प्रश्नपत्रिका सोडवणे

मुलांनो, सर्वसाधारणपणे आपली मानसिकता अशी असते की, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर लगेच ती सोडवायला घ्यायची. यामुळे काही सूचना व्यवस्थित वाचल्या जात नाहीत आणि मग चुका होतात. या चुका टाळण्यासाठी पुढील भाग लक्षपूर्वक वाचा.

प्रश्नांचा अभ्यासपूर्वक विचार करावा !

१. ‘प्रश्नाचे नीट आकलन करून घ्यावे. काय विचारले आहे, किती सूत्रे (मुद्दे) लिहायची आहेत, हे लक्षात घेऊनच लिहायला आरंभ करावा. ‘कृती लिहू नये किंवा आकृती काढू नये’, असे लिहिले असल्यास तसे करू नये.

२. प्रत्येक प्रश्नाच्या गुणांना अनुसरून उत्तर लिहितांना किती वेळ देता येईल, हे ठरवून त्याप्रमाणे ‘आपला वेग आहे कि नाही’, याकडे लक्ष ठेवावे.

३. सोपे प्रश्न शक्यतो आधी सोडवावेत. कठीण प्रश्नात जास्त वेळ दवडून सोप्या प्रश्नाचे हातचे गुण वाया दवडू नयेत.

४. आवश्यक ते सर्व प्रश्न अगोदर सोडवून वेळ शेष असेल, तरच अतिरिक्त प्रश्न सोडवावा.

सर्वसाधारणतः प्रश्नपत्रिका सोडवतांना घ्यावयाची काळजी

१. उत्तरपत्रिकेत भेदाची (फरकाची) सूत्रे लिहितांना तुलनात्मक लिहावीत.

२. नवीन प्रश्नाचे उत्तर लिहिण्यास नवीन पानावरच आरंभ करावा.

३. प्रश्नपत्रिका सोडवतांना उत्तर लिहिता लिहिता पडताळता आले, तर ते जास्त चांगले, नाहीतर शेवटची १० मिनिटे सगळी उत्तरपत्रिका पडताळण्यासाठी राखून ठेवावीत.

४. परीक्षा सभागृहामध्ये इतर मुलांकडे लक्ष न देता पूर्णपणे आपल्या उत्तरपत्रिकेवर लक्ष केंद्रित करावे आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवावी.

गणित आणि विज्ञान यांच्या प्रश्नपत्रिका सोडवतांना घ्यावयाची काळजी

१. गणिताची प्रश्नपत्रिका सोडवतांना आकडेमोडीच्या चुका टाळाव्यात.

२. गणिताची प्रश्नपत्रिका सोडवतांना कच्चे-पक्के (रफ-फेअर) असे करत वेळ न दवडता आवश्यक तेवढीच आकडेमोड उजव्या बाजूला कच्चे काम (रफवर्क) म्हणून करावी आणि गणिते सोडवावीत.

३. गणित आणि विज्ञान यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये गणिते सोडवतांना आवश्यक तेथे परिमाणे (युनिट) न विसरता लिहावीत, म्हणजे त्यासाठीचे गुण कापले जात नाहीत.’

संदर्भ : ‘दैनिक गोमन्तक’, ११.३.२०११.

एखादे उत्तर आठवत नसल्यास करायची प्रार्थना

उत्तरपत्रिका लिहितांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर आठवत नसल्यास कुलदेवतेला किंवा उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, ‘माझ्या बुद्धीवरील काळ्या शक्तीचे आवरण नष्ट होऊ दे आणि मला ….. या प्रश्नाचे योग्य ते उत्तर आठवू दे.’

संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ' अभ्यास कसा करावा? '