Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

आज प्रत्येकानेच जिजाऊंचा आदर्श घेणे आवश्यक !

‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी राज्याची, म्हणजेच आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना केली. हे राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठीचे बाळकडू जिजाऊंनी त्यांना बालपणातच पाजले, त्यांच्यात जाज्ज्वल्य धर्माभिमान आणि राष्ट्राभिमानही निर्माण केला. जिजाऊंनी त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील क्षात्रवृत्ती जागृत केली आणि त्यांच्या मनात अन्याय अन् अत्याचार यांविषयीची चीड निर्माण केली. बालपणातच त्यांच्यात भक्तीचे आणि हिंदु धर्माचे बीज पेरून जिजाऊंनी सर्वार्थांनी शिवरायांना घडवले. यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली आणि याचेच फलस्वरूप म्हणून आज आपण हिंदू म्हणून जीवन व्यतीत करू शकत आहोत.

यावरून आपल्या लक्षात आले असेल की, माता हीच हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची खरी शिल्पकार आहे. जिजाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त सर्व मातांनी आता संकल्प करायला हवा, ‘आम्ही आमच्या मुलाला शिवरायांसारखा घडवण्याचा प्रयत्न करू आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेच्या ईश्वरी कार्यात सहभागी होऊ ! असे केल्यानेच हिंदू राष्ट्राची पहाट लवकर येईल.

आता आपण जिजाऊ आणि सध्याच्या माता यांच्या विचारसरणींचा अभ्यास करू.

१. मुलांचे भवितव्य

१ अ. सध्याच्या माता ‘मुलाने स्वतःसाठीच जगावे’, असे वाटून त्यांच्यावर संकुचितपणाचा संस्कार केला जाणे : ‘माझा मुलगा किंवा मुलगी यांनी आधुनिक वैद्य (डॉक्टर) किंवा अभियंता व्हावे आणि मोठे नाव कमवावे’, अशी सध्याच्या मातांची मानसिकता आहे. त्यांना वाटते की, मुलाने स्वतःपुरतेच जगावे, म्हणजे ‘संकुचित मानसिकता’ हा हिन्दू राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळाच आहे. जी माता संकुचितपणाचा असा संस्कार करते, ती अप्रत्यक्षपणे राष्ट्राचा विनाशच करत असते; कारण असा संस्कार झालेली व्यक्ती राष्ट्राचा विचारच करू शकत नसल्याने ती राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होऊ शकत नाही.

१ आ. जिजाऊ – ‘शिवाजीने राष्ट्रासाठीच जगावे’, असा संस्कार असणे : ‘माझा शिवाजी मोठा व्हावा; पण त्याने राष्ट्रासाठी जगावे. आपले नाव मोठे करण्यापेक्षा राष्ट्राचे नाव मोठे करावे’, असा जिजाऊंचा व्यापक विचार होता. माताच मुलाला व्यापक बनवू शकते; म्हणून प्रत्येक मातेने ‘आम्हीही मुलांना व्यापक बनवून हिंदू राष्ट्राच्या निर्मितीतील खारीचा वाटा उचलू’, असा निश्चय करायला हवा.

२. संस्कार करणे


२ अ. सध्याच्या माता – ‘इंग्रजी ग्रंथ वाचून मुले ज्ञानी होतील’, असे वाटणे : सध्याच्या मातांची अशी भ्रामक कल्पना आहे की, मुलांनी मोठमोठे इंग्रजी ग्रंथ वाचले की, ती आपोआप ज्ञानी होतील. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, ते ग्रंथ वाचून मुलांना एखादी पदवी नक्कीच मिळेल; पण त्यातून त्यांच्यावर चांगले संस्कार होणार नाहीत.

२ आ. जिजाऊ – शिवबाला रामायण आणि महाभारत यांतील गोष्टी सांगणे : जिजाऊ शिवबाला प्रतिदिन रामायण-महाभारतातील कथा सांगत असत. त्यामुळेच शिवरायांमध्ये अन्यायाविषयी चीड निर्माण झाली आणि त्यांनी हिंदवी राज्य स्थापन करण्याची शपथ घेतली.

मातांनो, आपले धर्मग्रंथच मुलांना आदर्श जीवनाचे धडे देऊ शकतात; म्हणून आपल्या मुलांना रामायण आणि महाभारत हे ग्रंथ वाचायला सांगा. तरच घराघरांतून शिवाजी निर्माण होतील.

३. आचरण

३ अ. सध्याच्या माता – पाश्चात्त्य विकृती स्वीकारणे : सध्याच्या माताच पाश्चात्त्यांप्रमाणे आचरण करत आहेत, उदा. जीन्स, टी शर्ट आणि पँट परिधान करणे, केस मोकळे सोडणे इत्यादी. मातांच्या अशा आचरणामुळे मुलेही हिंदु संस्कृतीचे पालन करत नाहीत.

३ आ. जिजाऊ – जिजाऊंच्या धर्माचरणामुळे शिवरायांवर संस्कार होणे : ‘हिंदु संस्कृती हा मानवी जीवनाचा पायाच आहे’, ही जिजाऊंची ठाम श्रद्धा होती. त्या स्वतः धर्माचरण, उदा. कपाळाला कुंकू लावणे, केसांचा अंबाडा घालणे इत्यादी करत. त्याचप्रमाणे त्या प्रतिदिन नामजप करणे, देवाला प्रार्थना करणे इत्यादी साधनाही करत असत. जिजाऊंच्या धर्माचरणामुळे शिवरायांवर ते संस्कार झाले आणि त्यांच्यामध्ये आपोआपच संस्कृतीविषयीचा अभिमान निर्माण झाला.

हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. तिच्या आचरणामुळे स्त्रीला ईश्वराची शक्ती मिळते. त्यामुळे प्रत्येक मातेला असे सांगावे वाटते की, तिने स्वतः धर्माचरण करण्याचा निश्चय करावा. तरच मुलांवर योग्य संस्कार होऊन ते हिंदू राष्ट्रासाठी पात्र नागरिक बनतील.

४. विरंगुळा म्हणूनसुद्धा दूरचित्रवाहिन्यांवरील
कुसंस्कार करणार्‍या मालिका पाहू नका !

सध्या स्त्रिया वेळ जावा; म्हणून दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पहातात. या मालिकांमधून राग, द्वेष, मत्सर आणि मारामारी यांचाच भडिमार होत असतो. त्यामुळे चांगले संस्कार न होता विकारांनाच चालना मिळते. मुलेही हेच कार्यक्रम पहात असल्याने त्यांच्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. मातांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या मालिका पहायला हव्यात.

५. प्रार्थना

सर्व मातांनी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करावी, ‘हे श्रीकृष्णा, आम्ही जिजाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त प्रार्थना करतो, ‘जिजाऊंप्रमाणेच आमच्या मुलांवर संस्कार करण्याची शक्ती आणि बुद्धी आम्हाला दे अन् आमच्या हातून हिंदू राष्ट्राला लायक असा नागरिक घडवण्याची सेवा करवून घे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.