विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी

श्री सरस्वतीदेवी म्हणजे विद्या आणि कला यांची देवता. तिच्या भावपूर्ण उपासनेने उपासकाची बुद्धी सात्त्विक बनल्याने त्याला विविध प्रकारच्या कला आणि ज्ञान प्राप्त होते. बुद्धीने जे ग्रहण केले ते शब्दबद्ध करण्याचे काम श्री सरस्वतीदेवीचे आहे. श्री सरस्वतीदेवीला संत ज्ञानेश्वरांनी ‘अभिनव वाग्विलासिनी’ तर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी ‘शब्द मूळ वाग्देवता’ असे म्हटले आहे. ही विद्येची देवता आहे. श्री सरस्वती देवीला शारदाही म्हटले जाते.

शारदा म्हणजे ज्ञानाला आधार देणारी. या देवीच्या साडीचा रंग लालसर गुलाबी असतो. विद्याप्राप्तीसाठी श्री सरस्वतीची उपासना आणि प्रार्थना आवश्यक असते.

श्री सरस्वतीदेवीला करावयाची प्रार्थना

नमस्ते शारदे देवी वीणापुस्तकधारिणी ।

विद्यारंभ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।

अर्थ : हाती वीणा आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वतीदेवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात