निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचे विचार करणे, हा वेडेपणा !

काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत. आजकाल विद्यार्थी केवळ परीक्षेतील अपयश आणि अभ्यासाचा ताण यांमुळेच नाही, तर प्रेमभंग, निराशा, अआई-वडिलांचे कडक बोलणे, एखादी गोष्ट मनासारखी न होणे आदी कारणांमुळेही विद्यार्थी सर्रास आत्महत्या करतात ! वर्ष २०१० च्या प्रारंभी ४३१ हून अधिक विध्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

१. आत्महत्या केल्याने होणारे दुष्परिणाम

अ. आई-वडिलांसह नातेवाईकही दुःखाच्या खाईत पडतात.

आ. आई-वडिलांनी बालपणापासून शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी घेतलेले अमूल्य श्रम कवडीमोल ठरतात.

इ. लहान भावडांपुढे चुकीचा आदर्श ठेवला जातो.

ई. सर्वोच्च अन् चिरंतन आनंद मिळवण्यासाठी देवाने दिलेल्या अनमोल अशा मनुष्यदेहाचे सार्थक होत नाही.

उ. ‘आत्महत्या केल्याने महापाप लागते अन् आत्महत्या करणाऱ्याला मृत्यूनंतर परलोकात नरकप्राय यातना भोगाव्या लागतात’, असे धर्मशास्त्र सांगते.

२. आत्महत्येच्या विचारापासून मनाला परावृत्त करण्यासाठी काय करावे ?

अ. स्वतःच्या मनावर सकारात्मक विचार बिंबवावेत !

‘आत्महत्या करणे’, हा काही समस्येवरील उपाय नव्हे, उलट तो तर शुद्ध पळपुटेपणाच आहे. मनात आत्महत्येचे विचार येणाऱ्या मुलांनी स्वतःच्या मनावर पुढील विचार बिंबवावेत.

अ. आत्महत्येसाठी केवळ एकच कारण असते, तर जगण्यासाठी अनेक कारणे असतात.

आ. जन्मदात्या आई-वडिलांना वृद्धपणी सांभाळण्याचे दायित्व (जबाबदारी) माझ्यावर आहे.

इ. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांसारखे राष्ट्रपुरुष; तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांसारखे संत यांसारखे संत यांनाही जीवनात दुःखाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले, अनेक यातना सहन कराव्या लागल्या. त्यांच्या तुलनेत स्वतःला होणारे परीक्षेतील अपयशाचे दुःख यत्किंचित आहे.

मुलांनो, अपयशाचे विष पचवून जो यशाच्या शिखराकडे झेप घेतो, तो थोर पुरुष जाणावा. कठीण प्रसंगांत वरील आदर्श व्यक्तीमत्त्वे कधीच खचून गेली नाहीत; उलट त्यांनी आत्मविश्वासाने परिश्रम करून यशाचे शिखर गाठले; म्हणूनच जनसामान्यांनी त्यांचे आदर्शत्व मान्य केले.

आ. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे !

अ. तुमच्या मनात कोणत्या कारणांमुळे आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत, ते आई-वडील, गुरुजन किंवा मोठा भाऊ-बहीण यांना मनमोकळेपणे सांगावे.

आ. आत्महत्या करण्याचे विचार किंवा निराशेचे विचार अगदी त्या वेळी दुसऱ्याला सांगता आले नाहीत, तर ते लिहून काढावेत. नंतर ‘या प्रसंगाला कसे तोंड द्यायचे’, याविषयी वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

इ. स्वयंसूचना द्याव्यात !

चिमटा पद्धत

‘चूक म्हणजे शिक्षा’ याची मनाला सतत जाणीव राहिल्यास चूक वारंवार होत नाही. त्यामुळे मनात आत्महत्येचा विचार येताच स्वतःला जोरात चिमटा काढावा. आत्महत्येचा विचार मनातून निघून जाईपर्यंत चिमटा काढण्याची आठवण व्हावी, यासाठी दिवसभरात न्यूनतम (कमीतकमी) अध्र्या घंट्याच्या (तासाच्या) अंतराने मनाला पुढील स्वयंसूचना द्यावी.

स्वयंसूचना : ‘जेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होईल अन् मी स्वतःला जोरात चिमटा काढीन.’

आत्महत्येच्या विचाराशी संबंधित स्वभावदोष आणि ते दूर होण्यासाठी मनाला द्यायच्या स्वयंसूचना

शालेय जीवनात मित्रांनी टोचून बोलणे, परीक्षेत अल्प गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणे, शिक्षक रागावणे अशा प्रकारच्या अप्रिय घटना घडताच काही विद्याथ्र्यांना निराशा येते किंवा त्यांच्या मनात न्यूनगंड (स्वतःला न्यून लेखण्याची भावना) निर्माण होतो. पुढे हे दोष वाढत वाढत गेल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. असे होऊ नये यासाठी निराशा / न्यूनगंड या दोषांवर पुढीलप्रमाणे सूचना द्याव्यात.

१. निराशा येणे

प्रसंग : सहामाही परीक्षेत गणितामध्ये १०० पैकी ७५ गुण मिळणे अपेक्षित असतांना केवळ ५० गुण मिळाल्याने मन निराश झाले.

स्वयंसूचना : गणितामध्ये ७५ गुण मिळणे अपेक्षित असतांना ५० गुण मिळाल्याने जेव्हा मन निराश होईल, तेव्हा चुकलेल्या गणितांचा अभ्यास केल्यास पुढील परीक्षेत मला ९० गुणही मिळवता येतील, हे मी लक्षात घेईन आणि शिक्षकांच्या साहाय्याने नेटाने गणिताचा अभ्यास करीन.

२. न्यूनगंड निर्माण होणे

प्रसंग : १० वीच्या परीक्षेत गणिताच्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यावर ‘आता मी काही कामाचा नाही’, अशा प्रकारचे विचार मनात आले.

स्वयंसूचना : १० वीच्या परीक्षेत गणितामध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा माझ्या मनात ‘आता मी काही कामाचा नाही’, असा टोकाचा विचार येईल, तेव्हा ‘गणिताच्या शिकवणीला गेल्यास ६ मासांनी (महिन्यांनी) होणाऱ्या परीक्षेत मला चांगले गुण मिळतील’, हे मी लक्षात घेईन आणि मी सर्व प्रकारची गणिते सोडवण्याचे प्रयत्न नियमित करीन.

मुलांनो, तुम्ही वरील प्रकारचे प्रयत्न केले की, तुमच्या मनातील आत्महत्येचे विचार कधी पळून जातील, ते तुम्हाला कळणारही नाही !

३. आत्महत्येचे विचारावर खरा उपाय म्हणजे ‘साधना’ !

         विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे खरे कारण म्हणजे ‘मनाची दुर्बलता’. ध्यानधारणा, नामजप यांसारखी ‘साधना’ केल्यानेच मनोबल वाढून जीवनात स्थिरता येते. असा विद्यार्थी आत्महत्येच्या विचारावर सहज मात करतो.

अशा प्रकारचे प्रयोग निरनिराळ्या महाविद्यालयामधूनही केले गेले आहेत आणि त्यांना यामुळे अभ्यासात लाभ दिसून आला आहे. यासाठी मुलांनो, मनोबल वाढवण्यासाठी आजपासूनच साधनेला आरंभ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘अभ्यास कसा करावा ?