रा जडवलेली मेघडंबरी, वेताच्या जाळ्या, चौक्या, हिरे, मोती, रत्ने यांनी जडवलेले मंडप. हे पहा सुंदर विरूपाक्षाचे मंदिर ! वैभवसंपन्न नगर, ते अतिभव्य आणि परम रमणीय हजार्‍याचे राममंदिर ! हा पाहिलात का, मध्यभागी असलेला दगडाचा भव्य रथ आणि हा दगडाचा रथ यात्रेच्या वेळी चालत नेतात. हा रथ म्हणजे भव्य गरूडच, म्हणजे विष्णूचे वाहन.’

५. विशाल आणि सुंदर नगर

दोमिंग पेस (Domingo peas) हा पोर्तुगीज प्रवासी सोळाव्या शतकातल्या मध्यात विजयनगरला आला होता. त्या वेळी त्याने केलेले वर्णन, `रोमपेक्षाही अत्यंत विशाल आणि त्यापेक्षाही कितीतरी पटीने सुंदर असे १६ व्या शतकातील हे विजयनगर !’ (Vijaynagar at its peak in the mid 16 th century larger than Rome and much more beautiful. The best provided city in the world.)

६. मोघलांच्या आक्रमणानंतर झालेली विजयनगरची स्थिती !

मोघलांच्या आक्रमणात त्या नगरीचा विध्वंस झाला; पण अजूनही हे अवशेष मात्र पूर्ण (intact) आहेत. आताही त्या विजयगरचे विरुपाक्ष मंदिर, राममंदिर आणि अन्य मंदिरे येथे हिंदु लोक पूजा-अर्चा करतात. कोहिनूरपेक्षाही अनंतपटींनी सरस हिरे, रत्ने, सुवर्ण आणि मोती यांकरता जगभर विख्यात असलेल्या या नगरात आता प्लॅस्टिकच्या बांगड्या आणि बाहुल्या विकल्या जातात !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.२.२०११)